व्हेर्थायमर, माक्स : (१५ एप्रिल १८८०–१२ ऑक्टोबर १९४३). जर्मन मानसशास्त्रज्ञ. आधुनिक मानसशास्त्रातील ⇨ व्यूह मानसशास्त्र (गेश्टाल्ट सायकॉलॉजी) या शाखेचे प्रवर्तक. प्राग येथे जन्म. प्राग व बर्लिन विद्यापीठांत तत्त्वज्ञान व मानसशास्त्र या विषयांचे अध्ययन. फ्रँकफुर्ट व बर्लिन येथील विद्यापीठांत प्राध्यापक. १९३३ साली अमेरिकेस प्रयाण. न्यूयॉर्क येथील एका संशोधनसंस्थेत अखेरपर्यंत प्राध्यापक. तत्त्वज्ञान, ज्ञानमीमांसा, तर्कशास्त्र, मानसशास्त्र त्याचप्रमाणे गुन्हेशास्त्र आणि संगीतविद्या इ. विषयांवर त्यांनी विचारप्रवर्तक लेखन केले.

व्हिल्हेल्म व्हुंट यांनी जर्मनीत लाइपसिक येथे १८७९ साली मानसशास्त्राची पहिली इतिहासप्रसिद्ध प्रयोगशाळा स्थापन केली. तेव्हापासून मानसशास्त्रीय प्रयोग करण्याकडे पाश्चात्त्य विचारवंत वळले. व्हेर्थायमर यांनीही अशाच जिज्ञासेपोटी डोळ्यांस भासमान होणाऱ्या वस्तूंच्या गतिसंबंधाने प्रयोग केले. या प्रयोगांनुसार एक आडवी रेषा आणि एक उभी रेषा अशा दोन रेषांची स्थिर चित्रे काही ठरावीक अंतराने समोरच्या पडद्यावर अथवा भिंतीवर प्रक्षेपित केली की, आपणास एकच रेषा हलल्याचा भास होतो. म्हणजेच, आपणांस बाह्य वस्तूंच्या गतीची जी जाणीव होते, ती नेहमीच वस्तूंच्या वास्तवातील बाह्य गतीचीच जाणीव असते असे नव्हे. ती भासमान होणारी गती मनोजनितही असू शकते. म्हणजेच, डोळ्यांद्वारे होणारे वस्तुदर्शन हे गतिशील, चैतन्यमय असते. ते स्थितिशील अथवा यांत्रिक नसते.

व्हेर्थायमर यांनी या प्रयोगांवरील आपला निबंध १९१२ साली प्रसिद्ध केला. त्या निबंधाने व्यूह मानसशास्त्राचा उदय झाला, असे मानण्यात येते.

व्हेर्थायमरप्रणीत व्यूह मानसशास्त्रानुसार, बाह्य वस्तूंचे आकलन हे तुटकतुटक इंद्रियवेदनांच्या एकत्रीकरणाने होत नसते. तो एक मुळातच एकजीव अनुभव असतो. गतीप्रमाणे वस्तूंची आकृतीदेखील अशीच एकात्मरीत्या जाणवते. उदा. मानवी देहाची आकृती ही प्रथमदर्शनीच एकात्म रीतीने प्रत्ययास येते. ती टप्प्याटप्प्याने देहाचे विविध अवयव एकत्र जोडल्यानंतर जाणवत नसते.

व्यूह हा एक सु-रचित पूर्ण आकार असतो. त्यात त्याचे घटक परस्परांशी अतूटरीत्या संमीलित झालेले असतात. ते कसेतरी एकत्र आणलेले नसतात बळेबळे जोडलेले नसतात. व्हेर्थायमर यांनी म्हटल्याप्रमाणे पूर्णाकृतीमधील (द होल) एखाद्या घटकाची अवस्था कशी असणार, ते सगळ्या पूर्णाकृतीच्या प्रभावसूत्रानुसार ठरत असते.

व्हेर्थायमर यांच्या ⇨ व्होल्फगांग कलर आणि ⇨ कुर्ट कॉफ्का या सहकाऱ्यांनी अध्ययनप्रक्रियेच्या संदर्भात वेगळ्या धर्तीचे प्रयोग करून असे सिद्ध केले की, प्राण्यांची शिक्षणप्रक्रिया ही केवळ ‘यांत्रिक अभिसंहितते’ने (मेकॅनिकल कंडिशनिंग) किंवा आंधळ्या ‘प्रयत्नप्रमादा’ने (ट्रायल अँड एरर) घडते असे नाही. ती कधीकधी मर्मदृष्टीनेही (इन्‌साइट) घडते. प्राण्याने आपल्या प्राप्त समस्यागर्भ  परिस्थितीचे साकल्यपूर्ण आकलन केले की, त्या परिस्थितीमधल्या संबंधित घटकाचे नावीन्यपूर्ण संबंध जोडण्याची ऊर्मी त्याच्या ठायी अचानक उसळते आणि त्या मर्मदृष्टीने प्रेरित होऊन तो प्राणी आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असलेली साधने वापरून समस्यानिवारणार्थ योग्य ती वर्तनक्रिया करतो. [→ मर्मदृष्टि].

स्मरण-प्रक्रियेसंबंधानेही व्यूह मानसशास्त्रज्ञांनी साकल्यग्रहणाचे अथवा पूर्णाकृतिदर्शनाचे महत्त्व प्रतिपादित केले. तद्‌नुसार विस्मृत गोष्टींचे वेगवेगळेपणाने स्मरण करण्याचे प्रयत्न अनेकदा विफल होतात. उलट साकल्यात्मक विचारप्रक्रियेत अनेक विस्मृत गोष्टी सहजगत्या आठवत जातात.

बौद्धिक नवनिर्मितीतही साकल्याकलन आवश्यक असते, असे व्हेर्थायमरप्रणीत व्यूह मानसशास्त्र सांगते. कोणत्याही ज्ञानक्षेत्रातील नवनिर्मिती ही त्या-त्या विषयाच्या तुटकतुटक आकलनाने अथवा विचारांची कृत्रिम सांधेजोड केल्याने होत नसते. त्यासाठी व्यापक, सर्वंकष दृष्टीची आवश्यकता असते. तपशिलांचा विस्कळित पसारा एका दृष्टिक्षेपाच्या आटोक्यात आणल्यानेच स्पष्टीकरणाचे नवे पऱ्याय सुचतात.

व्हेर्थायमरप्रणीत साकल्यदर्शनाचे अथवा व्यूहाकलनाचे सूत्र वैद्यकीय मानसोपचारातही उपयुक्त ठरते. मनोरुग्णाचे दुखणे जर दूर करावयाचे असेल, तर नुसते त्याच्या व्याधीच्या विवक्षित उद्रेकाकडे पाहून चालणार नाही. त्यासाठी रुग्णाच्या भावनिक जीवनाची माहिती घेणे इष्ट असते. त्याच्या एकूण कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचाही विचार करणे आवश्यक असते. अशा सर्वंकष दृष्टिकोनातून पाहिल्यासच रुग्णाइताच्या व्याधीचे यथार्थ आकलन होते व त्याची व्याधी दूर करण्याचे उपायही आत्मविश्वासपूर्वक निश्चित करता येतात. रोग्याच्या गतकालीन, धक्कादायक, अप्रिय अनुभवांवर भर न देता त्याच्या सद्यःकालीन जीवनपरिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे हिताचे असते. व्याधीग्रस्त व्यक्तीस त्याच्या एकूण जीवनस्थितीचे भान लाभवून दिल्याने त्याच्या व्याधीचे निवारण करणे बरेच सुलभ होते.

Experimentelle Studien Uber Das Sehen Von Bewegung (१९१२) व Productive Thinking (१९४५) हे व्हेर्थायमर यांचे उल्लेखनीय ग्रंथ होत.

पहा : व्यूह मानसशास्त्र.

संदर्भ : 1. Hartmann, G. W. Gestalt Psychology, New York, 1935.

2. Schaefer, H. H. Martin, P. L. Behavioural Therapy, New York, 1975.

केळशीकर, शं. हि.