शिलाजित :  हिमालय, विंध्य, सह्याद्री हे पर्वत मे-जून महिन्यांत उन्हाने तापले असता खडकांतून चिकाप्रमाणे शिलाजित बाहेर पडतो. तो शुद्ध करावा लागतो. सध्या तो दुर्मिळ आहे. सर्व रोगांवरील हे रामबाण औषध आहे.

वाग्भटाचार्यांनी सुवर्ण, रजत, ताम्र व लोह अशा योनिभेदाने शिलाजित चार प्रकारचा मानला आहे. सुवर्णापासून स्रवणारा शिलाजित मधुर, किंचित कडवट, जास्वंदीच्या फुलाच्या रंगाचा, पचनानंतर तिखट व थंड असतो. रुप्यापासून स्रवणारा शिलाजित तिखट, पांढरा, थंड, मधुर असतो. तांब्यापासून स्रवणारा शिलाजित मोराच्या कंठाच्या रंगाचा, कडवट, उष्ण व पचनानंतर तिखट असतो. लोहापासून स्रवणारा शिलाजित गुग्गुळाच्या रंगाचा, किंचित खारट, कडवट, पचल्यावर तिखट व थंड असून तो सर्वश्रेष्ठ होय. रसायन प्रयोगात तो विशेष उपयोगी आहे. सर्व प्रकारांचे शिलाजित गोमूत्राच्या वासाचे असतात. तांबडा, निळा, काळा व पांढरा असेही शिलाजिताचे चार प्रकार आहेत. याच्या रेतीसारख्या पांढऱ्या रंगाच्या कणांची रुची खारट असते. गर्द रंगाचा, कटू स्तंभक (आकुंचन करणारा), शीतक (थंडावा देणारा), तेलकट, सौम्य व जड असा शिलाजित औषधांत वापरतात. विस्तवावर टाकल्यास त्याचे गुणधर्म नाहीसे होतात.

भगवान धन्वंतरीच्या मते सुवर्ण, रुपे, लोह, ताम्र, कथिल व शिसे यांपासून सहा प्रकारांचा शिलाजित संभवतो. त्यांच्यापैकी जो काळ्या रंगाचा, जड, स्निग्ध, रेव नसलेला व गोमूत्राच्या वासाचा असतो, तो उत्तम असतो.

शिलाजित प्रमेह व क्षयरोग नष्ट करणारा, कफहारक तसेच रसायन म्हणजे वार्धक्यावर मात करणारा आणि सर्वरोगनाशक आहे. तो तिखट व छेदकही आहे. तो योगवाही असल्यामुळे नानानुपानांमध्ये रोग बरे करणारा आहे. यांशिवाय तो मूत्रकृच्छ, अर्श (मूळव्याध), पांडू, शोथ (दाहयुक्त सूज) आणि विशेषतः कफाचे विकार बरे करणारा आहे.

जमदाडे, ज. वि.