व्होल्गोग्राड : (त्सरीत्सन, स्टालिनग्राड). रशियातील व्होल्गोग्राड प्रांताचे मुख्यालय. लोकसंख्या ९,९९,००० (१९८९). व्होल्गा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर त्सरीत्सा या छोट्याशा नदीच्या दोन्ही तीरांवर हे वसलेले आहे. व्होल्गा नदीच्या मुखापासून ४०० किमी. आत हे नदीबंदर आहे. दुसऱ्या महायुद्धातील प्रसिद्ध स्टालिनग्राडची लढाई येथीलच.
तेराव्या शतकात व्होल्गोग्राडच्या सभोवतालचा प्रदेश तातारांसारख्या लुटारू टोळ्यांच्या ताब्यात होता. पुढे सोळाव्या शतकात हा भाग कझॅन व ॲस्ट्राखान टोळ्यांनी बळकावला. त्याच वेळी रशियनांनी त्सरीत्सा नदीतीरावरील त्सरीत्सन या तटबंदियुक्त नगराची स्थापना करून पुढे तेथे एक गढी बांधली. हे मोक्याचे ठिकाण होते. १६७० मध्ये कझाक बंडखोर स्ट्येन्का रॅझिन याने हे ताब्यात घेतले. पुगचॉफ बंडात (१७७३ –७५) हेच महत्त्वपूर्ण स्थान होते. एकोणिसाव्या शतकात त्सरीत्सनचे लष्करी महत्त्व कमी झाले, पण त्याचे व्यापारी महत्त्व उत्तरोत्तर वाढतच गेले. डॉन – व्होल्गा या नद्यांच्या दरम्यान होणाऱ्या मालवाहतुकीचे, तसेच डोनेट्स खोऱ्यातील कोळसा, कॉकेशसमधील खनिज तेल व उत्तर रशियातील लाकूड यांच्या चढउतारासाठी हे विशेष सोयीचे ठाणे होते. १९५२ मध्ये व्होल्गा-डॉन यांदरम्यान काढलेला कालवा, तसेच नव्याने निर्माण झालेली लोहमार्ग-सुविधा यांमुळे त्याचे महत्त्व अधिकच वाढले. रशियन क्रांतीनंतरच्या यादवी युद्धात जोजेफ स्टालिनच्या नेतृत्वाखाली रेड आर्मीने व्हाइट आर्मीला या नगरातून हुसकावून लावल्यामुळे त्याच्या गौरवार्थ शहराला स्टालिनग्राड असे नाव देण्यात आले (१९२५).