व्हर्कोयान्स्क : रशियाच्या (रशियन फेडरेशन) अगदी ईशान्य भागातील याकूत्स्क स्वायत्त गणराज्यातील एक पर्वतश्रेणी व याच नावाचे एक गाव. ही पर्वतश्रेणी सर्वसाधारणपणे उत्तर – दक्षिण दिशेने ५४० अंश उत्तर अक्षांशापासून उत्तरेस लॅप्टेव्ह समुद्रापर्यंत पसरलेली आहे. भूवैज्ञानिकदृष्ट्या या श्रेणीचा समावेश बळीच्या (घड्यांच्या) पर्वतप्रकारात होत असून विमुखनती (कमानीसारखा आकार असलेली खडकांतील घडी) रचनेचे हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. लीना व अल्डान नद्यांच्या उजव्या काठावरील मोठा वक्राकार प्रदेश व्यापलेल्या या श्रेणीची लांबी सु. १,१०० किमी. व सरासरी उंची १,००० मी. पेक्षा जास्त असून दक्षिण भागात तिची उंची २,३८९ मी. पर्यंत वाढत जाते. सायबीरियाच्या अतिथंड प्रदेशातील या श्रेणीमुळे लीना व याना, इंडिगिर्का या नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी झाली आहेत. इंडिगिर्का, याना, अमलॉई या नद्यांचे शीर्षप्रवाह याच श्रेणीत उगम पावतात. या प्रदेशात मानवी वस्ती अगदी तुरळक आहे. पर्वतश्रेणीत दगडी कोळसा तसेच चांदी, शिसे व जस्त यांच्या धातुकांचे साठे असून हरिता व दगडफूल या टंड्रा प्रकारच्या वनस्पती आढळतात. ही श्रेणी ओलांडून जाणारे वाहतूकमार्ग नाहीत.
व्हर्कोयान्स्क हे सायबीरियाच्या अतिथंड प्रदेशातील छोटे गाव असून ते उत्तर ध्रुववृत्ताजवळ याना नदीकाठी याना-सारतंग नद्यांच्या संगमाजवळ वसलेले आहे. जगातील वस्ती असलेल्या ठिकाणांपैकी, हिवाळ्यातील किमान तापमानासाठी ( –६८.५० अंश से.) हे प्रसिद्ध आहे. येथील जानेवारीचे सरासरी तापमान – ४९० अंश से. असते. इ. स. १६३८ मध्ये याची स्थापना झाली व येथे एक किल्ला बांधण्यात आला. १९१७ पर्यंत याचा वापर हद्दपार केलेल्या राजकीय कैद्यांना ठेवण्यासाठी होत होता. हे एक छोटे नदीबंदर व फरच्या व्यापाराचे केंद्र असून याच्या परिसरात कथिल व सोने याच्या खनिजांच्या खाणी आहेत.
बागवान, सि. ज. चौधरी, वसंत