व्रात्य : ‘व्रात्य’ हा शब्द काही विशिष्ट लोकांचा वाचक आहे. हे लोक नेमके कोण होते, ह्याबद्दल वैदिक व अन्य प्राचीन साहित्यातील निर्देशांवरून अभ्यासकांनी काही अनुमाने केली आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या त्रैवर्णिकांपैकी जे कोणी मुख्य संस्कारांच्या लोपामुळे  – विशेषतः ‘सावित्रीपतित’ झाल्यामुळे-म्हणजे उपनयनाच्या संस्काराचा लोप झाल्यामुळे –जातिभ्रष्ट झालेले असतात, ते ‘व्रात्य’ होत, अशा आशयाचा निर्देश मनुस्मृतीत आलेला आहे (२·३९). अधम, पतित, पाखंडी, भटक्या अशा लोकांची गणनाही व्रात्यांमध्ये केली जात असे. तसेच शूद्र पिता आणि क्षत्रिय माता ह्यांच्या संततीसही व्रात्य म्हणून संबोधिले जात असे, असे दिसते. काहींच्या मते व्रात्य हा भारतातील एक आर्येतर समाज होता. त्याच्यात विद्वान, सदाचारी, सतत भ्रमण करीत राहणारे असे ‘अर्हत’ आणि लोकांना पीडा देणारे, त्यांना लुटणारे ‘यौध’ असे दोन मुख्य वर्ग होते. अथर्ववेदातील पंधरावे कांड हे ‘व्रात्यकांड’ असून, त्यात व्रात्यांचा गौरव केला आहे. ह्या कांडाच्या नवव्या व दहाव्या सूक्तांत म्हटले आहे की, सभा, समिती, सेना आणि सुरा ज्याला अनुकूल आहे, असा व्रात्य ज्या राजाकडे अतिथी म्हणून जातो, त्या राजाने त्या व्रात्याला स्वत:पेक्षा श्रेष्ठ समजून त्याचा सन्मान करावा. [→ अथर्ववेद].

व्रात्य ही एक भटकी जमात होती हे लोक मुळात आर्यवंशाचेच होते परंतु आर्यांच्या समाजव्यवस्थेपासून फुटून निघालेले आणि त्यामुळे तिच्यापासून पूर्णतः  स्वतंत्र असे जीवन जगणारे होते, असे मत ⇨ आल्ब्रेख्त वेबर ह्यांनी व्यक्त केले आहे. ⇨ मॉरिस ब्लूमफील्ड ह्यांच्या मते व्रात्य हे आर्यवंशीय परंतु अब्राह्मण जमातीतून आर्य ब्राह्मणांमध्ये आलेले लोक होत.

सिंधूच्या खोऱ्यात राहणारे लोक व्रात्यच होते, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. मोहें-जो-दडो येथील उत्खननात सापडलेल्या एका मुद्रेत तीन मुखे कोरलेली असून त्यांतील एक पुरुषाचे, दुसरे स्त्रीचे आणि तिसरे त्यांच्या पुत्राचे आहे, असे निरीक्षण नोंदविण्यात आले असून ही त्रिमूर्ती म्हणजे व्रात्यांचा देव असावा, असाही तर्क केला जातो.

वैदिक वाङ्मयात व्रात्यांची जी वर्णने आलेली दिसतात, त्यांनुसार व्रात्य हे उघड्या युद्धरथात बसून संचार करीत धनुष्य, भाले अशी आयुधे ते जवळ बाळगीत डोक्याला पागोट्यासारखे शिरस्त्राण, अंगावर तांबडे काठ असलेली वस्त्रे, पांघरायला दोन घड्या घातलेले मेंढ्याचे कातडे असा त्यांचा वेश असे त्यांचे नेते करड्या रंगाची वस्त्रे परिधान करीत आणि गळ्यात चांदीचे अलंकार घालीत व्यापार वा शेती ह्यांपैकी ते काहीच करीत नव्हते आर्य ब्राह्मणांची भाषाच ते बोलत परंतु त्या भाषेतील साधे शब्दही उच्चारणे त्यांना कठीण वाटे.

सामवेदाच्या तांड्य ब्राह्मणामध्ये व्रात्यांना शुद्ध करून आर्य ब्राह्मणांत समाविष्ट करण्यासाठी करावयाच्या ‘व्रात्यस्तोम’ विधीचे वर्णन आहे (१७.१.४). येथे व्रात्यांचे चार प्रकार सांगितले आहेत : (१) आचारभ्रष्ट, (२) नीच कर्मे करणारे, (३) जातिबहिष्कृत आणि (४) जननेंद्रियाची शक्ती नष्ट झालेले. ह्या चार प्रकारच्या व्रात्यांसाठी चार व्रात्यस्तोमही सांगितलेले आहेत. ह्या सर्व व्रात्यस्तोमांचे विधान अग्निष्टोम यागाप्रमाणे आहे.

पहा : जातिसंस्था.

कुलकर्णी, अ. र.