शांताराम :  (१५ जून १९२३ –    ). आधुनिक मराठी कथाकार. मूळ नाव केशव जगन्नाथ पुरोहित. `शांताराम’ या टोपणनावाने लेखन. जन्म नागपूर येथे. इंग्रजी विषय घेऊन ते एम. ए. झाले. १९४६ ते १९६२ या काळात नागपूर, अमरावती येथील आणि १९६२ ते १९८१ या कालावधीत जोगेश्वरी (मुंबई) येथील शासकीय महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. जोगेश्वरीच्या ईस्माईल युसूफ कॉलेजचे ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले (१९८१).   

शांताराम यांनी विविध प्रकारचे लेखन केले असले, तरी त्यांची मुख्यत्वे ख्याती आहे, ती कथाकार म्हणूनच. १९४२ साली ‘संत्र्यांचा बाग’ या नावाने त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. पुढे त्यांचे मनमोर (१९४४), शिरवा (१९५७), जमिनीवरची माणसं (१९६०), लाटा (१९६६), चंद्र माझा सखा (१९६९), अंधारवाट (१९७७), उद्विग्न सरोवर (१९८२), चेटूक (१९८४), संध्याराग (१९९०) हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांना या क्षेत्रातला स्वत:चा सूर गवसला तो त्यांच्या ‘शिरवा’ या कथासंग्रहापासून. पुढे कथाकार म्हणून त्यांचा लौकिक वाढतच गेला. त्यांचे काही लेखन गुजराती, बंगाली इ. इतर भारतीय भाषांतूनही अनुवादित झाले आहे. शांताराम यांच्या निवडक मराठी कथांचे काही संपादित संग्रहही प्रसिद्ध झाले आहेत (उदा., निवडक शांताराम (१९८८), संपा. विलास खोले).

शांताराम यांनी मराठीप्रमाणे इंग्रजीतही काही लेखन केले आहे. त्यालाही मान्यता मिळून न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रिब्यूनचे आंतरराष्ट्रीय पारितोषिकही त्यांना मिळाले (९१५१). प्रभा केशव पुरोहित यांच्या साहाय्याने शेक्सपिअरच्या रोमिओ अँड ज्यूलियट नाटकाचा कथारूप स्वैर मराठी अनुवादही (१९५९) केला. त्यांचे काही लघुनिबंध ‘सावळाचि रंग तुझा’ (१९५०) या पुस्तकात आहेत. त्यांचे काही आत्मचरित्रपर लेखनही ‘व्रात्यस्तोम’ (१९९५) या पुस्तकात संकलित केले आहे.

अमरावती येथे १९८९ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्य संस्कृती मंडळाच्या कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते.

शांताराम यांची कथा मराठी नवकथेशी संबद्ध असली, तरी ती नवकथेच्या तंत्रमंत्रात अडकून पडणारी नाही. त्यांच्या कथेला स्वत:चा असा एक वैशिष्ट्यपूर्ण चेहरामोहरा आहे. त्यांच्या कथांतून आधुनिक जीवनवृत्तीचे विविध पैलू प्रत्ययपूर्ण रीत्या प्रकट होत असले, तरी पारंपरिक जीवनातील काही वैशिष्ट्यपूर्ण गुणांची दखलही त्या घेतात. माणूस जुन्या काळातील असो व नव्या, त्याला त्याच्या अंगभूत गुणदोषांसकट सहानुभूतीने समजून घेणे, हा शांताराम यांच्या लेखनप्रकृतीचा एक स्पृहणीय विशेष आहे. त्यामुळे त्यांच्या कथेत परंपरेचे उल्लंघन करणाऱ्या जशा काही व्यक्ती येतात, त्याचप्रमाणे परंपरापालनात स्थिरावलेल्या व्यक्तीही आढळतात. जातिसंस्था व कुटुंबसंस्था यांमधील ताणतणावांचे दर्शनही शांतारामांची कथा हळुवारपणे घडविते. नवकथा अधिकतर प्रमाणात व्यक्तिकेंद्री वाटते, तर शांतारामांची कथा परंपरा व नवता यांचे संतुलन साधू पाहते. इंग्रजी साहित्याच्या अध्ययन-अध्यापनात सारी हयात वेचूनही शांतारामांचे मूळ देशीपणाचे भान सुटत नाही. त्यामुळे त्यांची कथा वैशिष्टपूर्ण ठरते. एका समीक्षकाने `गृहस्थाची कथा’ असे त्यांच्या कथांचे वर्णन केले आहे.

माणसाला त्याच्या अंगभूत गुणदोषांसकट सहानुभूतीने समजून घेणे, हे साहित्याचे प्रधान कार्य असते. मराठीतील नवसाहित्यकाळात हे कार्य अपेक्षेप्रमाणे झाले नाही, त्यात एकेरीपण प्रविष्ट झाले आहे, ते दूर होण्याची निकड आहे, असे विचार त्यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडले (१९८९).

आपल्या या भूमिकेला अनुसरूनच शांताराम यांनी प्रामुख्याने कथालेखन केले. समकालीन कथाकारांच्या तुलनेत शांताराम याची कथा वेगळी उमटून दिसते ती यामुळेच.

संदर्भ : १. खोले, विलास, संपा. शांताराम कथा, पुणे, १९९९.  

             २. पाटणकर, रा. भा. कथाकार शांताराम, मुंबई, १९८८.  

कुलकर्णी, गो. मा.