व्हर्बिनेसी : (साग कुल). फुलझाडांचे एक कुल. फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] वनस्पतींच्या वर्गीकरणात पर्सोनेलिण (बद्धौष्ठी गण) या फार प्रगत गणात या कुलाचा अंतर्भाव आहे. ⇨स्क्रोफ्यूलॅरिएसी, ⇨ बिग्नोनिएसी, ⇨ ॲकँथेसी, लॅबिएटी इ. नऊ कुलांचाही या गणात समावेश आहे. जे. हचिन्सन यांनी व्हर्बिनेलीझ या स्वतंत्र गणात या कुलाशिवाय इतर चारींचा समावेश केला आहे. तथापि याबद्दल मतभेद आहेत. फुलांतील एकसमात्रता (एकाच उभ्या पातळीने दोन सारखे भाग होण्याची क्षमता), द्वयोष्ठक (दोन ओठासारखा) व बद्धौष्ठी (मिटलेल्या तोंडासारखा) पुष्पमुकुट सतत राहणारा संवर्त, केसरमंडलातील कमी झालेली दलसंख्या व दोन किंजदलांचा ऊर्ध्वस्थ किंजपुट [→ फूल] इ. लक्षणे पर्सोनेलींझ गणातील सर्व कुलांत आढळतात. व्हर्बिनेसी कुलात सु. ८० प्रजाती व ८०० जाती असून त्यांचा प्रसार मुख्यतः उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे. त्या वनस्पती ⇨ औषधी, झुडपे, वृक्ष व क्वचित वेली असून पाने समोरासमोर, क्वचित एकाआड एक, साधी अथवा संयुक्त असतात. फुलोरे विविध व फुले क्वचित अरसमात्र (कोणत्याही लंब पातळीत दोन सारखे भाग होणारे), अवकिंज, द्विलिंगी असतात. संदले पाच, जुळलेली प्रदले (पाकळ्या) पाच, जुळलेली व अनियमित, विस्तारलेली केसरदले (पुं-केसर) चार, दीर्घद्वयी (दोन अधिक लांब), दोन किंवा क्वचित पाच असतात. किंजदले (स्त्री-केसर) दोन, बहुधा जुळलेली, ऊर्ध्वस्थ, कप्पे दोन किंवा चार, किंजल अग्रस्थ, बीजके (विकासपूर्ण बिया) प्रत्येक कप्प्यात १-२ व अधोमुखी असतात. फळ बहुशः अश्मगर्भी (आठळीयुक्त) व बिया १ – ४ असतात. घाणेरी, व्हर्बिना, सागवान, बनलगाय, निर्गुडी, सीतारंजन, पेट्रिया, क्लेरोडेंड्रॉन, तिवर इ. कमीजास्त उपयुक्त सामान्य वनस्पती याच कुलातील आहेत.

चौगले, द. सी.