व्हेंडा : दक्षिण आफ्रिकेतील १९७९ ते १९९४ या कालावधीतील एक स्वतंत्र प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ६,१९८ चौ.किमी. (१९८०च्या दशकाचा मध्य). लोकसंख्या ४,२४,००० (१९८५ अंदाज). दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या उत्तर प्रांतात हा प्रदेश येतो. झिंबाब्वेच्या दक्षिण सरहद्दीलगतच हा प्रदेश होता. व्हेंडाची आग्नेयेकडील सरहद्द दक्षिण आफ्रिकेतील गझनकुलू या स्वातंत्र्य नसलेल्या कृष्णवर्णीय लोकांच्या राज्याशी भिडलेली होती. ईशान्येस क्रूगर नॅशनल पार्कची सरहद्द भिडलेली होती. लिंपोपो नदी व्हेंडाच्या उत्तर सरहद्दीच्या उत्तरेकडून सरहद्दीला समांतर वाहते. व्हेंडाची भूमी दोन विभागांत विभागलेली होती. त्यांपैकी क्रूगर नॅशनल पार्कच्या पश्चिमेस एक भूभाग असून दुसरा पीटर्झबर्गच्या ईशान्येस आहे. सिबासा ही व्हेंडाची सुरुवातीची राजधानी परंतु १९७९मध्ये व्हेंडा प्रजासत्ताक झाल्यावर राजधानी तहॉइ-आन-दू येथे हलविण्यात आली.
व्हेंडाला मर्यादितच नैसर्गिक साधनसंपत्ती लाभली आहे. शेती व पशुपालन हे येथील प्रमुख व्यवसाय होत. शेतीमधून मका, गहू, ज्वारी, द्विदल धान्ये, तांदूळ, भुईमूग, कॉफी, वाटाणा, तंबाखू, फळे व भाजीपाल्यांचे उत्पादन मिळते. कोळसा, ग्रॅफाइट व मॅग्नेसाइट यांचे साठे असले, तरी त्यांचे मोठ्या प्रमाणावरील उत्पादन अद्याप घेतले जात नाही. बांधकामासाठी मुबलक दगड उपलब्ध आहे. सुतारकाम, चामडीकाम, कुंभारकाम, लाकूड चिरकाम, वितळ जोडकाम तसेच गालिचे, गाद्या, खुर्च्या पलंग इत्यादींची निर्मिती करणारे लघुउद्योग येथे आढळतात. मोठी शहरे नाहीत. सिबासा येथे मोटार-कर्मशाळा आहे. अधिक औद्योगिक विकासाच्या दृष्टीने १९७०च्या दशकात या प्रदेशाची निवड करण्यात आली होती. बहुतांश नागरीक व्हेंडाच्या बाहेर, परंतु दक्षिण आफ्रिकेतच स्थलांतरित कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. व्हेंडा स्वतंत्र असताना दक्षिण आफ्रिका त्याचा प्रमुख व्यापारी भागीदार होता. लूव्हेंडा, इंग्रजी व आफ्रिकन या येथील प्रमुख भाषा आहेत.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीला सांप्रतच्या झिंबाब्वेमधून व्हेंडा लोकांनी या प्रदेशात स्थलांतर केले. त्यांची अनेक सत्ताधारी घराणी होऊन गेली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व्हेंडा घराण्याचे ट्रान्सव्हाल प्रजासत्ताकाशी झगडे सुरू झाले. त्याने एम्फेफू या व्हेंडांच्या प्रमुखाचा पराभव करून व्हेंडा प्रदेश खालसा केला (१८९८). स्वातंत्र्यपूर्व काळात व्हेंडाला दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत एक वेगळा प्रशासकीय दर्जा होता. १९६२ मध्ये दक्षिण आफ्रिकेने व्हेंडांना राजकीय सत्ता दिली. १९७३मध्ये या प्रदेशाला अंशतः स्वयंशासनाचा अधिकार देण्यात आला. विधानसभेची निवड करण्यात येऊन पॅट्रिक एम्फेफू हे मुख्यमंत्री झाले. १३ सप्टेंबर १९७९ रोजी दक्षिण आफ्रिकेने स्वतंत्र प्रजासत्ताक म्हणून व्हेंडाची घोषणा केली व एम्फेफू हे राष्ट्राध्यक्ष झाले. १९७०च्या दशकात स्वातंत्र्य मिळालेले दक्षिण आफ्रिकेतील काळ्या लोकांचे हे तिसरे राज्य होय. [या आधीची ट्रान्सकेई (१९७६) वा बोपूतात्सस्वाना (१९७७) ही दोन राज्ये]. व्हेंडाच्या स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्याच आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा-समितीची सभा झाली. दक्षिण आफ्रिकेने काळ्या लोकांची ही तीन स्वतंत्र प्रजासत्ताके नव्याने निर्माण करण्याची जी कृती केली, तिचा या सभेने एकमताने निषेध केला. कारण दक्षिण आफ्रिकेची ही कृती म्हणजे वर्णविद्वेष चालू ठेवण्याचा व त्याला कायदेशीर स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे, असे या समितीचे ठाम मत होते. केवळ दक्षिण आफ्रिका, ट्रान्सकेई व बोपूतात्स्वाना यांनीच व्हेंडाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली होती.
फेब्रुवारी १९९० मध्ये आफ्रिकन नॅशनल काँग्रेसवरील (एएनसी) तीस वर्षांची बंदी उठविण्यात येऊन तिचे नेतृत्व करणाऱ्या नेल्सन मंडेला यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. ९ मे १९९४ रोजी नेल्सन मंडेला यांची दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. त्याच वर्षी व्हेंडा प्रजासत्ताक पुन्हा दक्षिण आफ्रिकेत समाविष्ट झाले. व्हेंडाबरोबरच ट्रान्सकेई, बोपूतात्स्वाना व सिस्केई हेसुद्धा पुन्हा दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकात सामील झाले.
चौधरी, वसंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..