व्हिपल, जॉर्ज हायट : (२८ ऑगस्ट १८७८ – १फेब्रुवारी १९७६). अमेरिकन विकृतिवैज्ञानिक. अत्यधिक रक्तस्राव दीर्घ काळ करून पांडुरोग (ॲनेमिया) उत्पन्न केलेल्या कुत्र्यांना कच्चे यकृत खाऊ घातले असता त्यांना झालेल्या ⇨ पांडुरोगाची लक्षणे नाहीशी होऊ लागतील, असा शोध त्यांनी लावला (१९१८). याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे ⇨ जॉर्ज रिचर्डस् मायनट (मिनो) व ⇨ विल्यम पॅरी मर्फी यांनी मारक पांडुरोगावर यशस्वी रीतीने यकृत-चिकित्सा केली. असांसर्गिक रोगांवरील उपचारांच्या संशोधनाबद्दल या तिघांना १९३४ सालचे वैद्यकाचे किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले.
व्हिपल यांचा जन्म अमेरिकेतील ॲशलँड (न्यू हँपशर) येथे झाला. त्यांनी येल विद्यापीठातून बी. ए. व एम्. ए. (१९००) या पदव्या व पुढे जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठाची (बॉल्टिमोर) एम्. डी. पदवी (१९०५) मिळवली. नंतर जॉन्स हॉप्किन्स विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ, रॉकफेलर विद्यापीठ आदी विविध ठिकाणी त्यांनी अध्यापनादी कार्य केले.
व्हिपल यांना ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हीमोग्लोबीनाच्या निर्मितीविषयी कुतूहल होते. पित्तामधील रंगद्रव्यांच्या निर्मितीमध्ये हीमोग्लोबिन हाही महत्त्वपूर्ण घटक असतो. यकृत हा आहाराशी निगडित घटक असून त्यामुळे कुत्र्यांमध्ये हीमोग्लोबिनाच्या पुनर्निर्मितीला मोठी चालना मिळते, असे त्यांनी १९२० साली दाखविले. कृत्रिम रीतीने उत्पन्न करण्यात आलेल्या पांडुरोगाविषयीचे प्रयोगही त्यांनी केले (१९२३ – २५). या प्रयोगांमुळे तांबड्या रक्तकोशिका निर्माण होण्याच्या क्रियेत लोह हा सर्वांत गुणकारी अकार्बनी घटक असतो, हे स्पष्ट झाले. मानवी रक्तनिर्मितीत यकृताचे महत्त्वाचे असते, हे त्यांनी सिद्ध केले. पांडुरोग, रंगद्रव्यांचा चयापचय (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिकीय व रासायनिक घडामोडी), रक्तरस प्रथिने, यकृताच्या इजा व उपचार इ. विषयांवर त्यांनी दोनशेहून अधिक लेख लिहिले. वैद्यकीय शिक्षण संस्था व रुग्णालये एकाच आवारात आणण्याचे काम त्यांनीच प्रथम केले.
व्हिपल यांना नोबेल पारितोषिकाखेरीज इतरही अनेक मानसन्मान लाभले. त्यांच्या नावावरून आंत्रभित्तीच्या क्वचित आढळणाऱ्या विशिष्ट रोगाला ‘व्हिपल रोग’ हे नाव पडले आहे.
रॉचेस्टर (न्यूयॉर्क राज्य) येथे त्यांचे निधन झाले.
भालेराव, य. त्र्यं. ठाकूर, अ. ना.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..