व्हॉलीन : पोलंडच्या वायव्य किनाऱ्यावरील याच नावाचे एक बेट व नगर. लोकसंख्या बेट– १७,७६३ नगर– ३,०२२ (१९७०). व्हॉलीन बेटाचा पोलंडमधील श्चेत्सीन (श्टेटीन) प्रांतात समावेश होतो. त्याच्या उत्तरेस बाल्टिक समुद्र, पूर्वेस ओडर नदीचा श्फीना फाटा आहे. बेटाचे क्षेत्रफळ २४५ चौ.किमी. आहे. बेटाचा भूभाग सखल असून तेथे जंगले व सरोवरे आढळतात. दक्षिणेस व्हॉलीन तर उत्तरेस म्येद्झिझद्रॉये ही बेटावरील मुख्य नगरे आहेत. मासेमारी व पशुपालन हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. बेटाच्या मध्य भागात व्हिलीन राष्ट्रीय उद्यान आहे. तेथे जलविहाराच्या अनेक सुविधा आहेत.

श्टेटीन शहराच्या उत्तरेस ५० किमी. अंतरावर जीव्हना फाट्यावर वसलेले व्हॉलीन नगर तेथील परगण्याचे मुख्य ठाणे आहे. त्याची स्थापना इ.स. १२७९ मध्ये झाली. प्राचीन काळी स्लाव्ह लोकांचा हा बालेकिल्ला होता. दहाव्या व अकराव्या शतकांत ओडर खोऱ्यातील हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. तसेच त्याच्यावर पॉमरेनियनांची सत्ता होती. १६३० मध्ये हे स्वीडनने काबीज केले व १७३० मध्ये प्रशियाच्या स्वाधीन करण्यात आले. १९४५ पासून हा पोलंडचा भाग बनला. दक्षिणेकडील जलाशयात मासेमारी करणारे हे महत्त्वाचे बंदर आहे.

चौधरी, वसंत