शतावरी : [ हि. सतावर, सतावरी, सतमुली, सरनोई गु. शतावरी क. सतावरी, सिप्रिमुली सं. शतावरी, नारायणी, अतिरसा, वरी, श्वेतमुळी, स्वादुरस इं. वाइल्ड अँस्परॅगस लॅ. अँस्परॅगस रॅसिमोसस, प्रकार जॅवॅनिका कुल-लिलिएसी]. फुलझाडांपैकी काटेरी, बहुवर्षायू झाळकट वेल. आशियातील व आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, जावा, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका येथे व भारतात हिमालयात १,२०० मी. उंचीपर्यंत, काश्मीरपासून पूर्वेकडे तसेच सह्याद्री, सातपुडा पर्वतरांगांत, कोकणात खडकाळ जमिनीवर, डोंगर उतारावर व जंगलात शतावरी आढळते. जमिनीवरील खोडावर हिला अनेक कोनयुक्त फांद्या असतात. या फांद्यांना पर्णकांडे म्हणतात. शिवाय जाडजूड मूलक्षोड (जमिनीत वाढणारे खोड) असते. त्यावर काही मांसल मुळे असतात. पाने लहान, रेषाकृती किंवा खवल्यावरती व त्यांच्या तळाशी सरळ किंवा वाकडे लहान काटे असतात आणि बगलेत काटेरी टोकाच्या पानासारख्या खोडांचे त्रिकोनी हिरवी बारीक झुबके येतात. फुले पांढरी, लहान, सुवासिक १-२ मंजिऱ्यावर नोव्हेंबर ते जानेवारीत येतात. संरचना व इतर शारीरिक लक्षणे ⇨लिलिएसी कुलात (किंवा पलांडू कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ मृदू, गोलसर, लहान, रसाळ व लाल तांबडे असते. बिया लहान, बुळबुळीत व काळ्या असतात. जून ते ऑगस्ट महिन्यात फुले, फळे येतात.
ही वनस्पती लागवडीसाठी सोपी आहे. हिची लागवड बियांपासून व जमिनीतील खोडाच्या फुटव्यापासून करता येते. लागवड खर्च तसा कमी आहे. रोग व किडी यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. कमी पाण्यात ती येऊ शकते. लागवड पावसाळ्यात किंवा पाणी उपलब्ध असल्यास केव्हाही करतात. मध्यम ते हलकी, रेताड, गाळाची, उताराची, चांगल्या निचऱ्याची जमीन चालते. नवीन बियांची उगवणक्षमता चांगली असते. हिची लागवड फायदेशीर असून व्यापारी तत्त्वावर ती अनेक ठिकाणी केली जात आहे.
साधारणतः सव्वा वर्षानंतर शतावरीच्या मुळ्यांची पूर्ण वाढ झालेली दिसते. शतावरीची मांसल मुळे गोड, शामक, प्रशीतकर (थंडावा देणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), वाजीकर (कामोत्तेजक), डोळ्यांना हितकारक, आकडी बंद करणारी, दुग्धवर्धक, अतिसार व आमांशावर गुणकारी असतात. सौंदर्यप्रसाधनातही त्यांचा वापर करतात. शतावरीच्या तेलास नारायण तेल म्हणतात. हे तेल सर्व प्रकारच्या वातांवर गुणकारी आहे.
शतावरीच्या सु. २० जाती भारतात आढळतात. त्यांपैकी अँ. गोनोक्लॅडस ही जाती कोकण, उ. कारवार, सह्याद्री, तमिळनाडू, श्रीलंका इ. ठिकाणी सापडते.
सफेद मुसळी : (गु. धोळी-उजली-मुसली, अँ. अँडसेन्डेन्स). ही शतावरीच्या प्रजातीतील जाती असून मूलतः ही द. युरोपातील आहे. भारतात ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब व हिमालयात (१,६४२ मी. उंचीपर्यंत) आढळते. श्रीलंकेत व अफगाणिस्तानातही ती सापडते. पावसाळ्यात रानावनात किंवा खाऱ्या दलदलीत ही उगवते. शतावरीच्या इतर जातींप्रमाणे हिचे मूलक्षोड असते. जमिनीवरचे खोड आरोही व अनेक फांद्यांचे असते. पर्णक्षोडे गोल, पांढरट व बारीक असतात.
अँ. ऑफिसिनॅलिस ही शतावरीची एक खाद्य जाती बहुवर्षायू ओषधी आहे. ही मूळची युरोपीय व प. आशियायी असून सु. २,००० वर्षे विशेषतः भाजीसाठी लागवडीत आहे. मुळे व बियांपासून तिची नवीन लागवड करतात त्यामुळे वारंवार लागवड करावी लागत नाही.
अँ. प्लूमोसस ही दक्षिण आफ्रिकेत आढळणारी जाती फक्त शोभेकरिताच लावतात. हिला अँस्परॅगस फन असेही म्हणतात.
पुण्यामधील आघारकर संशोधन संस्था (महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी) येथे शतावरीवर संशोधन चालू असून, राज्यातील शतावरीच्या रानटी, लागवडीतील, तसेच शोभेच्या जातींचे संकलन व अभ्यास करून त्यांतून सुधारित वाण विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
परांडेकर, शं. आ. कुलकर्णी, सतिश वि.