व्हियैरा, अँतॉन्यू : (६ फेब्रुवारी १६०८–१८ जुलै १६९७). एक श्रेष्ठ पोर्तुगीज साहित्यिक, जेझुइट मिशनरी, मुत्सद्दी आणि वक्ता. जन्म लिस्बनचा. वडिलांच्या नोकरीमुळे ब्राझीलमधील सॅल्व्हादॉर (बाहीया) येथे त्याचे बालपण गेले. शिक्षण जेझुइट महाविद्यालयामध्ये. याच महाविद्यालयामध्ये त्याने अल्प काळ धर्मशास्त्राचे अध्यापनही केले. पुढे १६३५ मध्ये त्याने धर्मगुरुची दीक्षा घेतली.

ब्राझीलमधील पोर्तुगीज-डच वासाहतिक संघर्षात त्याने डचांविरुद्ध स्थानिक लोकमत तयार करण्यास हातभार लावला. ब्राझीलमधील इंडियनांची तुपी ही भाषा तसेच इतर स्थानिक भाषाही तो शिकला. ब्राझीलमधील इंडियन आणि निग्रो-गुलामांच्या समूहांत व्हियैराने १६४१ पर्यंत कार्य केले. ब्रागॅन्सचा ड्यूक चौथा जुआंव (कार. १६४० – ५६) याने त्याला शाही मंडळाचा सदस्य आणि दरबारी धर्मोपदेशक म्हणून नेमले. तसेच हॉलंड, फ्रान्स व इटली या देशांत राजनैतिक काऱ्यासाठी त्यास पाठविण्यात आले (१६४६ – ५०). त्याने आपल्या प्रवचनांतून ख्रिस्ती केलेल्या पोर्तुगालमधील ज्यू लोकांबद्दल, तसेच निग्रो गुलामांबद्दल व इंडियनांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. डचांशी तडजोड करून शांतता प्रस्थापित करावी, असे विचार मांडल्याने पोर्तुगालमध्ये त्याला शत्रू निर्माण झाले. त्यामुळे १६५२ मध्ये तो ब्राझीलला परतला. इथेही गुलाम बाळगण्याच्या वृत्तीवर टीका करीत राहिल्यामुळे त्याला लिस्बनला परतावे लागले. त्याचे अनेक विचार काळाच्या पुढे होते. तो पोर्तुगालमध्ये असताना त्याने १६५६ साली मृत्यू पावलेला राजा चौथा जुआंव हा सुखसमृद्धीच्या सुवर्णयुगाचे उद्घाटन करण्यासाठी परत येईल, असे भाकीत केल्यामुळे धर्मन्यायपीठाने त्यास तुरुंगवासाची शिक्षा दिली (१६६५ – ६७). सुटका झाल्यानंतर १६६८ मध्ये तो रोमला गेला. तेथे त्याचे सहा वर्षे वास्तव्य होते. स्वीडनची राणी क्रिस्तीना हिने स्थापन केलेल्या वाङ्‌मयीन अकादमीचा तो सदस्य होता. रोममध्ये असताना ख्रिस्ती करण्यात आलेल्या ज्यूंबद्दल सहिष्णुतेची भावना तो काही प्रमाणात निर्माण करू शकला.

व्हियैराची प्रवचने, पत्रे ह्यांतून पोर्तुगाल आणि ब्राझीलमधील सतराव्या शतकातील वैचारिक वातावरणाचे दर्शन घडते. त्याची सु. २०० प्रवचने (सर्मन्स) १८ खंडांमध्ये संगृहीत केलेली असून त्यांपैकी १३ खंड १६७९ – ९९ दरम्यान प्रकाशित झाले. त्याची सु. ५०० पत्रे तीन खंडांत संकलित केलेली असून (१७३५ – ४६) ह्या पत्रांतून तत्कालीन राजकीय आणि अन्य महत्त्वाच्या घटनांचा परामर्श त्याने घेतलेला दिसतो. इश्पॅरांसाश् द् पोर्तुगाल (इं. शी. पोर्तुगाल्स होप्स), इश्तॉरिअ दु फुतुरु (इं. शी. हिस्टरी ऑफ द फ्युचर) व कीन्तु इम्पॅरिउ (इं. शी. फिफ्थ एम्पायर) हे त्याचे काही उल्लेखनीय ग्रंथ. त्यांत त्याने भविष्यकालाबद्दलची भाकिते केली आहेत (१६५६ – ६५).

    सॅल्व्हादॉर येथे त्याचे निधन झाले.    

रॉड्रिग्ज, एल. ए. (इं.) पोळ, मनिशा (म.)