व्हेर्फेल, फ्रांट्स : (१० सप्टेंबर १८९०–२६ ऑगस्ट १९४५). जर्मन कवी, कादंबरीकार आणि नाटककार. धर्माने ज्यू. जन्म प्राग शहरी. १९०९ साली लाइपसिक विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी त्याने प्रवेश घेतला. त्यानंतर दोनच वर्षांनी त्याला एक वर्ष मुदतीचे सक्तीचे लष्करी शिक्षण घेण्यासाठी जावे लागले. त्याच वर्षी देऽर वेल्टफ्रॉईंड (१९११, इं. शी. द फ्रेंड ऑफ द वर्ल्ड) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. वीऽर झिंड (१९१३, इं. शी. वुई आर), आइनआंदर (१९१५, इं. शी. ईच अदर) आणि देऽर गेरिष्टस्ताग (१९१९, इं. शी. द डे ऑफ जज्मेंट) हे त्याचे त्यानंतर प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह. व्हेर्फेलच्या कवितेवर अभिव्यक्तिवादाचा प्रभाव दिसून येतो. देऽर युंग्स्टऽ ताग (१९१३– २१, इं. शी. द जज्मेंट डे) हे अभिव्यक्तिवादी नियतकालिक सुरू करण्यातही त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. १९२० नंतर व्हेर्फेल नाट्यलेखनाकडे वळला. देऽर बेझख आऊस देम इल्युझियुम (१९१२, इं. शी. व्हिजिट फ्रॉम इलिझिअम) आणि डी ट्रोयरिनेन (१९१५, इं. शी. द ट्रोजन विमेन) ह्या त्याच्या आरंभीच्या एकांकिका. डेअर श्पीगेलमेन्श (१९२०, इं. शी. मिरर-मॅन) ही अभिव्यक्तिवादी तंत्राने लिहिलेली नाट्यत्रयी. यांखेरीज बोकगेझांग (१९२२, इं. शी. गोट साँग), युआरेत्स उंट मॅक्सिमिलिआन (१९२४, इं. शी. युआरेत्स अँड मॅक्सिमिलिआन), पाउलस उंटर देन यूडेन (१९२६, इं. शी. पॉल अमंग द ज्यूज), याकोबोस्की उंट देऽर ओबर्स्ट (१९४५, इं. शी. याकोबोस्की अँड द कर्नल) इ. नाटके त्याने लिहिली.
व्हेर्फेलने कादंबऱ्याही लिहिल्या. वेर्दी ही त्याची पहिली कादंबरी. त्यानंतर देऽर टोड देस क्लाइनब्युरगरस (१९२६, इं. शी. द मॅन टू काँकर्ड डेथ), डेअर आबिटुरिएन टेनटाग (१९२८, इं.शी. द क्लास रियूनियन), डी फिअरत्सिग टागऽ डेस मुसा डाघ (१९३३, इं. शी. द फॉर्टी डेज ऑफ मुसा डाघ) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या होत.
माणसामाणसांमधील प्रेम, बंधुत्व आणि सुष्ट-दुष्ट शक्तींचा मानवी आत्म्याच्या ठायी चाललेला संघर्ष ही व्हेर्फेलच्या साहित्यदृष्टीची वैशिष्ट्ये होत. उदा. वीऽर झिंड ह्या काव्यसंग्रहाचे शीर्षकच (वुई आर) आत्मकेंद्रित व्यक्तिवादाच्या विरोधी आहे. भेदाभेदातील व्यापक मानवी सुसंवादाची भावना ह्या संग्रहातून जाणवते. व्हेर्फेलला अभिप्रेत असलेल्या मानवी बंधुत्वाच्या विचाराशी सुसंगत असाच त्याचा युद्धविरोध आहे. त्या दृष्टीने प्राचीन ग्रीक नाटककार युरिपिडीझच्या ‘ट्रोजन विमेन’ (इं. शी.) ह्या नाट्यकृतीच्या आधारे त्याने लिहिलेली त्याच नावाची एकांकिका लक्षणीय ठरते. ‘मिरर मॅन’ (इं. शी.) ह्या त्याच्या नाट्यत्रयीत माणसाचा खरा स्वभाव आणि त्याचा बाह्य मुखवटा ह्यांतील चिरंतन संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण आहे. ‘द फॉर्टी डेज ऑफ मुसा डाघ’ (इं. शी.) ह्या कादंबरीत तुर्कांनी आर्मेनिअनांचा कसा छळ केला, ह्याचे चित्रण करून धर्मांधता आणि असहिष्णुता किती भयंकर असू शकते, हे दाखविले आहे. अभिव्यक्तिवादाकडून वास्तववादाकहे व्हेर्फेलचा प्रवास झाल्याचे दिसते.
नाझी सैन्याने १९३८ साली ऑस्ट्रियावर कब्जा मिळवल्यानंतर धर्माने ज्यू असलेल्या व्हेर्फेलला प्रथम पॅरिसला व नंतर स्पेनला पलायन करावे लागले. या प्रवासात लूर्द येथे त्याला थोडे समाधान मिळाले. त्याने त्या स्थळाविषयीची कृतज्ञता म्हणून दस लीड फोन बेर्नाडेट्ट (१९४१, इं. शी. द साँग ऑफ बेर्नाडेट्ट) ही कादंबरी लिहिली. अखेरीस व्हेर्फेलने अमेरिकेत वास्तव्य केले. हॉलिवूडमध्ये तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..