शास्त्रीय उद्याने : (बोटॅनिकल गार्डन्स). आधुनिक युगातील वनस्पतिविज्ञानाच्या अभ्यासाचे एक प्रमुख अंग. जनतेत वनस्पतींची आवड निर्माण करून त्यांची शास्त्रीय माहिती उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. शास्त्रीय उद्यानांत भिन्नभिन्न कुलांतील वनस्पती विशिष्ट वर्गीकरण पद्धतींनुसार लावण्यात येतात त्यांची शास्त्रीय माहिती संकलित करून त्यांचे नमुने परिरक्षित व शुष्क स्थितीत ठेवण्यात येतात. या सर्वसामान्य कामाशिवाय काही शास्त्रीय उद्यानांत जगातल्या निरनिराळ्या भागांतून वनस्पती आणून त्यांची लागवड करणे, निरनिराळ्या वनस्पतींची ओळख करून देणे, वैज्ञानिक कार्यकर्त्यांना संशोधनाकरिता वनस्पती व बी पुरविणे, नवीन वनस्पतींचे प्रवेशन (इंग्रेशन) करणे, व्यावहारिक उपयोगाच्या किंवा औषधी वनस्पतींची शास्त्रीय माहिती संकलित करून त्यांची लागवड करणे, प्रजननाचे [⟶ वनस्पति-प्रजनन] प्रयोग करून नवीन संकरणे निर्माण करणे, वनस्पतींच्या निरनिराळ्या शाखांत संशोधन करणे यांसारखी इतर कार्येही चालू असतात. भिन्नभिन्न ऋतूंत कोणत्या प्रकारची झाडे लावली पाहिजेत व बाग कोणत्या झाडांमुळे व कशा रचनेमुळे सुंदर दिसू शकेल यासंबंधीची माहितीदेखील ही उद्याने जनतेला देतात. आधुनिक शास्त्रीय उद्यानांत प्रयोगशाळा, संग्रहालय, सभागृह, कर्मशाळा, प्रकाशने व ग्रंथालय इ. गोष्टींचीही सोय करण्यात येते आणि त्याकरिता जाणकार कर्मचारी नेमण्यात येतात. आधुनिक शास्त्रीय उद्यान हे विज्ञान, इतिहास, कला व संस्कृती यांचा उत्कृष्ट मिलाफ झालेले स्थान होय. भावी वनस्पतिविज्ञ आणि माळी यांच्यासाठी शास्त्रीय उद्यान ही एक उत्तम शाळा आहे.

इतिहास : प्राचीन काळापासून शास्त्रीय उद्याने अस्तित्वात आहेत. सुरुवातीस त्यांचे स्वरूप व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त वनस्पतींच्या बगीच्याचे होते. भारतात अशा प्रकारची उद्याने ⇨ हडप्पा व   ⇨मोहें-जो-दडो संस्कृतींच्या काळापासून अस्तित्वात असावीत. इ.स. पू. ६२३ च्या सुमारास शैव पंथीय लोक आश्रमात बागा तयार करीत आणि त्यांमध्ये साधुसंतांना उपयोगी पडतील अशा औषधी वनस्पती लावीत. राजा ⇨ बिंबिसारांच्या काळात (इ. स. पू. ५२८–५५४) मगध प्रदेशात औषधी वनस्पतींची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. गिरनार येथील सम्राट अशोकाच्या शिलालेखांवरून (इ.स. पू. २२०) असे दिसते की, त्यांनी औषधी वनस्पतींची उद्याने ठिकठिकाणी निर्माण करण्याची आज्ञा दिली होती. इ. स. १००१ च्या काळात भारतात औषधी वनस्पती, सुगंधी व शोभिवंत फुलझाडांच्या बागा जागोजाग तयार करण्यात येत. राजपूत व मोगलकालीन उद्यानांचे स्वरूप विशिष्ट साच्याचे होते. उद्यानाभोवती भिंतीचे कुंपण असे आणि मध्यभागी दोन रस्त्यांची आखणी कोणत्याही बाजूने येण्याच्या दृष्टीने करीत. या ठिकाणी एखादा चबुतरा बांधण्यात येई. रस्त्यांच्या मधोमध पाण्याचे हौद आणि कारंजे ठेवीत व बाजूला ठरावीक आकाराच्या वाफ्यात विविध प्रकारच्या वनस्पती लावीत. चीन (इ.स.पू. २८००) आणि ईजिप्त (इ.स.पू. १५००) या देशांतील शास्त्रीय उद्यानांच्या परंपराही प्राचीन आहेत. चीनला तर शास्त्रीय उद्यानांच्या इतिहासात खास महत्त्व आहे. कारण चीनच्या शन-नूंग या राजांनी फार दूरदूरच्या प्रदेशात लोक पाठवून अनेक औषधी व उपयुक्त वनस्पती आणल्या आणि त्यांची लागवड केली. हूण बादशहा वू डी (इ.स. पू. १४०–८६) यांनी आपल्या बागेत अनेक औषधी वनस्पतींची व वृक्षांची आणून लागवड केली. दालचिनी, कर्दळ, द्राक्षवेल, डाळिंब, काकडी, लसूणघास, कोथिंबीर व अक्रोड इ. वनस्पतींच्या प्रवेशनाचे श्रेय त्यांनाच देतात. ईजिप्तमध्ये तिसऱ्या थटमोझच्या काळात (इ.स.पू. १५००)  ⇨ऑलिव्हचे मळे व मंदिरातील उद्याने तयार करविण्यात आल्याची नोंद आढळते. ग्रीसमध्ये  ⇨ॲरिस्टॉटल यांनी वनस्पतींच्या अभ्यासाकरिता अथेन्स येथे (इ.स.पू. ३५०) उद्यान तयार केले होते व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शिष्य ⇨ थीओफ्रॅस्टस या उद्यानाचा पहिला संचालक बनला. देऊळ, चर्च किंवा मठ इत्यादींच्या आवारात बहुधा अशा प्रकारची उद्याने प्राचीन काळी तयार करीत.

पॅड्युआ विद्यापीठात १५०५ मध्ये उभारण्यात आलेले शास्त्रीय उद्यान युरोपातील सर्वांत जुने समजले जाते. आद्य पादपगृह (ग्रीन हाऊस) लायडन विद्यापीठाच्या उद्यानात १५९९ मध्ये बांधण्यात आले. ग्रेट ब्रिटनमध्ये पहिले शास्त्रीय उद्यान ऑक्सफर्ड विद्यापीठाने १६२१ मध्ये तयार केले. १६४६ मध्ये बर्लिन येथे शास्त्रीय उद्यान स्थापन करण्यात आले. फ्रांसमध्ये १३ वे लुई यांनी विद्यार्थ्यांकरिता एक बादशाही उद्यान बनवण्याची आज्ञा दिली आणि १६४० मध्ये ते जनतेला खुले करण्यात आले. स्वीडन देशात अप्साला येथे १६५५ मध्ये शास्त्रीय उद्यानाची स्थापना झाली. प्रख्यात वनस्पतिशास्त्रज्ञ ⇨ कार्ल लिनीअस हे त्यांचे संचालक होते (१७४२–७७), रशियात ⇨ पीटर द ग्रेट यांनी सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड) येथे १७१३ साली औषधी वनस्पतींसाठी उद्यान तयार केले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत फिलाडेल्फियाजवळ जॉन बार्ट्रम यांनी १७२८ मध्ये उद्यान बनविले. डेव्हिड होसॅक यांनी १८०१ मध्ये एल्जिन बोटॅनिकल गार्डनची न्यूयॉर्क शहरात स्थापना केली. केंब्रिज बोटॅनिकल गार्डन अमेरिकेतील मॅसॅचूसेट्‌स संस्थानात १८०७ साली निर्माण झाली. जिनीव्हा येथे १८१७ मध्ये शास्त्रीय उद्यानाची स्थापना झाली आणि थोड्याच काळात ते एक प्रमुख वनस्पती केंद्र बनले. याच काळात औषधी वनस्पती गोळा करणाऱ्यांनी स्वतःची खाजगी उद्याने तयार केली. ही उद्याने म्हणजे आधुनिक शास्त्रीय उद्यानांची पूर्वतयारीच होय. जॉन जेरार्ड यांचे लंडनजवळील अशा प्रकारचे उद्यान अतिशय प्रसिद्ध होते. हेन्री शॉ यांनी १८५९ मध्ये सेंट लूइस येथे एका शास्त्रीय उद्यानाची सुरुवात केली हेच पुढे मिसूरी बोटॅनिकल गार्डन या नावाने प्रसिद्ध झाले. सध्या जगामध्ये ६५० पेक्षा अधिक शास्त्रीय उद्याने आहेत.

जगातील प्रमुख शास्त्रीय उद्याने :रॉयल बोटॅनिकल गार्डन्स, क्यू (इंग्लंड) : याची स्थापना १७५९ मध्ये राजकन्या ऑगस्टा हिने क्यू येथील आपल्या राजवाड्यात नऊ एकर (३·६४ हेक्टर) जागेत केली. १८४१ मध्ये हे उद्यान सरकारच्या स्वाधीन करण्यात आले. ⇨ सर विल्यम जॅक्सन हूकर आणि ⇨ सर जोसेफ डाल्टन हूकर यांच्या काळात त्याचा अधिक विकास झाला. उद्यानाचे क्षेत्रफळ सु. १२० हेक्टर असून त्यात सु. ४५ हजार वनस्पतींच्या जाती आणि प्रकार लावलेले आहेत. वनस्पतिसंग्रहात ३० लाखापेक्षा अधिक नमुने आहेत. यांशिवाय वनस्पतिविज्ञानविषयक सु. ५०,००० ग्रंथ असलेले ग्रंथालय, व्यावहारिकदृष्ट्या उपयुक्त वनस्पतींचे संग्रहालय, वनस्पतींचे वर्गीकरण आणि शारीरविषयक संशोधन यांकरिता जॉड्रेल प्रयोगशाळा असे विभाग आहेत. तेथे फुलांची चित्रे असलेली कलावीथी (आर्ट गॅलरी) असून जिवंत वनस्पतींच्या विभागात नागफणा व कित्येक निवडुंगांचे प्रकार व जाती यांचे संवर्धन करणारा कक्ष, समशीतोष्ण गृह, ओषधि-उद्यान, जलोद्यान, जंगल वनस्पतींचे उद्यान, वेळूंचे उद्यान, शैलोद्यान (रॉक गार्डन) इ. उपविभाग आहेत. शिवाय एक सरोवर व सु. २५ काचगृहे आहेत. या शास्त्रीय उद्यानातर्फे क्यू बुलेटिन नावाचे नियतकालिक व ग्रंथ प्रसिद्ध होतात.


न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डन : हे उद्यान न्यूयॉर्क शहरातील एका उपनगरात वसले असून त्याची स्थापना १८९४ मध्ये झाली. त्याचे क्षेत्रफळ सु. २०० हेक्टर असून तेथे १२ हजारांवर वनस्पतींच्या जाती आहेत. ग्रंथालयात एक लाख ७० हजार ग्रंथ व वनस्पतिसंग्रहात ४० लाखांवर नमुने आहेत. उष्णकटिबंधीय वर्षारण्यातील झाडे येथील पादपगृहात लावली आहेत. याशिवाय गुलाब उद्यान, शंकुमंत वृक्ष उद्यान वगैरे उपविभाग आहेत. तसेच उद्यानाला जोडून संग्रहालय, सभागृह आणि प्रयोगशाळाही आहे. वनस्पतींचे पोषण, रोग आणि त्यांचे निवारण, जीवनसत्त्वे, प्रतिजैव पदार्थ इ. विषयांवर तेथे संशोधन करण्यात येते.

मिसूरी बोटॅनिकल गार्डन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील सेंट लुइस येथे १८५९ मध्ये हेन्री शॉ यांनी या उद्यानाची स्थापना केली. या ठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पतींखेरीज सहा पादपगृहे, ८० हजार ग्रंथांनी सुसज्ज ग्रंथालय, २५ लाख नमुन्यांचे वनस्पतिसंग्रहालय व प्रयोगशाळा आहे.

रॉयल बोटॅनिकल गार्डन, मेलबर्न ( ऑस्ट्रेलिया) : हे उद्यान ब्रिटिश राजवटीत तयार झाले. ३६ हेक्टर क्षेत्रफळाच्या या उद्यानात वनस्पतींचे २० हजार प्रकार, १५ लाख नमुने, १३ पादपगृहे आहेत. जगभरातील माडांचा संग्रह हे याचे खास वैशिष्ट्य मानतात. मूळ ऑस्ट्रेलिअन वनस्पतींचेही येथे जतन केले जाते.

नॅशनल बोटॅनिकल गार्डन, किर्स्टेनबाख (द. आफ्रिका) : ५६० हेक्टर क्षेत्रफळाचे हे उद्यान १९१३ मध्ये निर्माण करण्यात आले. येथे ९ पादपगृहे असून दक्षिण आफ्रिकेतील बहुतेक वनस्पतींचा संग्रह आहे. अनुकूल जलवायुमानामुळे दक्षिण आफ्रिकेतील शोभेच्या मूळ वनस्पतींनी येथे चांगला तग धरल्याचे दिसून येते.

भारतातील प्रमुख शास्त्रीय उद्याने : इंडियन बोटॅनिकल गार्डन, कोलकाता : हे आशिया खंडातील बहुधा सर्वांत मोठे शास्त्रीय उद्यान आहे. स्थापना १७८७, पहिले नाव रॉयल बोटॅनिकल गार्डन सध्याचे नाव १९४७ मध्ये दिले गेले. हे उद्यान सिबपूर येथे हुगळी नदीच्या तीरावर वसले आहे. याचे क्षेत्रफळ सु. १०० हेक्टर असून १२,००० वर वनस्पतींच्या जाती येथे लावल्या आहेत. चार काचगृहे, पाच पादपगृहे आणि दोन खास निवडुंग जतनगृहे येथे असून प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाची सोयही आहे. ग्रंथसंख्या सु. ३० हजार आहे. उद्यानविज्ञान, पुष्पसंवर्धन, परागविज्ञान, वनस्पतींचे शरीरक्रियाविज्ञान, जीवरसायनशास्त्र, वर्गीकरणविज्ञान इ. विषयांवर येथे संशोधन करण्यात येते. १९६२ पासून ह्या उद्यानाचे व्यवस्थापन ⇨भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या केंद्रीय संस्थेकडे सोपविण्यात आले आहे.

नॅशनल बोटॅनिकल गार्डन्स, लखनौ : हे उद्यान लखनौ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून १९५३ पासून ते ⇨कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, नवी दिल्ली या संस्थेचा एक भाग आहे. इ. स. १८०० मध्ये लखनौचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह यांनी सिकंदर महाल बेगम या आपल्या आवडत्या राणीच्या नावाने ही शाही बाग तयार केली. तिचा विस्तार गोमती नदीच्या पश्चिम तीरावर आहे. उद्यानात नवीन वनस्पती आणून लावणे व त्यांचे संवर्धन करणे, वर्गीकरणविज्ञान, वनस्पतिसंग्रह, आकारविज्ञान, परागविज्ञान, वनस्पतिरोगविज्ञान, ऊतकसंवर्धन, वनस्पतींचे शरीरक्रियाविज्ञान, आनुवंशिकी, वनस्पतिरसायनशास्त्र आदी वनस्पतिविषयक विविध अंगांनी येथे भरीव कार्य केले जाते. अनेक विद्यापीठांनी पदव्युत्तर व पीएच. डी.साठीच्या संशोधनासाठी या उद्यानास मान्यता दिली आहे.

बोटॅनिकल गार्डन, ऊटकमंड : तमिळनाडू राज्याच्या कृषिविभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या या उद्यानाची निर्मिती १८४७ साली झाली. वनस्पतिसंग्रहात पाच हजारांवर शुष्क नमुने आहेत. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या कोईमतूर येथील शाखेला हे नमुने देण्यात आले. येथे दहा काचगृहे आहेत.

लॉईड बोटॅनिकल गार्डन, दार्जिलिंग : पश्चिम बंगाल राज्य शासनाच्या अखत्यारीत हे उद्यान असून १८७८ मध्ये तयार झाले. १६ हेक्टर क्षेत्रफळाच्या या उद्यानात सु. २,००० वनस्पतींच्या जाती आहेत. पूर्व हिमालय आणि म्यानमारातील मूळच्या वनस्पती शंकुमंत वनस्पती आणि भिन्न देशांतील वनस्पती अशा तीन गटांत त्यांची विभागणी केली आहे.

उष्णकटिबंधीय वनस्पतिशास्त्रीय उद्यान व संशोधन संस्था, पच-पलोड (केरळ) : १९७९ मध्ये याची निर्मिती झाली. येथे वनस्पतिवैज्ञानिक, उद्यानविद्या व जैवतांत्रिक संशोधनांसाठी उद्यान, वृक्षोद्यान व प्रयोगशाळा आहे. दुर्मीळ व नामशेष होत चाललेल्या वनस्पतींच्या जातींचे संवर्धन, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पतींवर संशोधन व त्यांचा विकास इ. कामेही येथे केली जातात. ग्रंथालयात ३,५०० ग्रंथ असून वनस्पतिसंग्रहात ७,५०० नमुने आहेत. १५ हजारांहून जास्त वाहिनीवंत वनस्पतींचे नमुने जतन केले आहेत.

पाहा : उद्याने व उपवने वनस्पतिसंग्रह वनस्पतींचे वर्गीकरण वृक्षोद्यान.

संदर्भ : Hyams, Edward, Great Botanical Gardens of the World, New Jersey, १९६९.

ज्ञानसागर, वि. रा.


शास्त्रीय उद्याने


हंटिग्टन शास्त्रीय उद्यान (लॉस अँजेल्स, कॅलिफोर्निया). विविध आकृत्यांच्या स्वरूपात आणि २ ते ५० सेंमी. उंची असलेल्या कंटाल (कॅक्टस) वनस्पती.एडिंबरो शास्त्रीय उद्यान (स्कॉटलंड). ऱ्होडोडेंड्रॉन प्रजातीच्या (ॲझेलिया प्रजातीसह) फुलझाडांकरिता जगप्रसिद्ध.

पॅड्युआ शास्त्रीय उद्यान (इटली). १५४५ सालातील वैशिष्ट्यपूर्ण मांडणी.