व्ह्रीस, ह्यूगो द : (१६ फेब्रुवारी १८४८–२१ मे १९३५). डच वनस्पतिवैज्ञानिक. वनस्पतींतील क्रमविकास ⇨उत्परिवर्तनाने म्हणजे नवीन विशेष प्रकारचे शारीरिक फरक अचानक घडल्याने होतो. ही उपपत्ती त्यांनी प्रथम मांडली. तसेच क्रमविकासातील नवीन संशोधन प्रयोगिक पद्धतीने करता येते, हेही त्यांनी सिद्ध केले. त्यांचा जन्म हार्लेम (नेदर्लंड्स) येथे झाला. शिक्षण लायडन, हायडलबर्ग व वुर्टसबर्ग येथे. जीवविज्ञान व रसायनशास्त्र हे त्यांचे अध्ययनाचे विषय होते. १८७१ मध्ये ते अँम्स्टरडॅम विद्यापीठात प्रथम अध्यापक व नंतर १८७८ मध्ये वनस्पतिक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले. ईव्हिनिंग प्रिमरोझ (इनोथेरा लामार्कियाना) या बागेत लावलेल्या फुलझाडाचे काही नवीन प्रकार बाहेर पडीत रानात उगवलेले व फुललेले पाहिल्यावर वनस्पतींतील क्रमविकासाकडे त्यांचे लक्ष वळले [⟶ क्रमविकास]. प्रयोगांनी क्रमविकासाचा अभ्यास करणे शक्य आहे असे त्यांना जाणवत होते. पुढे संकरणाचे अनेक प्रयोग करून त्यांनी आनुवंशिकतेची उपपत्ती तयार केली. त्यांच्याप्रमाणेच कार्ल कॉरेन्स व एरिख केरमाक यांनीही तशीच उपपत्ती स्वतंत्रपणे शोधून काढली (१९००). तथापि हाच शोध पूर्वी ⇨ग्रेगोर योहानमेंडेल यांनी लावला असून तो प्रसिद्ध झाला असल्याचे आढळून आले. ईव्हिनिंग प्रिमरोझ या फुलझाडावरच्या संवर्धन प्रयोगात व्हरीस यांना अनेक नवीन प्रकार सहज, एकदम, अनपेक्षितरीत्या मोठे बदल होऊन मिळाले व त्यांनी या बदलाला ⇨उत्परिवर्तन असे नाव दिले. तत्पूर्वी ⇨चार्लस रॉबर्ट डार्विन यांनी लहान बदल हळूहळू साचत जाऊन क्रमविकास होतो, असे प्रतिपादन केले होते, परंतु त्याबद्दल इतरांनी साशंकता दर्शविली होती. त्यामुळे ही नवी उपपत्ती स्वीकार्य वाटली. जीवनार्थ स्पर्धेमध्ये या मोठ्या फरकांना उपयुक्तता-मूल्य मिळाले.
व्ह्रीस यांनी ⇨तर्षण व प्राकल-कुंचन (कोशिकेच्या बाहेरून पाणी काढल्यावर होणारे जीनद्रव्याचे आकुंचन) यांसंबंधीचे काही संशोधन केले आहे. वनस्पतींच्या मुळांवर होणारा उष्णतेचा परिणाम यांसंबंधीचे त्यांचे संशोधन (१८६९-७०) प्रसिद्ध झाल्यावर ग्रोनिंगेन विद्यापीठाने त्यांना सुवर्ण पदक बहाल केले होते. सेवानिवृत्तीनंतरही (१९१८) त्यांचे प्रायोगिक संशोधन चालूच होते. व्हरीस यांचे प्रमुख ग्रंथ असे आहेत: (१) इंट्रासेल्यूलर पॅंजेनेसिस (१८८९), (२) म्यूटेशन थिअरी (१९००-०३, इं. भा. १९१०-११), (३) ल्टँट ब्रीडिंग (१९०७).
अँम्स्टरडॅम येथे त्यांचे निधन झाले.
जमदाडे, ज.विपरांडेकर, शं.आ.