शांतादुर्गा : गोव्यातील एक प्रसिद्ध देवता. गोव्याच्या फोंडे महालातील कवळे ह्या गावी तिचे मंदिर आहे. जुने मंदिर जुवारी नदीकाठच्या केळोशी गावी होते. पोर्तुगीजांच्या जाचामुळे तेथील देवीची मूर्ती सध्याच्या ठिकाणी हलवण्यात आली.
ही देवता मूळ त्रिहोत्रपूर वा तिरहूत येथील असून काही ब्राह्मणांनी ती आपल्याबरोबर गोव्यात आणली, असे म्हटले जाते. मिथिला देशाच्या बारा नावांपैकी ‘तैरभुक्ती’ हे एक असून त्याचा अपभ्रंश त्रिहोत्र असा झाला असावा, असे काही अभ्यासकांचे मत आहे. असेही म्हटले जाते की, पूर्वी कान्यकुब्ज देशातून रामेश्वरच्या यात्रेला गेलेले काही ब्राह्मण परतवाटेवर असताना गोव्यात त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाला आणि ते तेथेच राहिले. देवशर्मा, लोकशर्मा आणि शिवशर्मा हे त्यांतील प्रमुख होते. कवळे येथील शांतादुर्गामंदिराच्या खालच्या बाजूस शिवशर्मा ह्यांची एक छोटीशी घुमटी आहे.
देवीच्या शांतादुर्गा ह्या नावाचे स्पष्टीकरण तिची जन्मकथा सांगून दिले जाते, ते असे : एकदा शिव आणि विष्णू ह्यांच्यात युद्ध सुरू होऊन ते दीर्घकाळ चालू राहिले. त्यात कोणालाही विजय मिळण्याची शक्यता दिसेना. हे युद्ध थांबल्याखेरीज विश्वव्यवस्था सुरळीतपणे चालणार नाही, हे ध्यानी घेऊन ब्रह्मदेवाने आदिशक्ती जगदंबेला युद्धभूमीवर पाठवले. तिने या दोघांना उपदेश करून ते युद्ध थांबवले व शांतता प्रस्थापित केली, म्हणून ती ‘शांतादुर्गा’ ह्या नावाने ओळखली जाऊ लागली. शैव-वैष्णवांमधील वाद मिटावा, ही दृष्टी ह्या कथेमागे दिसून येते.
शांतादुर्गेचे कवळे येथील मंदिर भव्य असून गाभाऱ्यात देवीची सुंदर पंचलवी (पंचरसी) मूर्ती आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंस मोठ्या धर्मशाला आहेत. तेथील परिसरात परिवार देवता आणि एक उंच दीपमाळ आहे. देवीचा मुख्य उत्सव केळोशी येथील प्रथेप्रमाणेच माघ शुद्ध पंचमीस होतो.
पहा : दुर्गा.
संदर्भ : प्रभुदेसाई, प्र. कृ. आदिशक्तीचे विश्वस्वरूप (देवीकोश), खंड २ रा, पुणे, १९६८.
कुलकर्णी, अ. र.