शहाजिरे : (शाहजिरे हिं. स्थाहजीरा, शाहजिरा, काला जिरा, सिया जिरा गु. शाजिरूं क. शाजिरगे इं. अर्थ-नट, ब्लॅक कॅरॅवे लॅ. कॅरम नायग्रम, कॅ.बल्बोकॅस्टॅनम: कुल-अंबेलिफेरी). ह्या नावाची पक्व व सुकलेली फळे (बीजे) मसाल्याचा एक पदार्थ म्हणून बाजारात मिळतात. शहाजिरे जिच्यापासून मिळतात, ती वनस्पती सुमारे १५– १७ सेंमी. उंच, सरळ, फांद्या असलेली, अनेक वर्षे जगणारी ⇨ ओषधी (लहान व नरम वनस्पती) फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] आहे. ही मूळची युरोप, बलुचिस्तान, अफगाणिस्तान व काश्मीर येथील असून सु. १,८००–३,३००मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात वाढते. पूर्वेस गढवाल व कुमाऊँपर्यंत ही पसरली आहे. लागवडीतील जमिनीत ती तणासारखी आढळते तसेच डोंगरांच्या गवताळ उतरणीवर ही जंगली अवस्थेत सापडते. शहाजिऱ्याच्या प्रजातीत (कॅरममध्ये) एकूण सुमारे ३० जाती असून भारतात फक्त तीन जाती आढळतात. डेन्मार्क, नेदर्लंड्स, पोलंड, लेबानन, रशिया व इथिओपिया येथे शहाजिऱ्याची गवड होते. भारतात काश्मिरात १,८६०–२,७९०मी. उंचीपर्यंत व बंगाल, बिहार, ओरिसा, पंजाब व आंध्र प्रदेश येथे शहाजिऱ्याची लागवड केली जाते. ह्या वनस्पतीची मुळे मांसल व पाने दोनदा किंवा तीनदा पिसासारखी विभागलेली व टोकांस फारच अरुंद व रेषेप्रमाणे असतात. हिची लहान पांढरी फुले चवरीसारख्या फुलोऱ्यावर येतात. फळे शुष्क, लहान, पिवळट तपकिरी, काहीशी चिकट, जिऱ्यापेक्षा बारीक व बीजाला पूर्णपणे वेढून असतात. तडकल्यावर फळाचे दोन भाग (पाली) बारीक दांड्यास चिकटून लोंबतात [आंदोलिपाली → फळ] आणि त्यावर कंगोरे व खोबणी असतात. याचा वास सुसह्य आणि स्वाद उग्र व काहीसा तीक्ष्ण असतो. ह्या फळांनाच `शहाजिरे’ म्हणतात. या वनस्पतीची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ अंबेलेलीझ अथवा चामर गणात वर्णन केल्याप्रमाणे असतात.शहाजिरे दीपक (भूक वाढविणारे), वायुनाशी (पोटात गुबारा धरण्यास प्रतिबंधक), सुगंधी, तिखट, उष्ट असून अजीर्ण, ज्वर, कफ, सूज इत्यादींवर गुणकारी असतात. तसेच ते दुग्धोत्पादक असून ओव्याप्रमाणे गरम मसाल्यात घालतात. त्यांत दोन टक्के उडून जाणारे तेल असते. याच्या पिठूळ मुळांची भाजी करतात. शहाजिऱ्यामुळे कपड्यांना कसर लागत नाही.
पहा : ओवा जिरे फळ मसाले मसाल्याची पिके.
परांडेकर, शं. आ.