शिवपुरी : सीप्री, भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,०८,२७१ (१९९१). ग्वाल्हेरपासून नैऋत्येस ११४ किमी. अंतरावर, मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वर हे शहर आहे. एका उंचवट्याच्या जलविभाजक प्रदेशात हे वसलेले असून या जलविभाजकाच्या चोहोबाजूंच्या उतारांवरून प्रवाह वाहत जातात. ग्वाल्हेरपासून शिवपुरीपर्य़ंत लोहमार्गही आहे. पूर्वी हे ग्वाल्हेर संस्थानचे उन्हाळी राजधानीचे तसेच या संस्थानातील नरवर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. १८०४ मध्ये नरवर राजपुतांकडून हे नगर ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याने ताब्यात घेतले. १९०१ मध्ये बांधलेला शिंद्यांचा राजवाडा येथे आहे. राजवाड्याशेजारीच शिंदे घराण्यातील राज्यकर्त्यांची संगमरवरात बांधलेली स्मारके आहेत. १८३५ ते १८९६ या काळात येथे ब्रिटिशांची लष्करी छावणी होती. १९०४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. शहरात रुग्णालय, वनविज्ञान प्रशिक्षण विद्यालय आणि जिवाजी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आहेत. कृषिमालाच्या व्यापाराचे तसेच परिसरातील वनोत्पादनांच्या वितरणाचे हे प्रमुख केंद्र आहे.
शहराच्या सभोवती १५८ चौ.किमी. क्षेत्रफळ असलेले शिवपुरी नॅशनल पार्क हे अभयारण्य आहे. पूर्वी हे संस्थानिकांच्या शिकारीचे राखीव क्षेत्र होते. पूर्वी या वनक्षेत्राला मध्य भारत राष्ट्रीय उद्यान म्हणत. १९५९ मध्ये ‘शिवपुरी नॅशनल पार्क’ असे त्याचे नामांतर करण्यात आले. विंध्य पर्वतातील टेकड्या व दऱ्यांचा यात समावेश होतो. या राष्ट्रीय उद्यानात साग, साल, खैर इ. वृक्षप्रकार व अधूनमधून गवताळ प्रदेश आढळतात. वाघ, चित्ता, कोल्हा, हरिण, सांबर, रानडुकरे, रानकोंबडे, लावा, माळढोक इ. पशुपक्षी येथे आढळतात. येथील साख्यसागर किंवा कांडपाठ या ११ किमी. चा परिघ असलेल्या कृत्रिम सरोवरात नौकाविहाराच्या सोयी आहेत. याला लागूनच हरणांसाठी प्रसिध्द असलेले माधव नॅशनल पार्क आहे. शिंदे घराण्यातील मान्यवरांच्या छत्र्या हे पर्यटकांचे आकर्षण असून शिवपुरी हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ बनले आहे. वाघांची छायाचित्रे घेण्यासाठी उद्यानात विशेष मचाणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
चौधरी, वसंत