व्हारबुर्ख, ओटो हाइन्रिख : (८ ऑक्टोबर १८८३-१ ऑगस्ट १९७०). जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ व वैद्य. कोशिकेतील (पेशीतील) श्वसनाविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना १९३१ सालचे शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी श्वसनविषयक ⇨ एंझाइमाचे स्वरूप व कार्य शोधण्याचे कार्य केले. 

व्हारबुर्ख यांचा जन्म जर्मनीतील फ्रायबर्ग येथे झाला. रसायनशास्त्र आणि वैद्यक या दोन्ही विषयांत त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली (१९०६ व १९११). पहिल्या महायुद्धाच्या काळात (१९१४-१८) त्यांनी सैन्यात नोकरी केली. नेपल्स येथील मरीन बायॉलॉजिकल सेंटर येथे असताना त्यांनी विविध प्रकारच्या अंडाणूंमधील (पक्व स्त्री जनन कोशिकांमधील चयापचयाचे (कोशिकेत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचे) अध्ययन केले. १९३१ साली ते बर्लिन येथील कोशिका शरीरक्रियाविज्ञानाच्या कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूटचे (माक्स प्लांक इंन्स्टिट्यूटचे) प्रमुख झाले. १९४४ साली त्यांना दुसरे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. मात्र ते ज्यू धर्मीय असल्याने त्यांना नाझी राजवटीने हे पारितोषिक स्वीकारण्यास प्रतिबंध केला.

व्हारबुर्ख यांनी आरंभी सजीव प्राण्यांतील कोशिकांमध्ये ऑक्सिजनचा ज्या प्रक्रियेद्वारे वापर होतो तिचे संशोधन केले. सजीव ऊतकांच्या कापांमध्ये ज्या त्वरांनी ऑक्सिजन घेतला जातो, त्या त्वरांच्या अभ्यासासाठी त्यांनी वायुदाबात होणाऱ्या बदलांच्या मापनाचा (वायुदाबमापनाचा) उपयोग केला. यासाठी त्यांनी अशा मापकात सुधारणा केल्या होत्या. कोशिकेतील क्रियाशील घटकांचा शोध घेत असताना सायटोक्रोम या एंझाइमाचे कार्य त्यांच्या लक्षात आले. या एंझाइमांमध्ये हीम हा लोहयुक्त गट असून तो रेणवीय ऑक्सिजनाला बद्ध करून ठेवतो. हिमाचे हे कार्य रक्तातील हिमोग्लोबीनासारखेच होते.

इ. स. १९३२ साली तथाकथित पीत एंझाइमे किंवा फ्लॅव्होप्रथिने प्रथमच वेगळी केली. त्यांना पीत व्हारबुर्ख एंझाइमे असे म्हणतात. ही एंझाइमे कोशिकेतील हायड्रोजननिरास, म्हणजे हायड्रोजन काढून टाकणार्याप विक्रियांमध्ये सहभागी असतात. ही एंझाइमे फ्लाविन ऍडेनीन डायन्युक्लिओटाइड या प्रथिन नसलेल्या घटकासह संयुक्तपणे क्रिया करतात, असेही व्हारबुर्ख यांनी शोधून काढले. या घटकाला को-एंझाइम म्हटले जाते. निकोटिनामाइड हे दुसऱ्या को-एंझाइमाचा भाग असून हे को-एंझाइमही जीववैज्ञानिक हायड्रोजननिरासात सहभागी असते. हे को-एंझाइम निकोटिनामाइड ऍडेनीन डायन्युक्लिओटाइड या नावाने ओळखले जाते.

व्हारबुर्ख यांनी ⇨ प्रकाशसंश्लेषणाचेही अनुसंधान आपले वडील व प्रसिद्ध भौतिकीविद एमील व्हारबुर्ख यांच्या मार्गदर्शनाखाली १९२० मध्येच सुरू केले होते. त्यांच्या या कार्यामुळे प्रकाशसंश्लेषणामधील ऊर्जेच्या रूपांतराविषयी विस्तृत माहिती उपलब्ध झाली. कर्करोग कोशिकांचा त्यांनी चयापचयाच्या दृष्टीने अभ्यास केला. या मारक कोशिकांच्या वाढीसाठी सामान्य कोशिकांपेक्षा लक्षणीय प्रमाणात कमी ऑक्सिजन पुरतो, हे शोधून काढणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. ते कुशल प्रयोगकर्ते होते. त्यांची वायुदाबमापकीय व प्रकाशकीय तंत्रे अनेक संशोधन प्रयोगशाळांत वापरली जातात.

व्हारबुर्ख यांना अनेक मानसन्मान मिळाले होते. ते बर्लिन येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.