व्यायामशाळा : (जिम्नेझिअम). व्यायाम करण्यासाठी खास सुविधा असलेल्या, तसेच अंतर्गेही खेळांसाठी पुरेशी जागा व क्रीडासाधने असलेल्या इमारतीला उद्देशून ही संज्ञा वापरली जाते. प्राचीन काळीही व्यायामशाळा असत. प्राचीन ग्रीसमधील व्यायामशाळांच्या इमारती मोठ्या व प्रशस्त असत. त्यांत निरनिराळ्या खेळांच्या व व्यायामाच्या सोयींव्यतिरिक्त संगीत व इतर कलांसाठीही स्वतंत्र विभाग, तसेच स्नानासाठी स्वतंत्र खोल्या असत. मूळ ग्रीक शब्द ‘जिम्नॉस’ (अनावृत, न झाकलेले) हे  व्यायाम अनावृत वा उघड्या शरीराने केले जात, त्यावरून हा शब्द आला. जिम्नॉवरून ‘जिम्नॅस्टिक्स’, ‘जिम्नेझिअम’ तसेच ‘जिमखाना’ इ. शब्द रूढ झाले. ग्रीकांच्या सामाजिक व राष्ट्रीय जीवनात खेळांच्या स्पर्धांना महत्त्वाचे स्थान होते. ग्रीकांच्या अथेन्स, स्पार्टा इ. अनेक नगरराज्यांमध्ये अनेक वेळा युद्धे होत. त्यासाठी सैनिकांना तयार करण्यासाठी शासनाने व्यायामशाळा बांधल्या. या व्यायामशाळांवर देखरेख करण्यासाठी व तेथील तरुणांना शिक्षण देण्यासाठी नेमलेले अधिकारी व शिक्षक हेसुद्धा शासकीय असत. व्यायामशाळांबद्दल ग्रीक तरुणांमध्ये फार मोठे आकर्षण होते. त्या काळच्या वैद्यकशास्त्राच्या लेखकांनीसुद्धा व्यायामशाळेची महती व्यायामाच्या अंगोपांगांची सविस्तर चर्चा करून स्पष्ट केली असल्यामुळे, तरुणांमध्ये व्यायामशाळेबद्दल स्वाभाविकच आस्था निर्माण झाली होती. ग्रीक जिम्नेझिअममध्ये स्नानगृहे, कपडे बदलण्याची दालने, अंगाला मालीश करणे, तेल लावणे इत्यादींसाठी बंदिस्त जागा असत. सभोवती मध्यंतरीचा विश्रांतिकाळ घालवण्यासाठी उद्याने, सावलीचे वृक्ष, उपाहारगृहे इ. सोयी असत.

इ. स. पू. चौथ्या शतकाच्या अखेरीस जिम्नेझिअम हे ग्रीक तरुणांसाठी शैक्षणिक-सांस्कृतिक केंद्र बनले. तत्त्वज्ञ व विद्वान लोक आपले विचार लोकांपुढे मांडण्याकरिता या व्यायामशाळांचा सभागृहासारखा उपयोग करीत. प्लेटो, ऍरिस्टॉटल व अँटिस्थिनीझ हे विद्वान आपल्या सभा अनुक्रमे ‘अकादमी’, ‘लायशियम’ व ‘सायनोसार्गेस’ या तीन व्यायामशाळांत घेत असत. या व्यायामशाळांमध्ये हर्मीज, हर्क्यूलिझ व कुस्तीचा जनक थीस्यूस यांचे, तसेच राष्ट्रपुरुषांचे पुतळे असत. शिवाय धार्मिक व ऐतिहासिक घटनांवर प्रकाश टाकणारी चित्रेही असत. तरुणांनी भावी जीवनात शांतिदूत व उत्तम लढवय्या अशी दुहेरी भूमिका प्रभावीपणे बजावण्याच्या दृष्टीने त्यांची सर्वतोपरीने तयारी या व्यायामशाळांत करून घेतली जाई.

आधुनिक धर्तीची व्यायामशाळा सर्वप्रथम फ्रीड्रिख यान (१७७८–१८५२) या जर्मन शिक्षणतज्ज्ञाने १८११ मध्ये बर्लिन येथे उभारली. ती ‘टर्नप्लात्झ’ (ऍथ्लेटिक फील्ड) म्हणून ओळखली जाते. नंतर जर्मनीमध्ये त्या धर्तीवर अनेक व्यायामशाळा निर्माण झाल्या. जर्मन तरुणांमध्ये प्रखर देशभक्ती व आक्रमकांविरुद्ध प्रतिकारसामर्थ्य निर्माण करणे, हे या व्यायामशाळांचे उद्दिष्ट होते. फ्रीड्रिख यान हा ‘टर्नव्हेटर’ (व्यायामविद्येचा जनक) म्हणून ओळखला जातो. त्यानंतर अल्पावधीतच जर्मन धर्तीवरील व्यायामशाळा अमेरिका, इंग्लंड इ. राष्ट्रांत उभारण्यात आल्या. व्यायामशाळांतील साधनसामग्री व सोयीसुविधा या अतिशय झपाट्याने प्रगत होत गेल्या. विसाव्या शतकातील पाश्चिमात्य देशांतील काही प्रसिद्ध व्यायामशाळांच्या इमारतींत व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस इ. खेळांच्यादेखील सोयी केलेल्या आहेत. शिवाय प्रेक्षकांना बसण्यासाठी पायर्यां ची आसनव्यवस्थाही केलेली असते.

आधुनिक व्यायामशाळांमध्ये सर्वसाधारणपणे पुढील साधन-सुविधा उपलब्ध असतात : (१) जोड दंड (पॅरलल बार्स), (२) आडवा दंड (हॉरिझॉंटल बार), (३) लाकडी कड्या (रोमन रिंग्ज), (४) उड्या शिकण्यासाठी कड्यांच व बिनकड्यांचे लाकडी घोडे, (५) दांड्यांचे स्थिर एकेरी व जोडझुले, (६) दोन चढण्याच्या सरावासाठी टांगते दोर, (७) वजन उचलण्याची अद्ययावत साधनसामग्री, (८) लहानमोठ्या आकारांच्या लोखंडी डंबेल्स, (९) साधनविरहित, जमिनीवरील कसरती करण्यासाठी काथ्याच्या गाद्या (मॅटवर्क अँड टम्बलिंग) इत्यादी.

पाश्चिमात्य धर्तीच्या आधुनिक व्यायामशाळा भारतातदेखील अनेक ठिकाणी आढळतात. तथापि आपल्याकडील देशी व्यायामशाळांची-म्हणजे आखाड्यांची-परंपराही फार प्राचीन काळापासून आहे.  

सर्वसाधारणपणे या आखाड्यांची बांधणी ठरावीक पद्धतीची दिसून येते. त्यातील खिडक्यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. आखाडा हिंदूंचा असेल, तर त्यात मारुतीची आणि मुसलमानांचा असेल, तर त्यात अल्लाच्या पंजाची स्थापना केलेली असते. मारुतीची दर शनिवारी, तर पंजाची दर गुरुवारी पूजा करण्यात येते. आखाड्याच्या एका कोपऱ्यात कुस्तीचा हौदा असतो. या हौद्यात तांबडी माती असते. या तांबड्या मातीची मशागत विशिष्ट पद्धतीने केली जाते. ही माती कुस्ती खेळताना अंगाला घासली जाते, तशीच ती नाकातोंडातसुद्धा जाते. त्यामुळे तिच्यापासून काही अपाय होऊ नये किंवा शरीरावर चट्टे उठू नयेत, म्हणून वर्षातून साधारणत: दोन वेळा त्या तांबड्या मातीत ताक, लिंबाचा रस,कापूर,बुक्का,अत्तरे इ.गोष्टी मिसळल्या जातात. तसेच तिच्यावर पाण्याचा नियमित शिडकावा केला जातो. कुस्ती खेळताना अंग गरम होते, त्यावर वारा लागला तर ते अपायकारक असल्यामुळे माती ही हौद्याच्या काठापासून चार फुट (सु. १.२२ मी.) खोलीवर असावी, असा नियम आहे. तसेच कुस्तीच्या काही डावांमध्ये कुस्ती खेळणारा फेकला जातो. त्यावेळी त्याचे पाय हे हौद्याच्या काठावरील टणक पृष्ठभागावर आपटणचा संभव असल्यानेदेखील ही खोली आवश्यक आहे [→ कुस्ती]. आखाड्यात सर्वसाधारणपणे पुढील साधनसुविधा असतात : (१) दगडी गोळे. (२) लहानमोठ्या वजनांचे वर्तुळाकार दगडी नाल. या नालेस मध्यभागी भोक पाडून मूठ केलेली असते. लोखंडी डंबेल्सप्रमाणे हिचा वापर करता येतो. (३) गर्दन चांगली करण्यासाठी गळ्यात अडकवण्याच्या निरनिराळ्या आकारांच्या चक्क्या. (४) जड जोड्या, करेला, जड लेझीम. (५) संतोला-हा एक छोटा लाकडी ओंडका असतो. त्याला असलेल्या दोन मुठींना धरून अनेक हात करतात. तसेच खांद्यास किंवा कमरेस दोरी बांधून तो मातीत फिरवतात. (६) आखाडा खणण्याच्या व्यायामासाठी लहानमोठ्या आकारांची खोरी. (७) जोर मारण्यासाठी हाताखाली ठेवण्याकरिता चौकोनी दगड (त्याला ‘हत्ती’ असेही म्हणतात). (८) मल्लखांब [→ मल्लखांब].


शारीरिक कसरीतींची आधुनिक साधने

भारतात रामायण-महाभारत काळातही व्यायामशाळेत शिकविले जाणारे कुस्तीसारखे प्रमुख क्रीडाप्रकार होते. त्यांत (१) भीमसेनीकुस्ती (प्रतिस्पर्ध्याला उचलून फेकणे महत्त्वाचे). (२) जांबुवंती कुस्ती (उभ्याउभ्याने प्रतिस्पर्ध्याबरोबर झटापट करणे. अस्वले, माकडे, कांगारू अशा प्रकारे एकमेकांबरोबर लढतात). (३) हनुमंती कुस्ती (प्रतिस्पर्ध्याच्या सर्वांगाशी झटापट करून त्याला लोळविणे वा गारद करणे) या कुस्तीप्रकारांचा समावेश असे. व्यायामशाळांचा विशेष प्रसार शिवाजी महाराजांच्या काळात झाला. गावाबाहेर वीरमारुतीचे मंदिर स्थापन करून त्याभोवती समर्थ रामदासांनी महाराष्ट्रातील खेडोपाडी बलोपासनेस चालना दिल्याचा उल्लेख सापडतो. तालमीतील मारुती शक्तीचे प्रतीक म्हणून गदाधारी किंवा द्रोणागिरी उचललेला असतो. पुढे पेशव्यांच्या काळातही युद्धशिक्षण देणारे अनेक उस्ताद तथा मल्लगुरू राजाश्रयाने तालमी व आखाडे चालवीत असत. आजही कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, बडोदा इ. अनेक शहरांत संस्थानकाळातील आखाडे व तालमी चालू आहेत.


बडोदे संस्थानात प्रो. राजरत्न माणिकराव यांनी १९१४ मध्ये जुम्मादादा आखाड्याचे रूपांतर व्यायाममंदिरात केले. ⇨ माणिकराव (१८७८–१९५४) यांनी व्यायाम व क्रीडाप्रकार अधिक नियमबद्ध व सूत्रबद्ध स्वरूपात लोकांसमोर आणून त्या प्रकारांचे प्रमाणीकरण केले. त्यांनी महाराष्ट्रात व गुजरातमध्ये गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. आखाडा, व्यायामशाळा, व्यायाममंदिर हा नुसताच नावातील क्रमश: बदल नाही. १९१० ते १९३० या कालखंडात केवळ शारीरिक व्यायामाला या नामांतरप्रक्रियेतून एक प्रकारे सामाजिक प्रतिष्ठा, बौद्धिकता आणि नैतिकता प्राप्त करून देण्यात आली. त्यामुळे नंतर सुशिक्षित तसेच पांढरपेशी मंडळी या व्यायामकार्याकडे वळली. या व्यायाममंदिरांतून आधुनिक शास्त्रीय पद्धतीचे व्यायाम, विदेशी व्यायाम सुरू झाले.  या क्षेत्रातील श्रेष्ठ योगदान प्रो. माणिकराव यांचे असल्याने त्यांना ‘व्यायामविद्येचे भीष्माचार्य’ म्हणतात. पंडित नेहरूंनी सुरत काँग्रेसच्या वेळी सेवादल सैनिकांना द्यावयाच्या आज्ञांबद्दल प्रो. माणिकरावांकडे आग्रह धरला. तोपर्यंत किंवा त्यानंतरही सैन्यातील अटेन्शन, राइट टर्न, अबाउट टर्न याच इंग्रजी भाषेतील आज्ञा रूढ होत्या. १९०५-०६च्या सुमारास प्रो. माणिकराव यांनी सावधान, विश्राम, दहिने-बाये-मुड यांसारख्या देशी भाषिक आज्ञा तयार करून त्या आज्ञांनुसार कवायत-संचलन (ड्रिल व परेड) करून दाखविले. सध्या त्या संस्थेचे विठ्ठल भवन, बडोदा असे नाव आहे.

ना. गोपाळकृष्ण गोखले, लो. टिळक, श्री. भाजेकर बंधू यांनी १९०६ मध्ये डेक्कन जिमखाना संस्थेची स्थापना केली. पहिले अध्यक्ष ना. गोखले होते. १९१० मध्ये संस्थेने कुस्तीच्या तसेच इतर अनेक भारती व विदेशी खेळांच्या स्पर्धा घेतल्या. डॉ. नोरेल टाटा यांनी या डेक्कन जिमखाना संस्थेतर्फे जागतिक ऑलिंपिक संघटनेशी संपर्क साधून, १९२० साली अँटवर्प येथे भारतीय संघ पाठविला. त्यांनी १९१५ मध्ये पहिली मॅराथॉन पुण्यात घेतली, तर १९१९ मध्ये स्त्रियांसाठी खेळांचे सामने घेतले. या संस्थेतर्फे १९२७ मध्ये पहिली शारीरिक शिक्षण परिषद घेण्यात आली.

श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्याला हिंद विजय आखाडा १९१८ साली स्थापन केला. त्यांच्याच प्रेरणेने व मदतीने व्यायाम-ज्ञानकोश हा अपूर्व कोशग्रंथ निर्माण झाला. या कोशनिर्मितीमध्ये दत्तात्रय चिंतामण तथा आबासाहेब मुजुमदार यांचे योगदान फार मोठे होते. श्रीमंत सयाजीराव गायकवाड-हीरक महोत्सवी खेळांचे सामने सर्व भारतभर गाजले होते (१९३६).

छोटुभाई व अंबुभाई पुराणी यांनी १९३६ मध्ये राजपिपला येथे गुजरात व्यायाम प्रसारक मंडळ स्थापन केले. विशेष म्हणजे क्रीडाशिक्षक तयार करण्यासाठी त्यांनी व्यायाम महाविद्यालयही सुरू केले.

अमरावती येथील श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य विख्यात आहे. श्री. अंबादासपंत, त्यांचे बंधू व मित्र खोपर्डेकर इ. अनेकांनी १९१४ मध्ये संस्थेची स्थापना केली. या मंडळाची व्यायामशाळा व क्रीडाकेंद्रे विस्तृत क्षेत्रात (सु. १०० एकर) असून, त्यात देशीविदेशी अंतर्गेही व मैदानी खेळांच्या तसेच विविध व्यायामप्रकारांच्या अद्ययावत सुविधा आहेत. या संस्थेत अनेक देशीविदेशी, व्यक्तिगत आणि सांघिक खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. १९३६ साली बर्लिन येथे व १९३९ साली स्टॉकहोम येथे या संस्थेमार्फत भारतीय क्रीडाप्रकारांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. संस्थेचा हा एक नित्याचाच उपक्रम आहे.

शिवरामपंत दामले, आठवले आदी सहकारी मंडळींनी १९२४ मध्ये पुणे येथे महाराष्ट्र व्यायाम प्रसारक मंडळ या व्यायामशाळेची स्थापना केली. क्रीडा व व्यायाम या क्षेत्रांत शिक्षक प्रशिक्षणाचे कार्य करणारी ही महाराष्ट्रातील महत्त्वाची संस्था आहे. व्यायामप्रकार व इतर खेळांच्या चांगल्या सुविधा या संस्थेत आहेत.

डॉ. आबासाहेब नातूंसारख्या क्रीडाक्षेत्रातील मान्यवर व्यक्तीने अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाच्या उभारणीतून (स्था. १९२७) भारतीय खेळांना स्पर्धात्मक रूप देण्याचे व त्यांचे विशेष नियम तयार करण्याचे मोठे काम केले.

याशिवाय हरी गणेश साने यांनी कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या इ. खेळांच्या सामन्यांचे नियम तसेच सामन्यांचे प्रशिक्षित पंच तयार करण्याचे कार्य राणाप्रताप संघांच्या माध्यमातून केले. तसेच समर्थ व्यायाम मंदिर, दादर यशवंत व्यायामशाळा, नाशिक अंबाबाई तालीम, मिरज क्रांतिवीर मंडळ, सातारा इ. संस्था व्यायाम व विविध खेळांच्या क्षेत्रांत महत्त्वाचे कार्य करीत आहेत. पेटिट जिम्नास्टिक्स इन्स्टिट्यूट, मुंबई ही पाश्चात्त्य व्यायामपद्धतीची संस्था १८५९ मध्ये पारशी मंडळींनी सुरू केली.

गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून स्त्रियांसाठीही स्वतंत्र व्यायामशाळा सुरू झाल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने स्त्रियांना उपयुक्त व सुलभ अशा व्यायामप्रकारांचे – उदा. शरीरसौष्ठवासाठीचे विशिष्ट व्यायाम, वायुसापेक्षी (एअरोबिक्स) प्रकार, योगासने इत्यादींचे-शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.

संदर्भ : १. कोठीवाले, द. ब. शारीरिक शिक्षणाचा विकास, भाग १, पुणे, १९६५.            २. मुजुमदार, आबासाहेब,  संपा. व्यायाम ज्ञानकोश, १० खंड, बडोदा, १९४९.

आपटे, अ. बा. आलेगावकर, प. म.