व्याख्या : पदाचा किंवा वस्तूचा अर्थ सुस्पष्ट, नि:संदिग्ध, नेमका व अचूकपणे निश्चित करणारे विधान किंवा निवेदन म्हणजे व्याख्या होय. ज्या पदाची (वा वस्तूची) व्याख्या करावयाची, त्याला ‘व्याख्येय’ म्हणतात. व्याख्या ही सर्वसामान्यपणे जातिवाचक किंवा वर्गवाचक अशा सामान्य पदांची करतात. व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात पण अशा सर्व व्याख्या तर्कशास्त्राच्या निकषांना उतरतील असे नाही. उदा., ज्या वस्तूची व्याख्या करायची, त्या वस्तूकडे बोट दाखवून तिची व्याख्या केल्यासारखे दाखवणे. म्हणजे गायीकडे बोट दाखवून म्हणायचे, की ‘गाय म्हणजे हा प्राणी होय’. कधी व्याख्येय वस्तूचा निदर्शक असलेल्या शब्दास त्याच अर्थाचा दुसरा शब्द सांगितला जातो. उदा., मार्ग म्हणजे रस्ता.

तर्कशास्त्राच्या दृष्टीने वर म्हटल्याप्रमाणे व्याख्या ही वस्तूचा अर्थ सुस्पष्ट, नेमका व अचूकपणे व्यक्त करणारी असावी लागते. ती अतिव्याप्त (उदा., घोडा हा एक चतुष्पाद प्राणी आहे.) वा अव्याप्त (उदा., विवाहित स्त्री ही वेणी घालणारी ललना होय.) असून चालत नाही. व्याख्या अभावात्मक-म्हणजे व्याख्येय वस्तूत काय नसते, हे सांगणारी -असू नये तसेच तिच्यात आलंकारिक भाषेचा उपयोग नसावा. व्याख्येय वस्तूचे गुणधर्म तिच्या व्याख्येपासून तार्किक रीत्या निगमित करता आले पाहिजेत.

ॲरिस्टॉटलच्या मते व्याख्येत वस्तूचे फक्त सारगुण व्यक्त होतात. सारगुण म्हणजे ज्या गुणांशिवाय एखादी वस्तू आहे, तशी राहू शकत नाही किंवा जे गुण तिच्यातून काढून घेतल्यास तिचे स्वरूप बदलून जाते आणि तिचे अस्तित्व संपुष्टात येते, असे गुण होत. सारगुणांच्या समुच्चचयास त्या वस्तूचे ‘सार’ म्हणतात.

व्याख्येतून व्याख्येय वस्तूचे सारगुण स्पष्ट केल्याने व्याख्या वस्तुनिष्ठ व सार्वत्रिक मान्यता मिळण्याजोगी होते, हे सैद्धांतिक भूमिकेवरून मान्य केले तरी सारगुण म्हणजे नेमके कोणते व ते कसे ठरवावयाचे, ह्याविषयी मात्र भिन्न दृष्टिकोण आणि भूमिका असू शकतात. उदा. एखाद्या वनस्पतिशास्त्रज्ञाला एखाद्या विशिष्ट वनस्पतीचा जो गुण सारगुण वाटेल, तो एखाद्या आहारशास्त्रज्ञाला वा भोजनाचा आस्वाद महत्त्वाचा मानणार्याला सारगुण वाटेल, असे नाही. खरे म्हणजे ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रांत वेगवेगळ्या पदांच्या वा वस्तूंच्या व्याख्या करणे अत्यंत महत्त्वाचे असले, तरी व्याख्येशी निगडीत अशा तत्त्वज्ञानीय प्रश्नासंबंधी तत्त्वज्ञांमध्ये क्वचितच मतैक्य् झालेले दिसते.

व्याख्येविषयी तीन प्रमुख दृष्टिकोण मांडले जातात : (१) सारवादी (इसेन्शलिस्ट-‘ई’), (२) निर्धारणवादी (प्रिस्क्रिप्टिव्ह-‘पी’), (३) भाषिक (लिंग्विस्टिक-‘एल्’), ह्या भूमिका थोडक्यात अशा : (१) सारवादी-प्लेटो ज्यांना आकार (फॉर्म) म्हणतो, ते वस्तूंचे परिपूर्ण आदर्श असून ते अपरिवर्तनीय असतात. अशा आदर्शांचे वर्णन म्हणजेच व्याख्या होत. (२) निर्धारणवादी-व्याख्या म्हणजे आज्ञार्थक वाक्येय होत आणि त्यांचे कार्य हे भाषेच्या वापरासाठी मार्गदर्शक अशी वाक्येी तयार करण्याच्या नियमांचे परीक्षण करणे, हे असते. निर्धारणवाद्यांचे दोन वर्ग आहेत : नामवादी आणि आकारवादी. नामवाद्यांच्या मते, वस्तूंना नावे देण्याविषयी भाषेचे जे नियम असतात, त्यांच्या आधारे व्याख्यांचे उपपादन करता येते. आकारवाद्यांच्या मते प्रतीकांचे धागे संकुचित करण्याविषयीच्या भाषाभिव्यक्तीच्या नियमांना व्याख्या समजावे. (३) भाषिक – ह्या भूमिकेनुसार व्याख्या ही जी पदांची केलेली असते, त्या पदांचा लक्षित व अभिप्रेत अर्थ ती स्पष्ट करते.

भारतीय तर्कशास्त्रात व्याख्येस ‘लक्षणा’ म्हणतात तसेच व्याख्येय वस्तू कशी आहे व कशी नाही, ह्या दोहोंचा एकत्र विचार करून व्याख्या ठरविली जाते. उदा. गायीची व्याख्या करताना तिची प्रमुख व सारलक्षणे लक्षात घेतली जातात त्याचप्रमाणे गाय हा प्राणी घोडा, हत्ती, वाघ, सिंह यांसारख्या प्राण्यांहून कसा भिन्न आहे, हे व्यतिरेकाने सांगितले जाते.

व्याख्येच्या बाबतीत अन्य निर्देशनीय बाबी अशा : विशिष्ट व्यक्तींची वा वस्तूंची व्याख्या होऊ शकत नाही. रुची, स्पर्श, रंग, वास, ध्वनी ह्यांसारख्या प्राथमिक अनुभवांच्या व्याख्या होऊ शकत नाहीत. तीच गोष्ट अमूर्त गुणांची आणि भाववाचक नामांची. सारगुणांव्यतिरिक्त इतर कोणत्याही परिवर्तनीय व आकस्मिक गुणांचा जर व्याख्येत समावेश झाला, तर ती व्याख्या खर्या अर्थाने व्याख्या न राहता वर्णन बनते. व्याख्या करता करता आपण आपल्या नकळत वर्णनात शिरू शकतो त्यामुळे अनेकदा वर्णनासच व्याख्या समजले जाते.

जोशी, ग. ना.