व्हायरस : (विषाणू). संसर्गजन्य रोगांना कारणीभूत होणाऱ्या अतिसूक्ष्म रोगकारकांचा मोठा गट. न्यूक्लिइक अम्लाचा गाभा व त्याभोवतीचे प्रथिनाचे आवरण (कवच) अशा रचनेचे हे रोगकारक सर्व प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजंतू यांमध्ये महत्त्वाचे विविध संसर्गजन्य रोग निर्माण करू शकतात. प्रजननासाठी सजीव कोशिकांवर (पेशींवर) पूर्णतया अवलंबून राहाणे व स्वतंत्र चयापयाचा (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींचा) अभाव ही यांची खास वैशिष्टे आहेत. म्हणून व्हायरस हे अतिशय साधे सूक्ष्मजीव किंवा अतिशय गुंतागुंतीचे रेणू मानले जातात. व्हायरस हे न्यूक्लिइक अम्लाचे रेणू असून ते सजीव कोशिकांमध्ये घुसू शकतात तेथे आपल्या प्रतिकृती निर्माण करू शकतात आणि आपले संरक्षक आवरण तयार करण्याची क्षमता असलेल्या प्रथिनांसाठी सांकेतिक लिपी तयार करू शकतात. या अतिसूक्ष्म रोगकारकांच्या अध्ययनाला व्हायरॉलॉजी किंवा विषाणुविज्ञान म्हणतात. व्हायरिऑन हा मुळात लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ दूषित विष असा आहे.

इतिहास : व्हायरसजन्य (विषाणुजन्य) रोगांशी मानवाचा पूर्वापार परिचय आहे. चिनी वाङमयातील देवी या रोगाचा उल्लेख इ.स. पू. २००० वर्षे इतका पुरातन असल्याचे दाखले मिळतात. ⇨ पीतज्वराची माहिती मानवाला अनेक शतकांपासून आहे. युरोपीय जनतेला सोळाव्या शतकापासून व्हायरसजन्य ट्यूलिप ब्रेक हा वनस्पतीरोग परिचीत आहे. फ्रान्स आणि हॉलंड या देशांत सोळाव्या शतकात ⇨ ट्यूलिप नावाच्या आकर्षक फुलझाडाची मोठ्या प्रमाणावर लागवड होई. या फुलांच्या पाकळ्यांवरील वेधक रंगछटा व्हायरसजन्य लक्षणे असल्याचे कालांतराने लक्षात आले. १७९६ साली ⇨ एडवर्ड जेन्नर या वैद्यांनी देवीच्या रोगावर लस तयार केली. तथापि या रोगास कारणीभूत असलेला सूक्ष्मजीव मात्र पुढची ८० वर्षे सापडला नाही.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून सूक्ष्मजंतूंवर अत्यंत नेटाने संशोधन सुरू झाले. फ्रेंच शास्त्रज्ञ ⇨ लुई (ल्वी) पाश्चर (१८२२-१८९५) आणि जर्मन शास्त्रज्ञ ⇨ रॉबर्ट कॉख (१८४३-१९१०) या दोघांनी जेन्नर यांच्य लस तयार करण्याच्या अप्रगत पद्धतीत सुधारणा करून आधुनिक पद्धती शोधून काढली, परंतु ही पद्धती व्हायरसच्या बाबतीत फोल ठरली. १८६०-६५ या काळात लुई पाश्चर यांनी पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या ⇨ अलर्क रोगावर संशोधन सुरू केले. या रोगकारक जंतूचे संवर्धन करण्यास ते अपयशी ठरले. मात्र या रोगाला कोणत्याही प्रकारचा सूक्ष्मजंतू कारणीभूत नसून, साध्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसू न शकणारा असा एखादा सूक्ष्मजीव त्यास कारणीभूत असावा, असे जाहीर केले.

याच काळात हॉलंड व जर्मनी येथे ⇨ तंबाखूच्या पानांवर पडणाऱ्या केवडा (मोझाइक) या संसर्गजन्य रोगाविषयी ॲडॉल्फ मायर या जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञानी आपले मत मांडले (१८८६). रोगट कोशिकांचा कोशिकारस जर निरोगी पानांत टोचला, तर निरोगी झाडावरसुद्धा रोग पडल्याचे आढळते. हा कोशिकारस जर ५० ० सॆ. तापमानाला तापवून निरोगी पानांत टोचला, तर मात्र झाड निरोगी राहाते, मात्र त्या रोगकारक जंतूंचे स्वरूप तेव्हाही अज्ञातच राहिले.

रशियन शास्त्रज्ञ डिमिट्री इवानोवस्की यांनी १८९२ साली व्हायरसाचे आकारमान निश्चित करणारा क्रांतिकारी प्रयोग केला. चेंबरलँड राउस यांनी तयार केलेली सूक्ष्मजंतू गाळणी इवानोवस्की यांनी प्रयोगासाठी वापरली. अशा सूक्ष्मजंतू गाळणीतून गाळून घेतलेला केवडा रोगग्रस्त तंबाखू पानांचा रस निरोगी तंबाखू पानांना लावल्यास त्यांच्यात रोगनिर्मिती होत असल्याचे सिद्ध केले. ⇨ मार्टिन विल्यम बायेरिंक यांनी हा निष्कर्ष १८९८ मध्ये पडताळून पाहिला. विषाणू हा संसर्गजन्य सजीव द्रव आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. सूक्ष्मजंतू गाळणीतून पार होऊ शकणारे गालनक्षम (फिल्टरेबल) ही संज्ञा विषाणूंना प्राप्त झाली. नंतरच्या काळात मात्र कोलोडिऑन आणि प्लॅस्टिकचा वापर करून अतिसूक्ष्म छिद्रे असलेल्या व विषाणूला अटकाव करणाऱ्या रेणवीय गाळण्या तयार करण्यात आल्या आणि त्याचा गालनक्षम हा गुणधर्म फोल ठरला. १८२७ साली ⇨ फ्रीड्रिख आउगुस्ट योहानेस लफ्लर आणि पॉल फ्राश यांनी गुरांमधील ⇨ लाळ रोगाला (पायलाग रोगास) आणि ⇨ वॉल्टर रीड यांनी पीतज्वराला व्हायरस कारणीभूत असल्याचे सिद्ध केले. १९११ साली अमेरिकन विषाणूशास्त्रज्ञ ⇨ फ्रान्सिस पेटन राउस यांनी कोंबडीला झालेला कर्करोग अशा प्रकारच्या अतिसूक्ष्म जंतूमुळेच झाला असल्याचे सांगितले. पुढे तब्बल ५० वर्षांनी, म्हणजे १९६६ साली याच संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. मानव, प्राणी व वनस्पतींचे अनेक व्हायरसजन्य रोग माहीत झाले. फ्रेडरिक ट्वॉर्ट (१९१५) आणि फेलिक्स डी हॅरॅले (१९१७) यांनी सूक्ष्मजंतूचे भक्षण करणारा व्हायरस शोधून काढला. याला सूक्ष्मजंतुभक्षक (बॅक्टेरिओफाज) ही संज्ञा डी हॅरॅले यांनी प्रथम वापरली. प्लाक तंत्र विकसित करून त्यांनी व्हायरसचे परिगणन (गणनयोग्य असल्याचे) सिद्ध केले.

इ.स. १९३३ साली अमेरिकन शास्त्रज्ञ मार्टिन श्लेशिंजर यांनी व्हायरसचे रासायनिक विश्लेषण केले. हे जंतू बारीक कणांच्या स्वरूपात असून त्या प्रत्येक कणात केंद्रक आहे, असे त्यांना आढळून आले.

इ. स. १९३३-३५ दरम्यान डब्ल्यू.एन. टाकाहाशी व टी.ई. रॉलीन्स यांनी केवडा रोगग्रस्त तंबाखू पानांचा रस ध्रुवीभूत (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या) प्रकाशातून निरीक्षण केल्यास दुहेरी प्रणमन (वक्रीभवन) होत असल्याचे दाखवून दिले. यावरून त्यांनी या रोगाचा व्हायरस शलाकाकार असल्याचे अनुमान काढले, ते अचूक असल्याचे पुढे सिद्ध झाले.

इ. स. १९३५ साली अमेरिकन शास्त्रज्ञ डब्ल्यू.एम. स्टॅन्ली यांनी स्फटिकीकरणाद्वारे प्रथमच व्हायरस शुद्ध स्फटिक रूपात मिळविले आणि व्हायरस हा प्रथिन स्फटिकाचा बनलेला आहे, असे जाहीर केले.


इ. स. १९३८ साली एन.डब्ल्यू. पीरी यांनी तंबाखू केवडा रोगाच्या व्हायरसचे रासायनिक विश्लेषण करून तो प्रथिनाचा बनलेला असून त्यात मध्यभागी न्यूक्लिइक किंवा प्रकल प्रथिन आहे, असे निश्चितपणे सांगितले. निरनिराळ्या व्हायरसांवर संशोधन केल्यानंतर ते अशा निष्कर्षाला आले की, त्यांचे केंद्रक रिबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) किंवा डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) यांनी बनलेले आहे.

इ.स. १९४० सालापासून २,५०,००० पटींनी वर्धन करणारा ⇨ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक उपलब्ध झाला. (साध्या प्रकाश सूक्ष्मदर्शकाची क्षमता १,००० पटींनी वर्धन करता येईल इतकीच असते.) यामुळे व्हायरस कणांचे स्वरूप, आकार, आकारमान, स्थलाकृती, पृष्ठभागावरील रचना, आंतरभागातील संरचना, कोशिकेमधील प्रजनन इ. गुणधर्मांचा सविस्तर अभ्यास शक्य झाला. याबाबतीत विल्यम्स सिडनी, टी.एफ. अँडरसन यांची चिकाटी उल्लेखनीय आहे.

पुढेसालवेडार व ⇨ मॅक्स डेलब्र्यूक या अमेरिकन शास्त्रज्ञांनी व्हायरसच्या प्रजनन क्रियेसंबंधी संशोधन सुरू केले. मानवी व्हायरसा-संबंधात प्रामुख्याने अभ्यास सुरू असताना त्यास बळी पडणाऱ्या प्राण्यांच्या शोधात शास्त्रज्ञ मंडळी होती. १९३३ साली ब्रिटिश संशोधक विल्सन स्मिथ, एफ.डब्ल्यू. अँड्रूज आणि पॅट्रिक पी. लेडलॉ हे ⇨ इन्फ्ल्यूएंझा व्हायरस ⇨ फेरेट या प्राण्यात स्थलांतरित करण्यात यशस्वी झाले. १९४१ साली अमेरिकन शास्त्रज्ञ जॉर्ज के. हीर्स्ट यांनी कोंबडीच्या भ्रूणकोशिकेवर इन्फ्ल्यूएंझा व्हायरस वाढविण्यात यश संपादन केले.

इ. स. १९४९ साली अमेरिकन शास्त्रज्ञ ⇨ जॉन फ्रँकलिन एंडर्स, ⇨ टॉमस हकल वेलर आणि ⇨ फ्रेडरिक चॅपमन रॉबिन्स हे काचेच्या पृष्ठभागावर कोशिकांचा पातळ थर वाढवून त्या कोशिकांवर ⇨ बालपक्षाघाताला कारणीभूत असलेल्या पोलिओ व्हायरसचे संवर्धन करण्यात यशस्वी झाले. (हा शोध लागेपर्यंत चिंपँझी या माकडाच्या मेंदूत किंवा माकडाच्या मज्जारज्जूत याचे संवर्धन करीत असत.) या तंत्राच्या साहाय्याने बऱ्याच व्हायरसजन्य रोगांचा अभ्यास सुलभ झाला. ⇨ ऊतकसंवर्धन तंत्रामुळेच पुढे लशीचे उत्पादन करणे सुकर झाले.

पीतज्वर व्हायरसची कोंबडीच्या भ्रूणात वाढ केल्यास त्याची रोगकारकता कमी होत असल्याचे ⇨ मॅक्स थायलर यांनी १९५१ साली दाखवून दिले होते. या माहितीचा उपयोग करून एंडर्स यांनी बालपक्षाघाताविरुद्ध १९६२ साली लस तयार केली. माकडाच्या वृक्ककोशिकेत (मूत्रपिंडाच्या कोशिकेत) वाढ करून पोलिओ व्हायरसाचे क्षीणन करण्यात त्यांना यश मिळाले आणि त्यातून प्रतिबंधक लस तयार झाली.

सूक्ष्मजंतुभक्षक व्हायरस आणि भक्षक कोशिका यांच्यातील संक्रामण नाते जननिक दृष्ट्या अत्यंत शुद्ध स्वरूपाचे आणि आदर्श समजले जाते. त्यामुळे जननिक व आनुवंशिकतेच्या संबंधातील रसायनविषयाचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मजंतुभक्षकांचा उपयोग करण्यात आला. या अभ्यासातून पुढे ⇨ रेणवीय जीवविज्ञान या शाखेचा विकास झाला.

रसायनशास्त्र, भौतिकी व रेणवीय जीवविज्ञान या शाखांत १९६० च्या दशकात लक्षणीय संशोधन झाले. जेल विद्युत संचारण [सच्छिद्र, अक्रिय अशा सिलिका जेल या माध्यमात करण्यात येणाऱ्या विद्युत संचारणाच्या → विद्युतसंचारण] तंत्रामुळे व्हायरसमधील प्रथिन व न्यूक्लिइक अम्ल यांचे सखोल ज्ञान होण्यास मदत झाली. अत्याधुनिक अशा प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक) पद्धती उदयाला आल्या. एककृत्तकी ⇨ प्रतिपिंड व प्रथिनावरील विशिष्ट ⇨ प्रतिजन स्थान यांच्या परस्परसंबंधातून न्यूक्लिइक अम्ल आणि प्रकल प्रथिनांची संरचना व कार्य यांचे सखोल ज्ञान झाले. भौतिकी आणि स्फटिकविज्ञानातील क्ष-किरण विवर्तन पद्धतीचा [→ क्ष-किरण] शोध लागल्यामुळे अतिसूक्ष्म व्हायरस कणांचा अधिक बारकाईने अभ्यास करणे सुलभ झाले. कोशिका, जीवशास्त्र व जीवरसायनशास्त्रातील प्रगतीमुळे न्यूक्लिइक अम्ल तयार करण्यासाठी भक्षक कोशिकेचा व्हायरस कशा रितीने वापर करून घेतो, हे समजण्यास मदत झाली. कोशिकेच्या असलेल्या रासायनिक आणि भौतिक साधेपणामुळे व्हायरस या एक-कोशिकीय सूक्ष्मजीवाचा रेणवीय पातळीवरील विविध जैव प्रक्रिया समजावून घेण्यासाठी एक प्रायोगिक साधन म्हणून वापर करून घेता येतो.

भौतिक गुणधर्म : आकार व आकारमान :  इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली अवलोकन केले असता व्हायरस कणाच्या आकारात आणि आकारमानात विविधता आढळून येते. हे विविध आकार व आकारमाने व्हायरसाच्या वर्गीकरणासाठी एक मूलभूत आधार ठरतात. व्हायरसचे कण शलाकाकार, गोलाकार वा अंडाकृती असतात. तंबाखूवरील केवडा रोगाचा व्हायरस शलाकाकार तर ट्यूलिप केवडा रोगाचा व्हायरस गोलाकार आहे. सूक्ष्मजंतुभक्षक व्हायरसचा आकार शुक्रजंतूसारखा असून त्याचे डोके गोलाकार किंवा षट्कोनी तर पुच्छ शलाकाकार असते. आवरण प्रथिन आणि प्रकल प्रथिन यांच्या रचनेनुसार प्रत्येक जातीचा व्हायरस वैशिष्ट्यपूर्ण असा आकार धारण करतो. काही व्हायरसांच्या प्रकल प्रथिनाभोवती आवरण प्रथिनांचे एकापेक्षा जास्त लेप असतात. काही व्हायरसांच्या आवरण प्रथिनाभोवती एक पातळ वसा प्रथिन पटल असते. अशा विविध प्रथिनांची स्फटिकरचना स्पष्ट दिसावी म्हणून पुढील पद्धती शोधल्या गेल्या : (१) सोने, क्रोमियम, प्लॅटिनम, युरोनियम अशा धातूंचे संस्करण देऊन व्हायरस कणांच्या छायेचा अभ्यास करणे, (२) व्हायरसग्रस्त कोशिकासमूहाचे अतिपातळ छेद घेणे, (३) कार्बन संस्कारित प्रतिकृती तयार करून सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करणे व (४) क्ष-किरण स्फटिक आलेख तंत्र वापरणे.


आकारमान मापन : व्हायरस कण हे अतिसूक्ष्म असून त्यांच्या आकारमानाचे नॅनोमीटर (नॅमी.) किंवा मिलिमायक्रॉनमध्ये मापन केले जाते (१ नॅनोमीटर = १ मिलिमायक्रॉन = १०-६ मिलिमीटर). व्हायरस कणांचा व्यास २० ते २५०-४०० नॅमी. इतका असतो. सर्वांत लहान मानवी व्हायरस हा परव्होव्हिरिडी या कुलातील असून त्याचा व्यास २० नॅमी. आहे. पॉक्सव्हिरिडी या कुलातील विषाणूंचा आकार विटेसारखा असून लांबी २५० ते ४०० नॅमी.इतकी आहे. देवीच्या व्हायरसाचे आकारमान २६५ X ३१ नॅमी., ⇨ कांजिण्या व्हायरसचे आकारमान १७५ नॅमी., इन्फ्ल्यूएंझा व्हायरस १००–१२३ नॅमी., तंबाखू केवडा रोगाचा व्हायरस २८० X  १५ नॅमी., बालपक्षाघात (पोलिओ) व्हायरस २५ नॅमी., पीतज्वर व्हायरस २२ नॅमी., लाळ रोग व्हायरस १० नॅमी. आणि सूक्ष्मजंतुभक्षक व्हायरस १२० x  ५० नॅमी. आणि डोके व पुच्छ १२ नॅमी. इतके आकारमान असते.

रासायनिक गुणधर्म : न्युक्लिइक अम्ल : व्हायरसाच्या गाभात न्युक्लिइक अम्ल असून त्याभोवती प्रथिनांचे आवरण असते. म्हणून ते प्रकल प्रथिनयुक्त बनते. न्युक्लिइक अम्लात शर्करायुक्त रिबोजाचे घटक किंवा रिबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) असते. बहुतांशी वनस्पती व्हायरस आरएनए युक्त असतात. न्युक्लिइक अम्लात शर्करायुक्त डीऑक्सिरिबोजाचे घटक असतात. त्याला डीऑक्सिरिबोन्युक्लिइक अम्ल (डीएनए) असे म्हणतात. सुक्ष्मजंतुभक्षकात सहसा डीएनए हेच आढळते. तेही डोक्यातच असते. पुच्छात मात्र ग्रहणशील कोशिकेस चिकटण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून निरनिराळ्या प्रकारांची प्रथिने असतात.

एकेरी धनपेड आरएनए : व्हायरस प्रथिननिर्मितीच्या जीवरासायनिक प्रक्रियेत एम-आरएनए [संदेशवाहक (मेसेंजर) आरएनए] याचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असते. आनुवंशिकीनुसार विशिष्ट प्रथिनांची निर्मिती यामुळे साध्य होते. बऱ्याच व्हायरसांमध्ये आरएनए याचा एकेरी धनपेड हा एम-आरएनए म्हणूनच काम करतो आणि व्हायरस प्रथिननिर्मिती प्रक्रिया ग्रहणकोशिकेत सुरू होते.

एकेरी ऋणपेड आरएनए : काही व्हायरसांमध्ये आरएनए याचा एकेरी ऋणपेड असतो. तो धनपेडी एकेरी आरएनए प्रमाणॆ एम-आरएनए म्हणून काम करू शकत नाही परंतु या ऋणपेड आरएनए याचे रूपांतर एम-आरएनए यामध्ये करून घ्यावे लागते. या रूपांतरासाठी आरएनए अवलंबी (डिपेडंट) आरएनए पॉलिमरेज या एंझाइमाचे साहाय्य घ्यावे लागते.

आरएनए व डीएनए हे एकपेडी किंवा द्विपेडी असू शकतात. शलाकाकार व्हायरसांमध्ये न्युक्लिइक अम्लाचा पेड वेटोळ्यासारखा गुंडाळलेला असून त्याच्या सभोवतालच्या प्रथिन आवरणातील घटकांची मांडणी वलयाकार कड्यात झालेली असते. ही रचना मळसुत्री सममितीसारखी दिसते. बर्यालच व्हायरस कणांत घनीय सममिती आढळून येते. या कणांमधील न्युक्लिइक अम्लाभोवतीच्या आवरणातील घटकांची मांडणी विंशति-पृष्ठसमितीसारखी (वीस बाजू असणाऱ्या बहुपृष्ठकाच्या सममितीसारखी) दिसते.

आवरण : न्युक्लिइक अम्लाभोवती प्रथिनाचे एक आवरण असून ते एकसारख्या अशा अनेक घटकांचे बनलेले असते. या घटकांची आवरणातील संख्या आणि रचना प्रत्येक व्हायरसामध्ये विशिष्ट प्रकारचे असते. या आवरणाची पुढील तीन प्रमुख कार्ये आहेत : (अ) विशिष्ट एंझाइमाच्या रासायनिक प्रक्रियेपासून व्हायरसाच्या गाभ्यातील प्रकल प्रथिनांचे संरक्षण करणॆ, (आ) ग्रहणशील कोशिकेत प्रवेश मिळवणे. वेळ पडल्यास ग्रहणशील कोशिकेच्या आत या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनाद्वारे व्हायरस आपले प्रकल प्रथिन अंतःक्षेपित करू शकतो.

पटल : काही प्राणी व्हायरसांमध्ये प्रथिन-आवरणावर आणखी एक पटल आढळून येते. हे पटल बहुधा वसा प्रथिनाचे बनलेले असते. व्हायरस जेव्हा प्रजनन क्रियेनंतर ग्रहणशील कोशिकेतून बाहेर पडतो, तेव्हा हे पटल व्हायरसाभोवती तयार होते. विशेष म्हणजे मुकुलन [आधीच्या व्यक्तीच्या (व्हायरसाच्या) उद्वर्धाच्या (बाह्यवाढीच्या) रूपात नवीन व्यक्ती निर्माण होण्याच्या अलैंगिक प्रजोत्पादनाच्या] क्रियेत वसा प्रथिन पटलातील सर्व प्रथिने ही मूलत: व्हायरसनिर्मित असतात, तर वसा ही मात्र ग्रहणशील कोशिकेपासून निर्माण झालेली असते.

जैव गुणधर्म : कोशिकेबाहेर व्हायरसला स्वतंत्र चयापचय नसून त्याचे स्वयंप्रजनन होत नाही. फक्त सजीव कोशिकेत चयापचय आणि प्रजनन हा व्हायरसचा एक ठळक जैव गुणधर्म आहे. त्यात सुद्धा ग्रहणशील कोशिकेतच याची वाढ होते. यावरून फक्त पोषणासाठीच कोशिकांचा मर्यादित उपयोग ते करीत नाहीत, उलट त्या आश्रय कोशिकेमुळॆ संबंधित व्हायरसला पूर्णत्व येते, हे स्पष्ट होते. काही व्हायरस सुप्तावस्थेत कित्येक पिढ्यांपर्यंत राहू शकतात. पाश्चिरीकरणाच्या तापमानाला (६१ से., ३० मिनिटे) व्हायरस मरतात. काही तर ५६ से.ला मरतात. याला कावीळ रोगाचा व्हायरस मात्र अपवाद आहे. ते पाण्यच्या उत्कलनबिंदूवरही काही मिनिटे तग धरू शकतात. शीत तापमानाचा मात्र व्हायरसावर अनिष्ट परिणाम होत नाही. निर्वात शुष्क स्थितीत व्हायरस दीर्घ काळापर्यंत जतन करून ठेवता येतो.


सामान्यत: ५ ते ९ पीएच मूल्याच्या [→ पीएच मूल्य] विशाल व्याप्तीचा व्हायरसवर दुष्परिणाम होत नाही. मात्र चरम (टोकाची) अल्कता किंवा अम्लाता त्यांना हानिकारक ठरते.

वर्गीकरण : व्हायरसांच्या वर्गीकरणाचे अनेक प्रयत्न झाले. यांत संसर्ग-क्षमतेवर आधारित वर्गीकरणाचा समावेश होतो. उदा., तंबाखू केवडा रोग व्हायरस, ट्यूलिप केवडा रोग व्हायरस इत्यादी. वर्गीकरणाच्या दुसऱ्या पद्धतीत ऊतकासक्ती (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहाविषयीचे आकर्षण) पायाभूत ठरते उदा., मज्जासक्ती, त्वचासक्ती इत्यादी. वैद्यक क्षेत्रात काम करणाऱ्याला मुख्यत्वेकरून ही पद्धत उपयुक्त ठरते परंतु १९५० सालानंतर व्हायरसची स्थलाकृती, रचना, रासायनिक संरचना, प्रजनन पद्धती, न्यूक्लिइक अम्लाचा प्रकार वगैरे माहिती अधिकाधिक उपलब्ध होऊ लागल्यानंतर गुणधर्माधिष्ठित वर्गीकरण प्रचारात येऊ लागले.

व्हायरस या कणरूपी जीवांना कोणी समान पूर्वज असल्याचा कोणताही दाखला नाही. व्हायरसाच्या विविध गुणधर्मांचा अभ्यास केल्यानंतर लायनेन यांनी प्राणी आणि वनस्पती यांच्यासाठी तयार केलेली वर्गीकरण पद्धती व्हायरसांसाठी देखील लागू पडली. त्यांचेदेखील विभाग, उपविभाग, कुल, उपकुल, प्रजाती, जाती अशा पद्धतीने वर्गीकरण करणे शक्य झाले आहे. १९७० च्या पूर्वदशकात आंतरराष्ट्रीय व्हायरस वर्गीकरण समिती स्थापन करण्यात आली. या समितीने व्हायरसांचे तीन प्रमुख विभागांत वर्गीकरण केले : (१) प्राणी व्हायरस, (२) वनस्पती व्हायरस व (३) सूक्ष्मजंतुभक्षक व्हायरस. व्हायरसच्या विविध गुणधर्मांवर आधारित त्याचे कुल, उपकुल, प्रजाती, जाती असे वर्गीकरण करणे सुलभ झाले. व्हायरसचा आकार, आकारमान, पटलाचे अस्तित्व, आवरण, प्रथिनांची संख्या, एकपेडी किंवा द्विपेडी न्यूक्लिइक अम्ल, मळसूत्री किंवा विंशतिफलक सममिती, आरएनए याची धन किंवा ऋण पेड, जनुक [→ जीन] प्रकटनाची पद्धती, रोगाची लक्षणे, ग्रहणशील कोशिका आणि व्हायरस यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण नाते इ. गुणधर्मांचा वर्गीकरणात समावेश केला जातो. पुढे दिलेल्या सहा तक्त्यांमध्ये प्राणी व्हायरस, सूक्ष्मजंतुभक्षक व्हायरस आणि वनस्पती व्हायरस यांचे वर्गीकरण दिले आहे.

व्हायरसांचे महत्त्व व प्रतिबंधक उपाय : ज्या सजीव कोशिकांमध्ये व्हायरस शिरतात, त्या कोशिका नष्ट होतात अथवा त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले जाते. यामुळे व्हायरस हे रोगास कारणीभूत होऊ शकणारे संभाव्य रोगकारक आहेत. माणसाला होणारे अनेक संसर्गजन्य रोग हे व्हायरसांमुळे होतात. (उदा., अलर्क रोग, देवी, बालपक्षाघात, यकृतशोथ, इन्फ्ल्यूएंझा, पडसे, गोवर, कांजिण्या, वारफोड्या वगैरे). शिवाय पाळीव प्राण्यांनाही व्हायरसामुळे रोग होतात (उदा., लाळ रोग, डुकरांचा पटकी, डिस्टेंपर इ.) आणि अन्नधान्याच्या पिकांवरही व्हायरसामुळे रोग पडतात (उदा. करप्पा, केवडा रोग, भात व टोमॅटोवरील काही रोग).

तक्ता क्र. २. आरएनए प्राणी व्हायरस

व्हायरसचे कुल

आकार सममिती

माप (नॅनोमीटर)

आवरण प्रथिन संख्या/आकार

न्यूक्लिइक अम्लाचा आकार

रेणवीय वजन (डाल्टन)

वैशिष्ट्य

पॉक्सव्हिरिडी

विटेसारखा

३५० X २४० X २००

डंबेल आकार

२० X १०१२

प्रजनन हे ग्रहणशील कोशिकेवर अवलंबून नाही.

हेरपेसव्हिरीडी

विंशतिफलक

१२० – २००

१६२

सरळ रेखाकृती

८० – १५० x १०

बक्युलोव्हिरिडी 

शलाकाकार

२०० – ४०० x ४० – ६०

वर्तुळाकार

६० – १०० x १०

ॲडिनोव्हिरिडी

विंशतिफलक

७५

२५२

सरळ रेखाकृती

२०-२५ x १०

पापोव्हाव्हिरिडी

विंशतिफलक

४५ – ५५

७२

वर्तुळाकार

५ x १०

इरिडोव्हिरिडी

विंशतिफलक

१२० – १८०

१२६ x १०

कार्बनी विद्रावकांचा परिणाम होत नाही.

परव्होव्हिरिडी

विंशतिफलक

२०

३२

१·५८ x १०

ऋण एकपेडी डीएनए डिपेंडी व्हायरसला प्रजननासाठी अडिनोव्हायरसची मदत लागते.

तक्ता क्र. २.आरएनए प्राणी व्हायरस

व्हायरसचे कुल

आकार सममिती

माप (नॅनोमीटर)

आवरण प्रथिन संख्या/आकार

न्यूक्लिइक अम्लाचा आकार

रेणवीय वजन (डाल्टन)

वैशिष्ट्य

कॉरोनाव्हिरिडी

गोलाकार

८० – १६०

मळसूत्री

टोगाव्हिरिडी

गोलाकार

४० – ७५

विंशतिफलक

४-४·६ x १०

रेट्रोव्हिरिडी 

गोलाकार

८० – १००

३ x १०

कर्करोग व एड्‌सचे कारण

पिकोर्नाव्हिरिडी

विंशतिफलक

२७ – ३०

१२

२·५ x १०

कॅल्सीव्हिरिडी

विंशतिफलक

३५ – ३९

३२

२·५ x १०

नोडव्हिरिडी

विंशतिफलक

२५

०·४६ x १०

अरेनाव्हिरिडी

गोलाकार

८० – १६०

ऑर्थोमिक्झोव्हिरिडी

गोलाकार

८० – १२०

– 

इन्फ्ल्यूएंझाचे कारण

पॅरामिक्झोव्हिरिडी

गोलाकार

१५०

५ – ७ x १०

– 

ऱ्हेब्डोव्हिरिडी

बंदुकीच्या गोळीसारखा

१७० X ७०

– 

अलर्क रोगाचे कारण

बुन्याव्हिरिडी

गोलाकार / अंडाकृती

९० x १००

– 

– 

रिओव्हिरिडी

विंशतिफलक

७५

– 

– 


तक्ता क्र. ३. प्राणी व्हायरस


तक्ता क्र. ४. प्राणी व्हायरस


तक्ता क्र. ५. सूक्ष्मजंतुभक्षफ व्हायरस


तक्ता क्र. ६ वनस्पती व्हायरस


फिनॉल, फॉर्माल्डिहाइड, क्रेसॉल इ. रासायनिक जंतुनाशके किंवा जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरण यांचा व्हायरसांवर विपरीत परिणाम होत नाही. तसेच प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ, ⇨ प्रतिपिंडे, सल्फोनामाइड व इतर रसायने यांचा व्हायरसांच्या संसर्गावर काहीच परिणाम होत नाही. व्हायरस कोशिकेच्या आतच वाढत असल्याने (म्हणजे त्याची संख्या वाढत असल्याने) ही रसायने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत.

अशा प्रकारे व्हायरसांच्या संख्यावाढीला (प्रजननाला) अटकाव करण्यासारखे काही करता येत नाही. कारण सजीव कोशिकांच्या संश्लेषणविषयक क्षमतांचा वापर करूनच व्हायरस आपली संख्या कोशिकांमध्ये वाढवीत असतात. तथापि व्हायरसांमधील न्यूक्लिइक अम्लांच्या प्रतिकृती बहुधा नेहमीच व्हायरसांमधील सांकेतिक लिपिबद्ध ⇨एंझाइमांमार्फत तयार होत असतात. व्हायरसांचा संसर्ग न झालेल्या कोशिकांमध्ये ही एंझाइमे नसतात. यामुळे अशा कोशिका व्हायरस प्रतिबंधक ⇨रासायनी चिकित्सेच्या दृष्टीने उपयुक्त व महत्त्वाच्या आहेत.

व्हायरसांच्या प्रजननाला प्रतिबंध करणारी असंख्य रासायनिक संयुगे माहीत आहेत. मात्र अनिष्ट आनुषंगिक परिमाण न होता यांपैकी अगदी थोडीच रसायने व्हायरसांचे प्रजनन प्रभावीपणे थांबवू शकतात. उदा., रिबोडीऑक्सिरिबोन्यूक्लिओसाइडांची समधर्मी संयुगे सर्वात प्रभावी ठरली आहेत.

व्हायरस प्रतिबंधक द्रव्ये म्हणून आता ⇨ इंटरफेरॉने या संयुगावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोशिकेचे विभाजन व रोगप्रतिकारक्षमतेची कार्यप्रणाली यांच्याशी निगडीत असलेल्या जनुकांचे नियमन इंटरफेरॉनांमार्फत होत असते. व्हायरसांच्या संसर्गामुळे इंटरफेरॉनांच्या निर्मितीला चांगली चालना मिळते. प्रतिपिंडे निर्माण होईपर्यंतच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये इंटरफेरॉंने व्हायरस संसर्गाविरुद्धच्या पहिल्या संरक्षणफळीचे काम करतात. व्हायरसाच्या आधीच्या संदेशक रेणूंकडून होणाऱ्या जननिक परिवर्तनाला इंटरफेरॉने प्रतिबंध करतात व यामुळे व्हायरस प्रजननात हस्तक्षेप होतो. परिणामी व्हायरसातील आवरण प्रथिने निर्माण होऊ शकत नाहीत व व्हायरसांचे प्रजनन थांबते. (जननिक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत संदेशक आरएनए यामध्ये असलेल्या जननिक माहितीद्वारे प्रथिन संश्लेषणातील रिबोसोमाच्या जागी एक प्रथिन रेणू निर्माण होतो).

लशीच्या साहाय्याने रोगप्रतिकारक यंत्रणा संघटित करून सक्रिय करणे वा सज्ज करणे, हा व्हायरसजन्य रोगांना प्रतिबंध करण्याचा सर्वांत प्रभावी उपाय ठरतो. व्हायरसप्रतिबंधक लशींचे दोन प्रकार आहेत. ते म्हणजे निष्क्रिय केलेल्या व्हायरसांच्या लशी आणि क्षीणशक्तिक व्हायरसांच्या लशी या दुसऱ्या प्रकारच्या आहेत. इतर लशींच्या बाबतीतील तत्त्वेच व्हायरसप्रतिबंधक लशींना लागू आहेत. म्हणजे लशीतील व्हायरसांमुळॆ शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. जेव्हा जोमदार व्हायरस शरीरावर हल्ला करतात, तेव्हा ही प्रतिपिंडे त्यांना निष्प्रभ करतात. [→ लस व अंतःक्रामण].

पहा : आनुवंशिकी इंटरफेरॉने करपा कीटक केवडा रोग गाठी, वनस्पतींच्या जंतुविषरक्तता न्युक्लिइक अम्ले बालपक्षाघात वनस्पतीरोगविज्ञान वैद्यक सूक्ष्मजीवविज्ञान.

संदर्भ : 1. Dimmock, N. J., Ed., Introduction to Modern Virology, 1942.

            2. Levy, J. A., Ed., Virology, 1994.

            3. White, D. O. Fenner, F. Medical Virology, 1994.

गर्गे, रंजन


व्हायरस

संगणकाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या व्हायरसांच्या प्रतिमा (यामध्ये व्हायरसांची प्रथिन-आवरमे त्रिमितीय स्वरूपात दाखविली आहेत) :

(अ) नॉरवॉक व्हायरस, (आ) सदर्नबीन मोझाइक व्हायरसाची समोरील बाजू
(इ) ॲडिनोव्हायरस (ई) रॉस रिव्हर व्हायरस
(उ) पॉलिओमा व्हायरस (ऊ) सेमलिकी फॉरेस्ट व्हायरस
(ए) सूक्ष्मजंतुभक्षक फाय CbK व्हायरसाच्या पुच्छ जोडणीच्या मागील बाजूचे दृश्य