स्नेहरश्मि झीणाभाई रतनजी देसाई : (१६ एप्रिल १९०३—६ जानेवारी १९९१). गांधीयुगातील प्रसिद्ध गुजराती कवी व लेखक. ‘ स्नेहरश्मि ’ या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. त्यांचा जन्म चिखली ( जि. बलसाड, गुजरात ) येथे एका सधन गुजराती कुटुंबात झाला. सुरुवातीच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी गुजरात विद्यापीठाची पदवी घेतली. अहमदाबाद येथील चिमणलाल नगीनदास विद्याविहार या शिक्षणसंस्थेत त्यांनी अध्यापन केले. ‘ ब्यूगल , ‘ स्वाधीनोनु गीत , ‘ बालमजूर , ‘ धोबीनु गीत ’ आदी सुंदर काव्ये त्यांनी रचली. अर्घ्य, पनघट, सोनेरी चांद अने रूपेरी सूरज, अतितानी पंखमंथी हे त्यांचे काव्यसंग्रह गुजराती साहित्यात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यरचनांमधून स्वातंत्र्य, देशप्रेम, मानवाचे कल्याण, दीनजनवात्सल्य आदी भावनांचा आविष्कार प्रतिबिंबित झाला असून सुदीर्घ चिंतन-काव्यासाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत. ‘ एकोहं बहु स्याम् , ‘ घडता इतिहासनुं पानुं , ‘ जनता ’ इ. कवितांमधून त्यांनी मानव संस्कृतीच्या विकासाची मंगल आशा व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी दांपत्यभाव वर्णन करणारी अतिशय उत्कट व सुंदर प्रणय-काव्ये लिहिली आहेत. त्यांच्या काव्यावर बंगाली कवितेचा—विशेषतः रवींद्रनाथांच्या रहस्यवादाचा—प्रभाव आहे. त्यांनी ‘ हाओक् ’ ( हायकू ) नावाचा जपानी काव्यप्रकार प्रथमच गुजराती साहित्यात आणला. ५, ७ व ५ या अक्षरांच्या तीन पंक्तींमधून—अर्थात १७ अक्षरांच्या गुच्छामध्ये—चित्रात्मक कल्पनांचा काव्यात्मक चमत्कार साधणारे त्यांचे ‘ हाओक् ’ अतिशय लोकप्रिय ठरले. सोनेरी चांद अने रूपेरी सूरज हा त्यांच्या हाओक् प्रकारातील रचनेचा उल्लेखनीय काव्यसंग्रह. याशिवाय तुटेला तार, गाता आसोपाल, स्वर्ग अने पृथ्वी हिरानां लटकणियां हे त्यांचे प्रसिद्ध लघुकथासंग्रह असून अंतरपट ही त्यांची एकमेव कादंबरी होय. या कादंबरीत १९३० च्या दशकातील राजकीय व सामाजिक जीवनाचे चित्रण आढळते. मारी दुनिया या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे.

स्नेहरश्मि यांना सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार (१९६१), रणजीतराम सुवर्णपदक (१९६७) आणि नर्मद सुवर्णपदक (१९८५) आदी पुरस्कार लाभले.

अहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले.

पोळ, मनीषा