व्याध : (सिरिअस). रात्री आकाशात दिसणारा हा अत्यंत तेजस्वी तारा असून याला ऐतिहासिक महत्त्व आहे, बृहल्लुब्धक (कॅनिस-कुत्रा-मेजर) या पाश्चात्त्य तारकासमूहातील हा सर्वांत ठळक तारा (∝) असून त्याला ‘ग्रेटर डॉग’ असेही लौकिक नाव पडले आहे. सुप्रसिद्ध मृग नक्षत्रातील त्रिकांड बाणाची रेषा आग्नेयीकडे वाढविल्यास ती व्याधातून जाते तसेच व्याध, मृगातील कांक्षी [→ मृगशीर्ष] व पुनर्वसूमधील ⇨ प्रश्वा या तीन ठळक ताऱ्यांचा आकाशात एक मोठा समभुज त्रिकोण बनतो. साधारणपणे व्याध हा तारा जानेवारीपासून सायंकाळी व ऑगस्टपासून पहाटे पूर्वेस दिवसेंदिवस अधिकाधिक वर चांगला दिसू शकतो. याचे विषुवांश ६ ता. ४२·९ मि. व क्रांती–१६० ३९’ आहे [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति]. याची दृश्य ⇨ प्रत – १·४३ किंवा (१·६) व निरपेक्ष प्रत + १·४२ आहे. तो सूर्याच्या सत्तावीस पट तेजस्वी असून सूर्यापासून ८·७ ⇨ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. याचा व्यास सूर्याच्या व्यासाच्या दुप्पट म्हणजे २३ लक्ष किमी. आहे. हा निळसर पांढर्याय रंगाचा असून AIV या वर्णपटीय प्रकारात मोडतो [→ तारा]. याचे तापमान सु. १०,०००० के. असावे.
ईजिप्तचे लोक याला ‘प्रखर उष्णता’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून सोथिस म्हणत. याच्या पूर्वोदयाच्या प्रथमदिनाच्या पहाटेस ईजिप्तमध्ये नाईल नदीला पूर येई. त्यामुळे हा ताराच नदीला पूर आणतो, अशी समजूत होती. या ताऱ्याच्या पूर्वोदयावर ईजिप्शियन वर्ष सुरू होई. वेळेचे महिना हे लहान परिणाम आहे, परंतु या ताऱ्याच्या लागोपाठच्या पूर्वोदयांतील फरकावरून वर्ष हे ३६५ १/४ दिवसांचे असते, हे कळून आले.
व्याध हा तारा युग्मताऱ्यांच्या स्वरूपाचा आहे. याचा शोध ⇨ फ्रीड्रिख व्हिल्हेल्म बेसेल यांना १८४४ मध्ये लागला. कारण व्याधाचे निजगतीने विचलन (इतर ताऱ्यांच्या सापेक्ष हालचाल) हे सरळ नसून नागमोडी स्वरूपाचे असल्याचे त्यांना आढळले. त्यावरून व्याधावर दुसऱ्या एका ताऱ्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत असावा, असा निष्कर्ष निघाला. म्हणजेच व्याधाला सहचर असावा, असे सिद्ध झाले. १८५१ मध्ये पीटर्स यांनी वेध घेऊन या अदृश्य सहचराची कक्षा ठरविली. गणिताने काढलेल्या या कक्षेवर हा सहचर ऍल्व्हन क्लार्क यांनी ३१ जानेवारी १८६२ रोजी प्रत्यक्षच पाहिला. व्याधाच्या या अंधुक सहचराचे अस्तित्व वरुण ग्रहाप्रमाणे प्रत्यक्ष तो दिसण्यापूर्वी १८ वर्षे सिद्ध झाले होते, हे ज्योतिषगणिताचे वैशिष्ट्य होय. या सहचराची दृश्य प्रत + ८·५ व निजप्रत + ११·४ असून, त्याची गणना श्वेत लघुतम तार्यांत होते. त्याचा वर्णपटीय प्रकार WA5 व व्यास सु. ४०,००० किमी. असून, तो व्याधापासून सरासरी ७ सेकंद किंवा सु. २० ज्योतिषशास्त्रीय एकके एवढ्या अंतरावर आहे (सूर्य व पृथ्वी यांच्यामधील सरासरी अंतराला ज्योतिषशास्त्रीय एकक म्हणतात). व्याध व सहचर त्यांच्या गुरुत्वमध्याभोवती सु. ५० वर्षांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. १८९४ व १९४३ या वर्षी सहचर हा व्याधाशी अंतर्युतीत (द्रष्टा व व्याध यांच्यामध्ये) आला होता. त्याच्या कक्षेची विमध्यता ०·६ आहे. सहचराचे तापमान ८,००० ते १०,०००० के. असून घनता पाण्याच्या घनतेच्या हजारो पट आहे. याचे कारण त्याच्या घटक अणूंमधील इलेक्ट्रॉन अधिक तापमानामुळे निघून गेले असून, परिणामी घटक अणू फार जवळजवळ आले व त्याची घनता वाढली, असे शास्त्रज्ञ म्हणतात. याचे द्रव्यमान जवळजवळ सूर्याइतकेच आहे. व्याधाचे द्रव्यमान सहचराच्या ३·४७ पट आहे.
पहा : तारा नक्षत्र : बृहल्लुब्धक व लघुलुब्धक वरुण-२.
नेने, य. रा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..