व्हाल्ब्झिक : जर्मन व्हाल्डनबुर्ग. पोलंडमधील याच नावाच्या प्रांताची राजधानी, तसेच कोळसा खाणकामासाठी प्रसिद्ध असलेले शहर. लोकसंख्या १,४०,२९४ (१९९३ अंदाज). पोलंडच्या नैर्ऋत्य भागात चेक प्रजासत्ताकाच्या सरहद्दीजवळ असलेल्या लोअर सायलीशिया जिल्ह्यात, पॉल्सनिट्झ नदीच्या तीरावर हे वसले आहे. सुडेटन पर्वताच्या ईशान्य उतारावर, व्हालब्झिक टेकड्यांच्या मध्यभागी वसलेले हे शहर व्हरॉट्स्लाफ (ब्रेसलौ) शहरापासून नैर्ऋत्येस सु. ६४ किमी. अंतरावर आहे.
पहिल्या बॉलेस्लाफने येथे किल्ला बांधल्याचे मानतात. चौदाव्या शतकापासून येथे चांदी व शिसे उत्पादनास सुरुवात झाली. पंधराव्या शतकापासून कपड्यांच्या निर्मितीचे केंद्र म्हणून ते प्रसिद्धीस आले. १७४२ मध्ये लोअर सायलीशियातील प्रशियन प्रांतात याचा समावेश करण्यात आला. १८१८ मध्ये सायलीशियातील पहिली यांत्रिक विणकाम गिरणी येथे सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते एक औद्योगिक केंद्र म्हणून भरभराटीस येऊ लागले. दुसऱ्या महायुद्धकाळात शहराचे बरेच नुकसान झाले. १९४५ मध्ये जर्मनीकडून पोलंडच्या ताब्यात हे शहर आले. १९४५ पूर्वी ते व्हाल्डनबुर्ग नावाने ओळखले जाई.
कोळसा खाणकामासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. त्याशिवाय धातु-उत्पादन, कोक निर्मिती, रसायने, तागाचे कापड, चिनी मातीची भांडी, काच, साबण, विटा, यंत्रे, तारा, औषधे, कापड, खाद्यपदार्थ इ. निर्मितिउद्योग येथे चालतात. हे एक प्रमुख लोहमार्ग प्रस्थानक आहे. येथील खाणकामविषयक शिक्षण देणारी शाळा प्रसिद्ध आहे. शहरातील एका संग्रहालयात कोळसा खाणकामाशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह केलेला आहे.
चौधरी, वसंत