शिंदे, महादजी : ( ? १७२७ – १२ फेब्रुवारी १७९४). उत्तर पेशवाईतील एक पराक्रमी सेनानी आणि मुत्सद्दी. पहिल्या बाजीराव पेशव्याचा विश्वासू सरदार राणोजी यास चिमाबाई या राजपूत स्त्रीपासून झालेला हा मुलगा. शिंद्यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कण्हेरेखेड (ता. कोरेगाव) या गावचे. राणोजी व जयाप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहिमांतून महादजीला शिपाईगिरीचे शिक्षण मिळाले. महादजीने प्रथम तळेगाव-उंबरीच्या निजामावरील लढाईत पराक्रम करून नाव मिळविले. औरंगाबाद (१७५१), साखरखेडले (१७५६), पंजाब (१७५९) इ. मोहिमांतही त्याने भाग घेतला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत (१७६१) एका पठाणाने केलेल्या आघातामुळे तो लंगडा झाला असताना राणेखान नावाच्या एका मुसलमान भिस्त्याने त्यास मदत केली. महादजीने त्यास भाऊ मानून पुढे सरदार केले. थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत राघोबाच्या नादी लागून पटवर्धन, प्रतिनिधी यांच्याप्रमाणेच निजामाला जाऊन मिळण्याच्या बेतात महादजी होता. गोहदच्या जाटांविरुद्ध राघोबाच्या नेतृत्वाखाली महादजी लढला. थोरल्या माधवरावांनी त्यास १७६८ मध्ये सरदारकी दिली. मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांची दौलत खालसा करावी, म्हणून राघोबा प्रयत्नशील होता. तेव्हा महादजीने अहिल्याबाईस मातोश्री मानून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे ठरविले. पेशव्यांनी महादजीस पानिपतचे अपयश धुऊन काढण्यासाठी बिनीवाले व कानडे यांबरोबर दिल्लीकडे रवाना केले (१७७१). तिथे महादजीने नजीबखानाचा रोहिलखंड प्रांत लुटून ताब्यात घेतला आणि शाह आलम बादशहास इंग्रजांच्या तावडीतून सोडवून दिल्लीच्या तख्तावर बसविले. त्यामुळे पेशव्यांस उत्तरेत मराठयांचा जम बसविण्यास महादजीचे मोठे साहाय्य झाले. राजस्थानात उदेपूरच्या (उदयपूर) तंट्यात महादजीने साठ लाख खंडणी व प्रांत मिळविला आणि आपला सुभेदार तिथे नेमला.
नारायणराव पेशव्यांच्या खुनानंतर बारभाईचे कारस्थान उद्भवले. कोणत्या पक्षास मिळावे, याविषयी महादजीचा निश्चय प्रथम झाला नाही परंतु नाना फडणीस व सखारामबापू यांनी त्यास मुलूख वगैरे देऊन आपल्या पक्षाकडे घेतले आणि राघोबाचा बंदोबस्त केला. तोतयाचे बंड महादजीने मोडले. कोल्हापूरच्या छ्त्रपतींनी पेशव्यांचा मुलूख घेऊन कारस्थाने आरंभिली, तेव्हा महादजीने त्यांना धडा शिकविला आणि यापुढे ‘राघोबा व हैदर यांच्याशी संबंध ठेवणार नाही’ असा करार करून घेतला. नाना फडणीसांचा चुलत भाऊ मोरोबा फडणीस याने राघोबा, इंग्रज व तुकोजी होळकर यांच्या मदतीने बंड करून तीन महिने पुण्याचा कारभार हाती घेतला, तेव्हा महादजीने मुत्सद्दीगिरीने होळकर व सखारामबापू यांना त्यातून फोडून, इंग्रजांना चुचकारून बंड मोडून काढले. इंग्रजांच्या कवायती सेनेची शिस्त पाहून त्याने डि. बॉइन या फ्रेंच सेनाधिकाऱ्यास आपल्या पदरी ठेवले आणि शिस्तबद्ध फौज तयार केली. त्याच्या पदरी तीस हजार कवायती पायदळ, पाचशे तोफा व तीस हजार घोडदळ एवढे सुसज्ज सैन्य होते. ते मुख्यत्वे ग्वाल्हेर येथे असे, व राजधानी उज्जैन येथे होती. त्यात मराठ्यांपेक्षा मुसलमान, राजपूत व युरोपीय यांचा भरणा जास्त होता. त्याने तोफा ओतण्याचा कारखाना आग्र्यात काढून हत्यारे तयार करण्यास उत्तेजन दिले. दिल्लीच्या बादशाहीवरील मराठ्यांचे जे वर्चस्व कमी झाले होते, या कवायती फौजेच्या जोरावर ते पुन्हा प्रस्थापित केले आणि त्यासाठी दिल्लीतील मुसलमान सरदारांच्या १७८४ मधील भांडणाचा फायदा घेऊन बादशहास ताब्यात घेतले. बादशहाकडून पेशव्यांस ‘वकील-इ-मुतालिक’ (मुख्य कारभारी) ही पदवी मिळविली. स्वतःस नायबगिरी मिळवून बादशहास ६५,००० नेमणूक करून सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. शिवाय बादशहाकडून गोवधबंदीचे फर्मान काढविले. महादजी मथुरेस राहू लागला. महादजीच्या वाढत्या सत्तेस शह देण्यासाठी मुसलमान सरदार व काही राजपूत राजे यांनी त्याविरुद्ध बंडाळी माजविली (१७८६-८७). लालसोटच्या लढाईत बादशहाची सर्व फौज राजपुतांना मिळाली. त्यावेळी महादजीस माघार घ्यावी लागली (१७८७). इस्माईल बेग, गुलाम कादर वगैरेंनी दिल्ली, अलीगढ वगैरे ठाणी काबीज करून महादजीस चंबळा नदीच्या पलीकडे रेटले. या सुमारास गुलाम कादरने शाह आलमचे डोळे काढून त्याच्या जनानखान्याची बेअब्रू केली, तेव्हा महादजीने ताठर भूमिका सोडून पुणे दरबारची म्हणजे नाना फडणीसांची मदत मागितली. नानांनी अलीबहादरास त्याच्या मदतीस पाठविले (१७८८). त्यांनी शीख-जाट यांना मदतीस घेऊन गुलाम कादर व त्याचे सहकारी मुस्लीम सरदार आणि उदेपूर, जोधपूर, जयपूर आदी राजपूत राजे यांचा पराभव करून दिल्ली पुन्हा हस्तगत केली (१७८९-९०) आणि राजस्थानवर आपले वर्चस्व स्थापिले. हतबल शाह आलम यास पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसविले आणि गुलाम कादरखान व बेग यांस देहान्त शासन केले. त्यानंतर पातशाही कारभार महादजीने आपल्या हाती घेतला. अशाप्रकारे महादजीने आपल्या पराक्रमाने व कर्तृत्वाने सतलजापासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्याच्या सीमा भिडविल्या आणि उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा दरारा निर्माण केला.
उत्तर हिदुस्थानात सु. बारा वर्षे राहून तेथे सर्व स्थिरस्थावर झाल्यावर महादजी जून १७९२ मध्ये पुण्यास आला. सवाई माधवरावांनी त्याचा यथास्थित मानसन्मान केला. सुमारे पावणेदोन वर्षे तो पुण्यात स्वस्थच होता. अखेर एकाएकी नवज्वर होऊन पुण्याजवळील वानवडी येथे त्याचे निधन झाले. त्याची छत्री वानवडीस आहे. महादजीला अपत्य नव्हते. अखेर त्याने आपल्या जहागिरीच्या व्यवस्थेसाठी आपल्या भावाचा नातू दौलतराव याची निवड केली.
महादजीचा मूळ पिंड लढवय्या वीराचा असला, तरी तो राजकारणातही वाकबगार होता. युद्धप्रसंगी केव्हा लढावे व केव्हा माघार घ्यावी, याचे उत्तम ज्ञान त्यास होते. आपले लष्कर त्याने फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मदतीने सुसज्ज केले आणि शस्त्रास्त्रे तयार करून घेतली. दिल्लीवर कब्जा, राजस्थानात वर्चस्व व उत्तर हिदुस्थानात दरारा ही त्याची कामगिरी ऐतिहासिक महत्त्वाची आहे. महादजीस हिंदू तथा मुस्लीम साधुसंतांविषयी आदर होता. बीडच्या मन्सूरशाह वली या मुस्लीम साधूवर त्याची विशेष भक्ती होती. याशिवाय सोहिरोबानाथ आंबिये, लक्ष्मण महाराज रामदासी, शिरगावकर, मल्लप्पा, रासकर, दत्तनाथ राक्षसभुवनकर इ. साधुसंतांवर त्याची श्रद्धा होती. त्याला हिंदी, उर्दू, संस्कृत, फारसी या भाषा अवगत होत्या. महादजी मराठी व हिंदी भाषांत कविता करीत असे. त्याची कृष्णभक्तीवरील कवने उपलब्ध आहेत. तो कीर्तन करताना ती म्हणत असे. त्याने गीतेवर टीका लिहिली होती पण ती उपलब्ध नाही. त्याच्या आश्रयास सुखदेव वैद्य, बालमुकुंद मिश्र, सविता, सुरती मिश्र यांसारखे वैद्य, कवी तसेच गवई, तमासगीर, चित्रकार व पखवाजी होते. महादजीने उज्जैन, गोकुळ, वृंदावन, पुष्कर इ. ठिकाणी बांधकामे केली. राहत्या जांबगावास ‘माधवनगर’ हे नाव देऊन तिथे महाल बांधला. महादजी कडक शिस्तीचा होता आणि अत्यंत स्वाभिमानी होता. गुलाम कादर, कारस्थानी इस्माईल बेग यांस त्यांने फाशीची शिक्षा दिली, तर गोपाळराव (त्याने होळकरांविरुद्ध कारस्थान केले) व आनंदराव नरसिंग यांना त्यांच्या अपराधाबद्दल शिक्षा ठोठावल्या.
पहा : ग्वाल्हेर संस्थान शिंदे घराणे.
संदर्भ : १. गर्गे स. मा. संपा. मराठी रियासत, भाग ५, पुणे, १९९०.
२. सरलष्कर, वि. द. संपा. त्रैमासिक : भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे, अंक १-४,
शके १९१५-१६, मार्च १९९५.
देशपांडे, सु. र.