व्हायरश्ट्रास, कार्ल टेओडोर व्हिल्हेल्म : (३१ ऑक्टोबर १८१५-१९ फेब्रुवारी १८९७). जर्मन गणितज्ञ. त्यांनी फलन सिद्धांत [→ फलन], श्रेढींची अभिसारिता [→ श्रेढी], अभिसारी अनंत गुणाकार [→ अनंत–१] या विषयांत संशोधन केले. त्यांनी दिलेले अवकलज नसलेल्या संतत फलनाचे उदाहरण गणिताच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. द्विघाती रूपामध्येही त्यांनी संशोधन केले. त्यांचे आबेलीय फलनावरील संशोधन विशेष प्रसिद्ध आहे. अंकगणितीकरणाच्या पायावर कलनशास्त्र [→ कलन] व फलन सिद्धांत रचण्याचा मोठा उपक्रम त्यांनी केला.

व्हायरश्ट्रास यांचा जन्म ऑस्टनफेल्ट (जर्मनी) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण निरनिराळ्या ठिकाणी झाले. १८३४ साली त्यांनी बॉन विद्यापीठात कायदा, प्रशासन व अर्थशास्त्र या विषयांच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. तथापि त्यांना गणितात रस असल्यामुळे १८३८ साली पदवी संपादन न करताच ते घरी परतले. १८३९ साली त्यांनी म्यून्स्टर येथील थिऑलॉजिक अँड फिलॉसॉफिकल ॲकॅडेमी या संस्थेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना गुडेरमान हे एक चांगले गणिताचे प्राध्यापक भेटले. व्हायरश्ट्रास यांनी आपल्या महत्त्वाच्या संशोधनात घात श्रेढीचा [→ श्रेढी] वापर केला. घात श्रेढीची संकल्पना त्यांना गुडेरमान यांच्याकडूनच मिळाली. परीक्षेकरिता त्यांनी ‘वृत्तीय फलनाचे घात श्रेढीत विस्तार’  या विषयावर प्रबंध लिहिला होता. त्यांनी सदसत् फलने घात श्रेढीत मांडून दाखविली.

व्हायरश्ट्रास यांनी जर्मनीमधील तीन माध्यमिक शाळांत नोकरी केली (१८४१-५६). त्यांपैकी ब्रॅउन्त्सेबेर्ख यथील शाळेच्या नियतकालिकात रिमार्क्स ऑन ॲनॅलिटीकल फॅक्टोरिअल्स हा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. ‘आबेल यांच्या प्रमेयाचा उपयोग करून ⇨ नील्स हेन्रिक आबेल आणि ⇨ कार्ल गुस्टाफ याकोप याकोबी यांचे फलन सिद्धांतातील संशोधन पूर्णत्वास नेणे’ हे व्हायरश्ट्रास यांचे जीवित कार्य होते. वैश्लेषिक गणिताचे सर्व सिद्धांत सत् संख्यांच्या [→ संख्या] गुणधर्मात अंतर्भूत असतात, असे त्यांनी दाखविले [→ गणिताचा तात्त्विक पाया]. १८५४ साली केनिग्झबर्ग विद्यापीठाने त्यांना सन्मान्य डॉक्टरेट पदवी दिली.

नोव्हेंबर १८५६ मध्ये त्यांना बर्लिन विद्यापीठात सहप्राध्यापक म्हणून बोलावण्यात आले. तेथेच ते १८९७ पर्यंत शिकवीत होते. १८५७ मध्ये त्यांची बर्लिन अकादमीचे सदस्य म्हणून निवड झाली. बर्लिन विद्यापीठातील त्यांचे बरेच विद्यार्थी पुढे गणितज्ञ म्हणून नावारूपास आले. या विद्यार्थ्यांपैकी ⇨ सॉन्या कव्ह्ल्येव्हस्कइ ही रशियन विद्यार्थिनी त्यांची पट्टशिष्या आणि मैत्रीण होती. तिला फ्रेंच सायन्स अकादमीचे पारितोषिक (१८८८) मिळाले, तेव्हा व्हायरश्ट्रास यांना अतिशय आनंद झाला.

विद्यापीठीय शिक्षक म्हणून व्हायरश्ट्रास यांनी गणितातील प्रत्येक शाखेचे समालोचन करणाऱ्या व्याख्यानमाला आयोजित केल्या. त्यांचे संशोधनपर निबंधही मोठ्या संख्येने प्रसिद्ध झाले. त्यांच्या लिखाणाचे सात खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी क्यूमेर यांच्या बरोबर क्रेल्स जर्नल या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही काम केले.

बर्लिन येथे त्यांचे निधन झाले.

भावे, श्री. मा.