शास्त्री (भट्टाचार्य), शिवनाथ : (३१ जानेवारी १८४७– ३० सप्टेंबर १९१९). बंगाली लेखक व ⇨ ब्राह्मो समाजाचे एक नेते. माजिलपूर (जि. चोवीस परगणा) येथे एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबात जन्म. संस्कृत विषयातील एम. ए. तसेच १९६९ साली ब्राह्म धर्माची दीक्षा. ⇨ केशवचंद्र सेन यांच्याशी मतभेद होऊन शिवनाथांनी ‘साधारण ब्राह्मो समाज’ स्थापन केला (१८८१).
शिवनाथ शास्त्रींनी काव्य लिहून साहित्यक्षेत्रात प्रवेश केला. मेजबऊ (म. शी. मधली सून, १८७९), जुगांतर (१८९५) व नयनतारा या तीन कादंबऱ्या तसेच आत्मचरित (१९१८) आणि हिमाद्रिकुसुम (काव्य), रामतनु लाहिडी ओ तत्कालीन बंगसमाज (इतिहास) ही त्यांची पुस्तके उल्लेखनीय होत.
सनातनी हिंदू धर्माचा त्याग करून ब्राह्म धर्माचा स्वीकार करताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांना घरातून हाकलून देण्यात आले व त्यामुळे खडतर हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या आत्मचरित्रात उमटले आहे.
शिवानथ शास्त्री यांच्या कादंबऱ्या सामाजिक प्रबोधनपर असून त्यातील स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रिया शरत्चंद्र चतर्जींच्या नायिकांच्या पूर्वसूरी ठरतात. मेजबऊ व जुगांतर या कादंबऱ्यातून इंग्रजी शिक्षणाने धास्तावलेल्या तत्कालीन कर्मठ व पारंपरिक कौटुंबिक सामाजिक जीवनाचे चित्रण केलेले आहे. रवींद्रनाथ टागोरांनी जुगांतर कादंबरीची प्रशंसा केली होती. सोमप्रकाश या नियतकालिकाचे शिवनाथ शास्त्री हे संपादक होते.
सेन, सुकुमार (बं.) जोशी, श्री. बा. (म.)