व्हेसेलिअस, अँड्रिअस : (३१ डिसेंबर १५१४–? जून १५६४). युरोपच्या प्रबोधन काळातील फ्लेमिश वैद्य. त्यांनी जीवविज्ञानाच्या अध्ययनात क्रांती घडवून आणली. मानवी शरीराच्या रचनेचे वर्णन करून त्यांनी वैद्यकीय व्यवसायातही मोठे परिवर्तन घडवून आणले. स्वत: केलेल्या शरीरविच्छेदनांवरील निरीक्षणांचा आधार घेऊन त्यांनी शरीरचनाशास्त्रावरील पहिले सचित्र व व्यापक वर्णन केलेले पाठ्यपुस्तक लिहिले.
व्हेसेलिअस यांचा जन्म ब्रूसेल्स येथे झाला. वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असे त्यांचे घराणे होते. शिक्षण लूव्हाँ विद्यापीठात (१५२९-३३) व पॅरिस विद्यापीठाच्या वैद्यकीय प्रशालेत (१५३३ – ३६). त्यांनी पॅरिस विद्यापीठात प्राण्यांचे विच्छेदन करण्याचे शिक्षण घेतले. तेथेच त्यांना मानवी शवांचे विच्छेदन करण्याची संधीही मिळाली.
इ. स. १५३६ मध्ये व्हेसेलिअस पॅरिसहून आपल्या ब्राबांट या मूळ प्रदेशात परतले व त्यांनी एक वर्ष लूव्हाँ विद्यापीठात काम केले. या विद्यापीठात अरबी वैद्यकाचा प्रभाव तेव्हाही टिकून राहिला होता. बहुधा पदवीच्या निमित्ताने त्यांनी दहाव्या शतकातील अरबी वैद्य ⇨ रेझिस यांच्या लेखनाचा अर्थानुवाद केला (१५३७). नंतर पॅड्युआ विद्यापीठातून (इटली) एम. डी. होऊन तेथेच ते शल्यक्रियेचे व्याख्याते झाले. ते आपला पुष्कळसा वेळ शरीरविच्छेदनामध्ये घालवीत. त्या काळात प्राचीन ग्रीक वैद्य ⇨ गेलेन (१३१ – २०१) यांची शरीररचनाशास्त्रावरील पुस्तके वैद्यकीय शिक्षणासाठी अधिकृत पाठ्यपुस्तके म्हणून वापराता होती. तथापि गेलेन यांच्या पाठ्यपुस्तकावर विसंबून न राहता व्हेसेलिअस यांनी आपल्या स्वत:च्या पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर केले (१५४०) आणि प्राचीन पाठ्यपुस्तके व संहिता यांचे चिकित्सक रीतीने मूल्यमापन केले. बोलोन्या विद्यापीठाला भेट देण्यासाठी गेले असता त्यांनी हे काम केले. गेलेन यांच्या काळात रोमन धर्माचा मानवी शरीरविच्छेदनास ठाम विरोध होता. त्यामुळेच बहुधा कुत्री, माकडे व डुकरे यांसारख्या प्राण्यांच्या विच्छेदनांद्वारे मिळालेल्या माहितीचा वापर करून गेलेन यांनी आपल्या शरीररचनाशास्त्राची उभारणी केली, असे व्हेसेलिअस यांचे मत होते. आपले हे अनुमान जाहीर करण्याचे धैर्य व्हेसेलिअस यांनी आपल्या अध्यापनात दाखविले व आपले मानवी शरीररचनाशास्त्रावरील पाठ्यपुस्तक प्रकाशनासाठी तयार केले.
या पुस्तकातील चित्रे ही बहुधा प्रबोधन काळातील थोर कलाकार तिशन यांच्या व्हेनिसमधील रंगशाळेत काढली असावीत. बाझेल (स्वित्झर्लंड) येथे त्यांचा De humani corporis fabrica libri Septem (इं. शी. ‘द सेव्हन बुक्स ऑन द स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन बॉडी’) हा ग्रंथ १५४३ साली छापण्यात आला. सामान्यपणे तो फॅब्रिका या नावाने ओळखला जातो. आधीच्या कोणत्याही पुस्तकापेक्षा यात मानवी शरीराचे अधिक अचूक व व्यापक वर्णन आलेले आहे. यामुळे मानवी शरीररचनाशास्त्राची एक नवी परिभाषा पुढे आली.
पवित्र रोमन साम्राज्याचे सम्राट पाचवे चार्ल्स यांना हा ग्रंथ देण्यासाठी व्हेसेलिअस १५४३ साली मेंझला गेले, तेव्हा सम्राटांनी त्यांना आपल्या कुटुंबाचे वैद्य म्हणून नेमले. पॅड्युआ येथील पदाचा त्याग करून व्हेसेलिअस १५४४ साली आपल्या मूळ गावी परतले. १५५३ – ५६ दरम्यान बहुतेक काळ व्हेसेलिअस ब्रूसेल्स येथे राहिले. त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाची भरभराट होत होती. पाचवे चार्ल्स यांनी व्हेसेलिअस यांना तहहयात निवृत्तिवेतन दिले व काउंटही केले. माद्रिद येथील दरबारातील एक वैद्य म्हणून त्यांची नेमणूक झाली. दफन व पुनरुत्थान यांच्या दरम्यानच्या काळात येशू ख्रिस्तांचा देह ज्या अंतर्भागात ठेवण्यात आला होता त्या होली सेपलकर स्थळाची यात्रा करण्यासाठी स्पेनबाहेर जाण्याची परवानगी व्हेसेलिअस यांना १५६४ साली मिळाली. व्हेनिस व सायप्रस येथे थांबून ते जेरूसलेमला गेले. या यात्रेत जहाजावरच ते आजारी पडल्याचे सांगतात. यात्रेहून युरोपला परत येताना त्यांना व्हेनिस प्रजासत्ताकाच्या झकिंथस (आता ग्रीस) बेटावर ठेवण्यात आले व तेथेच त्यांचे निधन झाले. मात्र त्यांच्या दफनविधीचे स्थळ अज्ञातच राहिले.
व्हेसेलिअस यांच्या संशोधन-लेखनामुळे प्राचीन ज्ञानाच्या पुनरुज्जीवनास हातभार लागला. मानवी शरीर विच्छेदनांचा वैद्यकीय अभ्यासक्रमात अंतर्भाव झाला आणि युरोपमध्ये शरीररचनाशास्त्राविषयीच्या वैज्ञानिक लेखनास चालना मिळाली. व्हेसेलिअस यांच्या निधनानंतर शरीररचनाशास्त्र ही एक स्वतंत्र ज्ञानशाखाच बनली आणि वैद्यक हा विद्वज्जनांचा व्यवसाय झाला.
पानसे, अनिल अ.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..