शार्लट : अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलायना राज्यातील मेक्लनबुर्क परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५,२०,८२९ (१९९९ अंदाज). राज्याच्या दक्षिणमध्य भागातील पीडमॉंट प्रदेशात कटॉब नदीजवळ हे शहर वसले आहे. साउथ कॅरोलायना राज्याच्या सरहद्दीपासून उत्तरेस १६किमी. अंतरावर शार्लट आहे.

पेनसिल्व्हेनिया, न्यू जर्सी व व्हर्जिनिया वसाहतींमधून आलेल्या ब्रिटिश, स्विस व जर्मन स्थलांतरितांनी इ.स. १७५० मध्ये शार्लटची स्थापना केली. हे नाव इंग्लंडचा राजा तिसरा जॉर्ज याची पत्नी शार्लट सोफिया हिच्या स्मरणार्थ देण्यात आले. १७७४ मध्ये हे परगण्याचे मुख्य ठिकाण बनले. इंग्रजांच्या जोखडातून मेक्लनबुर्कच्या स्वातंत्र्याची घोषणा येथेच करण्यात आली (२० मे. १७७५).

कॅरोलायना औद्योगिक पट्ट्यातील शार्लट हे एक आघाडीचे औद्योगिक, व्यापारी, वाहतूक व वित्तीय केंद्र आहे. वस्त्रोद्योगासाठी ते विशेष महत्त्वाचे असून त्याशिवाय रसायने, फर्निजर, यंत्रे, खाद्यपदार्थ, मुद्रणसाहित्य, विमानाचे सुटे भाग, संगणक, कागद-उत्पादने इ. उद्योगधंदे येथे चालतात. कटॉब नदीवर जलविद्युत निर्मितीचे केंद्र आहे. कॅलिफोर्नियात सोन्याच्या खाणींचा शोध लागेपर्यंत (१८४९) शार्लटचा परिसर सोन्याच्या उत्पादनात अग्रेसर होता. १८३७–६१ व १८६७–१९१३ या काळात येथे टाकसाळही होती.

नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठ (१९४६), क्वीन्स कॉलेज (१८५७), जॉन्सन सी. स्मिथ विद्यापीठ (१८६७), किंग्ज कॉलेज (१९०१), सेंट्रल पीडमाँट कम्युनिटी कॉलेज (१९६३) या प्रमुख शैक्षणिक संस्था येथे आहेत. जगप्रसिद्ध शार्लट कॉलॉसिअम (रोमन रंगमंडल), शार्लट सिंफनी वाद्यवृंद, रॉक हाउसमधील ऐतिहासिक संग्रहालय, अनेक उद्याने, जलक्रीडा व नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेली कटॉब व नॉर्मन सरोवरे इ. सांस्कृतिक व मनोरंजनाची केंद्रे येथे आहेत. राष्ट्राध्यक्ष अँड्रू जॅक्सन (कार. १८२८-३६) व जेम्स के. पोक (कार. १८४५–४९) यांचा जन्म येथून जवळच असलेल्या अनुक्रमे वॅक्सहॉ व पाइनव्हिल या गावी झाला.

चौधरी, वसंत