व्यवसाय पूर्वानुमान : (बिझ्निस् फोरकास्टिंग). कोणत्याही व्यवसायातील भविष्यकालीन परिस्थितीचा अंदाज वर्तमानकाळात तत्संबंधी निर्णय घेण्याच्या व तरतूद करण्याच्या संदर्भात बांधणे, म्हणजे व्यवसाय पूर्वानुमान होय. भविष्यकालीन परिस्थितीबाबतचा अंदाज करून त्याबाबतचा योग्य तो निर्णय आधीच घेणे, हे आधुनिक व्यवसायपद्धतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय. अशा प्रकारे अंदाज करून निर्णय घेतल्याशिवाय कोणताही व्यवसाय कार्यक्षमतेने काम करू शकत नाही. आपल्या व्यवसायाचे भवितव्य जाणून घेण्याची व त्याविषयी वर्तमानकाळात काहीएक तरतूद करून ठेवण्याची गरज प्रत्येक व्यवसाय-संघटनेस भासत असते.
पूर्वीच्या काळातील व्यावसायिक भविष्याविषयी केवळ तर्क करीत असत परंतु आज व्यवस्थापनतज्ज्ञांनी व्यवसायाच्या भविष्याविषयी निश्चित स्वरूपाची अनुमाने करण्याचे काही मार्ग शोधून काढलेले आहेत. अनुभवजन्य अशा घटकांचे शास्त्रशुद्ध विश्लेषण आणि त्याच्या आधारे रचलेले अपेक्षित भविष्यानुमान हा एक मार्ग होय. प्रख्यात फ्रेंच व्यवस्थापनतज्ज्ञ आंरी फेयॉल (१८४१–१९२५) हा व्यावसायिक पूर्वानुमानाचा जनक मानला जातो. त्यानेच व्यावसायिक पूर्वानुमान हे यशस्वी व्यवस्थापनाचे सर्वांत महत्त्वाचे साधन आहे, असे सर्वप्रथम प्रतिपादिले. संपूर्ण व्यवसायाचे नियोजन वेगवेगळ्या योजनांच्या मालिकांच्या एकत्रीकरणाने केले जाते. या योजनांच्या मालिका म्हणजेच भविष्याविषयीचे अनुमान होय. आर्थिक आखणीसाठी महत्त्वाचे साधन म्हणजे व्यवसाय पूर्वानुमान. अंदाजपत्रक तयार करणे आणि व्यवसाय-पूर्वानुमानाची आखणी करणे या दोन्ही गोष्टींसाठी ‘भविष्यकाळ’ ही एकमेव समान बाब आहे. प्रसिद्ध अमेरिकन व्यवस्थापनशास्त्रज्ञ लुईन ॲलन यांच्या मते ज्ञात तथ्यांच्या द्वारे काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे भविष्यकालीन घटनांचे अनुमान करण्यासाठी पद्धतशीरपणे केलेले प्रयत्न म्हणजेच व्यवसाय पूर्वानुमान होय. पूर्वानुमान करताना सध्या उपलब्ध असलेली माहिती व आकडेवारी यांचा उपयोग करून त्याआधारे भविष्यकाळात कोणती परिस्थिती निर्माण होऊ शकेल याबाबतचा अंदाज वर्तवला जातो.
आधुनिक व्यवसायात कोट्यवधी रुपये भांडवल गुंतवून मागणीपूर्व उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे व्यवसायात नफा-नुकसानीचा धोकाही मोठ्या प्रमाणावर संभवतो. म्हणून भविष्यकाळासंबंधीचे अचूक निर्णय योग्य त्या शास्त्रीय पायावर घेण्याच्या दृष्टीने पूर्वानुमानाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
पूर्वानुमानाचा प्रामुख्याने पुढील दिशांनी उपयोग होतो : (अ) व्यवस्थापकीय निर्णय घेणे : निर्णय घेण्याची क्रिया पूर्वानुमानाशी निगडित आहे. भविष्यकाळात व्यवसायामधील परिस्थिती कशी राहील व कोणत्या घटना घडतील, याचे पूर्वानुमान करून व्यवस्थापक निर्णय घेऊ शकतो. (आ) नियोजनाचा आधार : व्यावसायिक पूर्वानुमान हा नियोजनाचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. भविष्यकालीन संभाव्य घटनांचा अंदाज घेऊन केलेले नियोजन व्यवसायाच्या दृष्टिने फायद्याचे ठरते. (इ) अंदाजपत्रकाचा आधार : अंदाजपत्रक हे व्यवसाय-संघटनेच्या भविष्यकालीन गरजांचे क्रमबद्ध आधारावर केलेले अनुमान असते. व्यावसायिक पूर्वानुमानाचा अवलंब केल्याशिवाय अंदाजपत्रक तयार केले जाऊ शकत नाही. (ई) नियंत्रणव्यवस्थेची परिणामकारकता : व्यवसाय पूर्वानुमानाचा अवलंब केल्यामुळे जेथे नियंत्रणाची गरज आहे, अशा संघटनेतील जागांची माहिती व्यवस्थापकाला मिळते व या संदर्भात योग्य ती उपाययोजना तो करू शकतो. (इ) ऐक्य व समन्वय ह्यांस प्रोत्साहन : व्यवसाय पूर्वानुमानाच्या प्रक्रियेमुळे विविध स्तरांवर काम करणारे अनेक अधिकारी एकत्र येतात व त्यांमध्ये ऐक्याची भावना वाढीला लागते. याशिवाय व्यवसायाच्या स्पर्धात्मक क्षमतेत वाढ होते. अर्थपुरवठ्यासंबंधी निर्णय घेणे, मिळकतीचे अनुमान करणे, विक्रीचे पूर्वानुमान करणे असे अनेक फायदे त्यामुळे होऊ शकतात.
व्यवसाय पूर्वानुमान ही एक व्यवस्थापकीय प्रक्रिया मानली जाते. या प्रक्रियेतील विविध टप्पे पुढीलप्रमाणे असतात : (१) प्रारंभिक तयारी करणे (२) व्यवसायाच्या भविष्यकाळासंबंधी अंदाज करणे (३) प्रत्यक्ष परिणाम व अपेक्षित परिणाम यांची तुलना करणे व (४) पूर्वानुमानप्रक्रियेत सुधारणा करणे.
पूर्वानुमानाच्या पद्धती : व्यवसायासंबंधी पूर्वानुमान करण्याच्या अनेक पद्धती आहेत : (अ) प्रत्यक्ष पद्धत : प्रत्यक्ष पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रथम प्रत्येक उपविभागामार्फत त्याच्याशी संबंधित अशा सर्व बाबी विचारात घेऊन भविष्यात परिस्थिती कशी राहील, याबद्दल अनुमान मांडले जाते. विविध उपविभागांमार्फत केलेल्या अनुमानांचा एकत्रितपणे सारांश रूपाने विचार केल्यास व्यवसायाशी संबंधित असलेल्या सर्व संभाव्य घटनांचे परिपूर्ण चित्र तयार होते. (आ) अप्रत्यक्ष पद्धत : ही पद्धत प्रत्यक्ष पद्धतीच्या अगदी उलट आहे. ह्या पद्धतीत प्रथम संपूर्ण व्यवसायाचा विचार करून भविष्यकालीन स्थिती काय राहील, याबद्दल अनुमान केले जाते व नंतर त्यानुसार उपविभागांसाठी अनुमान बांधले जाते. (इ) ऐतिहासिक पद्धत : विशिष्ट व्यवसायात भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचे काळजीपूर्वक विश्लेषण करून ह्या घटनांचे क्रमबद्ध स्वरूप अभ्यासल्यास भविष्यकाळातील घटनांची निश्चितपणे कल्पना येते. या पद्धतीने पूर्वानुमान करणाऱ्या व्यक्ती अनुभवी व तज्ज्ञ असल्यास त्यांचे बरेच निष्कर्ष विश्वसनीय असू शकतात. (ई) निगमन पद्धत : या पद्धतीमध्ये विद्यमान परिस्थितीतील विविध घटकांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले जाते. त्यांपैकी कोणत्या वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या घटकांमुळे भविष्यावर परिणाम होणार आहेत, हे ठरवून नंतर कारण – परिणाम ह्या युक्तिवादाच्या साहाय्याने भविष्यकाळातील घटनांबाबत निष्कर्ष काढले जातात. (उ) संयुक्तमत पद्धती : यात व्यावसायिक पूर्वानुमान करण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीवर न सोपविता ती काही तज्ज्ञ व्यक्तींवर सोपविली जाते. (ऊ) सहानुबंध पद्धती : काही क्षेत्रे एकमेकांशी निगडित व एकमेकांवर अवलंबून असतात. एका क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा दुसऱ्या क्षेत्रावर परिणाम होत असतो. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात किंवा विभागात बदल झाल्याने त्याचे इतर क्षेत्रांवर किंवा विभागांवर काय परिणाम संभवतात, ह्याचे पूर्वानुमान काढता येते.
पूर्वानुमानाचे महत्त्व समजावून घेत असतानाच त्याच्या मर्यादांचेही भान ठेवणे गरजेचे आहे. नियतीचा लहरीपणा, गृहीत परिस्थितीमध्ये घडून येणारे अनपेक्षित / आकस्मिक बदल, पूर्वानुमानकर्त्याची मर्यादित क्षमता या महत्त्वाच्या मर्यादा व्यवसाय पूर्वानुमानामध्ये असतात.
चौधरी, जयवंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..