शिवणयंत्र : शिलाईकामासाठी वापरात असणारे उपयुक्त यंत्र. घरगुती व औद्योगिक असे याचे दोन प्रकार असून कपड्याबरोबरच पादत्राणे, प्रवासी वस्तू व अन्य प्रकारच्या शिवणासाठीही शिवणयंत्रे आता उपलब्ध आहेत.

चार्स्ल एफ्. वाइझेनथाल यांनी १७५५ मध्ये हातशिलाईकरिता वापरण्यात येणाऱ्यादोन टोके असलेल्या व त्यांपैकी एक टोकाला छिद्र असलेल्या सुईचे एकस्व (पेटंट) इंग्लंडमध्ये मिळविले. १७९० मध्ये थॉमस सेंट यांनी एका धाग्याने टाके घालता येतील अशा प्रयुक्तीचा शोध लावला. त्यांनी क्रोशे विणकामाकरिता वापरण्यात येणारी आकडा सुई यात वापरली. १८३० मध्ये बार्तेलमी तीमॉन्ये यांनी आकडा सुईच्या साहाय्याने साखळी टाके घालणाऱ्या यंत्राचे एकस्व घेतले. त्यांनी फ्रान्समध्ये लष्करातील जवानांचे गणवेश शिवण्याकरिता हे यंत्र वापरले. १८३३ मध्ये अमेरिकेतील वॉल्टर हंट यांनी टोकाला छिद्र असलेली सुई शिवणयंत्राकरिता तयार केली. त्यांनी प्रथमच दोन धाग्यांच्या कुलपी टाक्याचे महत्त्व ओळखले. त्यांनी तयार केलेले यंत्र तीमॉन्ये याच्या यंत्रापेक्षा साधे आणि अधिक कार्यक्षम होते. १८४६ मध्ये इलाअस हौ यांनी टोकाला छिद्र असणारी सुई आणि मागे-पुढे सरळ रेषेत जाणारा लांब धोटा वापरलेल्या यंत्राचे एकस्व घेतले. १८५० मध्ये अमेरिकेतील ⇨ आयझाक मेरिट सिंगर यांनी हौ यांच्या यंत्रात सुधारणा करून ते लोकप्रिय केले. त्याच सुमारास १८५१ मध्ये ऍलन विल्सन यांनी गोल फिरणारा धोटा वापरून शिवणयंत्रात सुधारणा केली. त्याचप्रमाणे त्यांनी चार स्वयंचलित गती या यंत्रात आणल्या. अशा प्रकारे या यंत्रात पुष्कळ सुधारणा होऊन जवळजवळ २२ प्रकारची कामे त्याच्यावर होऊ लागली.

यूरोपमध्ये १८६२ सालापासून व जपानमध्ये १९०० सालापासून शिवणयंत्रे तयार होऊ लागली. १९०५ च्या दरम्यान विजेवर चालणारी शिवणयंत्रे वापरात आली. याच सुमारास घरगुती वापराबरोबर तयार कपड्यांसाठी लागणारी औद्योगिक शिवणयंत्रे तयार होऊ लागली. नागमोडी व नक्षीकाम करणारी यंत्रे १९४० च्या सुमारास बाजारात आली. त्यानंतर काजे करणारी, गुंड्या लावणारी, निरनिराळे कापड व चामडे शिवू शकणारी इ. प्रकारची शिवणयंत्रे येत राहिली. दर मिनिटाला १,५०० ते ५,००० टाके घालणारी शिवणयंत्रे पुढे अस्तित्वात आली.

कापडाच्या कडा उसवू नयेत म्हणून कापड कडेला दुमडून त्यावर टीप मारली जाते. ब्रिटिश मानक ३८७०:१९९१ मध्ये ७० च्या वर दुमडण्याचे किंवा कापड जोडण्याचे प्रकार सांगितलेले आहेत. आयएसओ : ४९१५:१९९१ हे आंतरराष्ट्रीय मानकही व्यवहारात आहे. ब्रिटिश मानकाप्रमाणे टीपेचे सहा मुख्य प्रकार असून वर्ग-३०० कुलपी टाका हा प्रकार सर्वांत जास्त वापरला जातो. दोन धाग्यांनी तयार होणारा कुलपी टाका दोन कापडांचे तुकडे कसे जोडतो हे आ. १ मध्ये दाखविले आहे. यात कापडाच्या वर दिसणारा धागा ‘सुई धागा’ असतो, तर खाली दिसणारा धागा ‘बॉबिन धागा’ असतो. सुई धागा सुईमार्फत दोन कापडांच्या जाडीच्या निम्म्या अंतरापर्यंत खाली उतरतो, तर बॉबिन धागा निम्म्या अंतरापर्यंत वर येतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे त्याची गुंफण होऊन सुई धागा परत वर जातो आणि बॉबिन धागा कापडाखाली जातो. निरनिराळ्या प्रकारच्या कापडांवर त्याच्या जाडीनुसार लहान मोठे टाके घेऊन शिलाई करतात (२·५ सेंमी. मध्ये कमीत कमी १२ व जास्तीत जास्त ३० टाके घेता येतात).

आ. १. दोन धाग्यांनी बनणारा कुलपी टाका : (१) सुई धागा, (२) बॉबिन धागा, (३) कापडाच्या चुण्या.

  टाके घालणाऱ्या यंत्रणेला आणि भरण यंत्रणेला परिशुध्द समकालिक गती देण्याकरिता विविध प्रकारचे दंड, दंतचक्रे, स्तंभदंड, दट्टये, पट्टे साखळ्या इत्यादींची योजना शिवणयंत्रात केलेली असते.

आ. २. शिवणयंत्राचे विविध भाग : (१) दोरा गुंडी, (२) हात चक्र, (३)बॉबिन गुंडाळक, (४) टाका अंतर चक्र, (५) विजेचा स्विच, (६) भरण-कुत्रे नियामक खिटी, (७) सरक पट्टी, (८) बॉबिन आवरणातील बॉबिन, (९) घसा-पट्टी, (१०) भरण-कुत्रे, (११) दाब-पायटा, (१२) सुई, (१३) सुई धागा ताणचक्र, (१४) दाब-पायटा उच्चालक, (१५) धागा वर उचलणारी तरफ, (१६) दाब नियामक चक्र, (१७) दिवा.

टाके घालण्याची यंत्रणा : या यंत्रणेमध्ये पुढील भाग असतात : (१) सुया, (२) धोटे, (३) फास तयार करणारे भाग, (४) फास रुंदावणारे भाग, (५) धागा पकडणारे आकडे, (६) साखळी पट्टया, (७) ताण चकत्या, दाब स्प्रिंगा, सोड पिना, तपासणी स्प्रिंगा इ. ताण देणारे भाग, (८) दोरा वर उचलणाऱ्या तरफा, (९) घसा-पट्टया, (१०) सुऱ्या, टोचे इ. टाक्यांना मदत करणारे भाग, (११) डोळा (नेढा), आकडा, खटके, खाच, नळी, खोबण इ. धागा मार्गदर्शक भाग.

सुई : शिवणयंत्रातील महत्त्वाचा भाग सुई आहे. ही सुई कंप पावणाऱ्या, दंडाच्या खालील टोकाला स्क्रूच्या साहाय्याने पक्की केलेली असते. काही यंत्रांत सुई दर मिनिटाला १०,००० वेळा वर-खाली होण्याइतकी जलद काम करीत असते. सुईवर भरपूर ताण पडत असल्यामुळे तिचा व्यास, उंची, रचना व रचनेत वापरण्यात येणारा धातू या सर्वांबद्दल काटेकोरपणा असावा लागतो. प्रचंड वेगामुळे सुई गरम होते. त्यामुळे अधिकाधिक कामाच्या वेळी त्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. शिवण-यंत्र बनविणाऱ्या कंपन्या कोणत्या प्रकारची सुई वापरावी याची मोजमापे देत असतात. [⟶ सुई].

धोटा : घसा-पट्टीच्या खालील धोटा शिवणयंत्रातील दुसरा महत्त्वाचा भाग आहे. सध्याच्या शिवणयंत्रांत मागेपुढे सरळरेषेत जाणाऱ्या धोट्याऐवजी अर्धगोलाकार अर्धवर्तुळात फिरणारी बॉबिन (धोटा धागा गुंडाळलेली) ही बॉबिन-डबीमध्ये ठेवलेली असते. आ. ४ मध्ये बॉबिन-डबी, बॉबिन व बॉबिन धागा (दूरदूर सुटे करून) दाखविले आहेत. सुई-दंड वर-खाली कंप पावत असताना सुईने तयार केलेला वरील धाग्याचा फास धोट्याचा आकडा पकडून ठेवतो आणि या फाशामधून बॉबिन धागा पुढे नेला जाऊन सुई वर गेल्यानंतर कुलपी टाका तयार होतो. सुई धागा आणि बॉबिन धागा यांचे ताण सारखे असावे लागतात नाही तर टाका एका बाजूने सैल राहतो.

भरण यंत्रणा : या यंत्रणेमुळे सुईच्या गतीप्रमाणे विवक्षित गतीने प्रत्येक टाका तयार झाल्यानंतर कापड पुढे सरकत राहते. सामान्यपणे पाच प्रकारच्या प्रमुख भरण यंत्रणा आहेत : (१) सुई भरण यंत्रणेमध्ये सुईची वल्हविल्यासारखी क्रिया, (२) पायटा भरण यंत्रणेमध्ये दाब-पायट्याची चालण्याची केलेली क्रिया, (३) चक्री भरण यंत्रणेमुळे एक किंवा अनेक दाते असलेल्या चक्रांची परिभ्रमण गती, (४) दोलन भरण यंत्रणेमध्ये दाते असलेल्या प्रतलाचे विवृत्ताकार दोलन, (५) फलाट भरण यंत्रणेमध्ये दाब-पायट्याच्या साहाय्याने वस्तू फलाटावर नेणे. फार थोड्या शिवणयंत्रामध्ये भरण यंत्रणा नसते. अशा यंत्रात चालविणाऱ्याच्या हातांनी वस्तू पुढे सरकविली जाते.

साहाय्यकारी उपकरणे : शिवणयंत्राला काही वेगळी उपकरणे जोडून शिवणकाम सुबक व चांगले करता येते. अशी पाच उपकरणे : (१) काठ दाब पट्टी : कापडाच्या काठावर टिपा मारावयाच्या असल्यास या पट्टीचा उपयोग होतो. (२) घेर दाब पट्टी : कोणत्याही कापडाचे सरळ किंवा तिरपे गोट दुमडावयाचे असतील तेव्हा कापड या पट्टीत दाबून घेतले जाते व गोठ सुलभ रीत्या दुमडले जातात. (३) दुमड दाब पट्टी : कापडाला एक शिवण मारून कापड दुमडून दुसरी शिवण मारण्याकरिता या पट्टीचा उपयोग करतात. (४) चूण शिवण पट्टी : कापडावर पुष्क़ळशा व समांतर चुणी मारण्यासाठी हिचा उपयोग होतो. (५) भरतकाम पट्टी : भरतकामाचे निरनिराळ्या प्रकारचे आकृतिबंध कापडावर काढण्यासाठी याचा उपयोग होतो.

सुई, भरण-कुत्रे, दाब-पायटा, पकड-पायटा आणि घसा-पट्टी हे सर्व भाग शिवणयंत्राची शिलाई गुणवत्ता ठरविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात.

आ. ३ शिवणयंत्रातील सुईचे भाग : (१) टोक, (२) डोळा (नेढा), (३) सुईच्या डोळ्यापासून एक बारीकशी लांब खाच, (४) चपटा भाग, (५) स्कार्फ, (६) सुईच्या दुसर्याा बाजूला डोळ्याच्या वर व खाली थोड्या अंतरापर्यंत खाच, (७) पाते.

आ ४. धोटा : (१) अर्धगोलाकार फिरता आकडा, (२) बॉबिन, (३) बॉबिन-डबी, (४) बॉबिन धागा, (५) सुई धाग्याचा फास.

भरण उंची मार्ग (घसा-पट्टीच्या वर), सुई प्रणोद अंतर, सुईचा स्पर्श वेग आणि धाग्याचा ताण या इतर बाबींचाही शिलाई गुणवत्तेवर परिणाम होतो.

पहा: शिवणकला.

आजगावकर, दि. बा. देशपांडे, प्रतिभा