व्हीलार्‌द्वँ, झॉफ्रवाद : (सु. ११५० –१२१८). चौथ्या धर्मयुद्धातील ख्यातनाम लष्करी अधिकारी व फ्रेंच इतिहासकार. त्याचा जन्म सरदार घराण्यात व्हीलार्‌द्वँ येथे झाला. त्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. फ्रेंच शासनाने त्याची नियुक्ती शँपेनच्या मार्शलपदी केली होती (११८५). त्यानंतर ईजिप्तचा सर्वाधिकारी सॅलदीनने ११८७मध्ये जेरूसलेमवर स्वारी करून ते जिंकून घेतले. त्या वेळी फक्त ट्रिपोली आणि अँटिऑक ही दोन राज्ये ख्रिश्चनांच्या ताब्यात होती. जेरूसलेमला वाचविण्यासाठी पोपऐवजी इंग्लंड-फ्रान्सच्या राजांनी धर्मयुद्धाची सूत्रे आपल्या हाती घेतली. चौथ्या धर्मयुद्धात (११९९ – १२०७) व्हीलार्‌द्वँकडे एका लष्करी तुकडीचे नेतृत्व होते. जर्मन राजा हेन्री याने या सैन्याचा वापर बायझंटिन साम्राज्याविरुद्ध केला. प्रत्यक्षात ही मोहीम ईजिप्तवर स्वारी करण्यासाठी इस्लामी सैन्याविरुद्ध होती पण व्हेनिसचे पुढारी आणि बायझंटिन साम्राज्याचा पदभ्रष्ट राजा आइझाक यांच्या संगनमतामुळे ती कॉन्स्टँटिनोपलकडे वळली. या संधीचा फायदा घेऊन व्हीलार्‌द्वँने थेट कॉन्स्टँटिनोपलवर स्वारी केली आणि २५ एप्रिल १२०४ रोजी ते काबीज केले. धर्मयुद्धासाठी कबूल केलेली रक्कम देणे आइझाकला शक्य झाले नाही, तेव्हा ख्रिस्ती सैन्याने शहर लुटले व व्हीलार्‌द्वँच्या मदतीने फ्‌लँडर्सचा सरदार बॉल्डविन यास राजपदी बसविले. व्हीलार्‌द्वँने बल्गर सैन्याच्या तावडीतून फ्रेंच सैन्याची मुक्तता केली (१२०५). त्याच्या कर्तबगारीबद्दल त्यास थ्रेसमधील जहागीर देण्यात आली (१२०५) आणि त्याला रूमानियाचा मार्शल हा किताब प्राप्त झाला. धर्मयुद्धातील लष्करी मोहिमेवरून तो १२१२ मध्ये फ्रान्सला परत आला. उर्वरित जीवन त्याने लेखनकाऱ्यात व्यतीत केले.

व्हीलार्‌द्वँने फ्रेंच भाषेत Historie de I’empire de Constantinople (कॉन्स्टँटिनोपचा विजय) हा ग्रंथ सिद्ध केला (१२१२). त्यात चौथ्या धर्मयुद्धातील, विशेषतः कॉन्स्टँटिनोपवरील स्वारी आणि विजय यांचा तपशीलवार वृत्तान्त आहे. या ग्रंथामुळे फ्रान्समध्ये प्रथमच विशिष्ट कालखंडावरील इतिहासलेखनास आरंभ झाला. फ्रेंच भाषेतील उत्तम गद्यवाङ्‌मयकृती म्हणूनही या ग्रंथास मान्यता लाभली. यातील लेखन आत्मचरित्रात्मकही आहे. त्याच्या पुढे कोणताच विशिष्ट वाङ्‌मयीन आदर्श नव्हता आणि लॅटिन पूर्वसुरींच्या लेखनाविषयी बहुधा तो अनभिज्ञ असावा. सामान्यतः काँकॅत द काँस्तांतिनॉप्ल या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या ग्रंथात त्याने जे पाहिले, अनुभविले, तेच नोंदविले. ग्रंथ पूर्ण झाल्यावर लवकरच त्याचे निधन झाले असावे. या इतिहासाची पहिली छापील आवृत्ती १५८५ मध्ये प्रकाशित झाली. पुढे त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि अन्य भाषांत भाषांतरेही झाली.

काकडे, सु. रा.