व्हॅल्डीझ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्यातील एक शहर. लोकसंख्या ४,०६८ (१९९०). हे अलास्का आखाताच्या प्रिन्स विल्यम साउंडवर वसलेले आहे. वर्षभर खुले असलेले उत्तर अमेरिकेचे हे सर्वांत उत्तरेकडील बंदर आहे. पूर्वी याला ‘तांब्याचे शहर’ म्हणून ओळखले जाई. इ.स. १७९० मध्ये स्पॅनिश समन्वेषक साल्व्हादोर फिदल्गो याने याचा शोध लावला. स्पॅनिश नौसेना अधिकारी आंतोन्यो व्हॅल्डीझ याचे नाव या शहराला देण्यात आले. १८९८ मध्ये यूकॉन सोने-क्षेत्राकडे जाण्याचे हे प्रवेशद्वार बनले. ट्रान्स-अलास्का या तेल नळमार्गाचे हे दक्षिणेकडील अंतिम ठिकाण आहे. या नळमार्गाने १,३०० किमी.वरील प्रदो उपसागरापासून व्हॅल्डीझपर्यंत तेल वाहून आणले जाते. तेल साठवणुकीसाठी येथे मोठमोठ्या टाक्या आहेत. १९७० नंतर हा नळमार्ग टाकायला सुरुवात झाल्यापासून येथील लोकसंख्येत वाढ होत गेली.
खनिज तेल उत्पादन हा येथील मुख्य उद्योग असून, त्याशिवाय खाणकाम, व्यापार, पर्यटन (शिकार व मासेमारी), जहाजवाहतूक व फरची शेती हे व्यवसाय येथे चालतात. येथील समुद्रात सॅमन माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. १९६४ मधील भूकंपात शहराची अपरिमित हानी झाली. त्यामुळे पश्चिमेस आठ किमी. अंतरावरील सुरक्षित स्थळी नगराची पुनःस्थापना करण्यात आली. जवळच कोलंबिया हिमनदी आहे. २४ मार्च १९८९ रोजी एक्सॉन व्हॅल्डीझ या तेलबोटीमधून येथे फार मोठ्या प्रमाणात तेलगळती झाली होती.
चौधरी, वसंत