व्यवसाय : (बिझ्निस्). वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो. व्यवसाय या संज्ञेमध्ये संपत्ती निर्माण करण्याच्या तसेच संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. मात्र केवळ संपत्तीची निर्मिती वा संपादन हे व्यवसायाचे एकमेव उद्दिष्ट नव्हे, तर सामाजिक उपयोगितेच्या दृष्टीने मानवी गरजांची पूर्तता करणे, हेही व्यापक उद्दिष्ट असते. व्यवसाय या सुसंघटित प्रक्रियेचे दोन पक्ष असतात व त्या दोहोंचे परस्परहित साधणे आवश्यक असते. व्यवसायामध्ये एकमेकांच्या फायद्यासाठी वस्तूंची किंवा सेवांची देवाणघेवाण केली जाते. व्यवसाय ही सातत्याने व अखंडपणे चालणारी व पुनरावृत्त होणारी क्रिया असल्याने एखाद्या व्यक्तीने महिन्याकाठी, वर्षाकाठी किंवा संपूर्ण आयुष्यात एखाद-दुसऱ्या वेळी ही क्रिया केल्यास तिला व्यवसाय असे म्हणता येणार नाही. सतत वाढत जाणाऱ्या असंख्य मानवी गरजा भागविण्याच्या उद्देशाने उत्पादनाचे घटक संघटित करून व्यवसायामार्फत वस्तूंची वा सेवांची निर्मिती केली जाते. एका व्यक्तीने किंवा संघटनेने नफा मिळावा यासाठी आर्थिक क्रिया केली की, त्यास व्यवसायाचे स्वरूप प्राप्त होते.
व्यवसाय ही संस्था केव्हा उगम पावली, हे जरी निश्चितपणे सांगता येत नसले, तरी शेकडो वर्षांपासून अनेक व्यवसाय चालू होते. सोळाव्या शतकातील यूरोपमध्ये व्यापारी क्रांती, अठराव्या शतकातील विविध तांत्रिक शोध, एकोणिसाव्या शतकातील औद्योगिक क्रांती व विसाव्या शतकातील यांत्रिकीकरण यांमुळे व्यवसायाची व्याप्ती व विस्तार फार मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्याचे दिसून येते. सुरुवातीच्या काळात व्यवसाय व्यक्तिगत पातळीवर चालविला जात असे परंतु जसजसे व्यवसायाचे विस्तारमान वाढू लागले, तसतसे ⇨ भागीदारी संस्था ⇨ व्यवसाय निगम, सहकारी संस्था, सार्वजनिक उपक्रम यांच्या माध्यमांतून व्यवसाय करण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. आधुनिक काळात व्यवसायाला सामाजिक-आर्थिक संस्था असे व्यापाक स्वरूप प्राप्त झाले आहे. व्यवसाय हे मानवी व सामाजिक कल्याणाचे एक साधन मानले जाते. कोणतीही व्यवसाय करणारी संघटना सातत्याने सभोवतालच्या परिस्थितीवर परिणाम करणारी व सभोवतालच्या परिस्थितीने प्रभावित होणारी व्यवस्था असते. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सभोवतालच्या सतत बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते.
व्यवसाय म्हणून करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांचे विनिमय व परस्परलाभ असे दुहेरी उद्दिष्ट असते. केवळ पैसा मिळविणे हे व्यवसायाचे उद्दिष्ट नसून उपयोगासाठी उत्पादन करणे, हेच त्याचे खरे कार्य असते. वस्तूंचे अगर सेवांचे उत्पादन करीत असताना त्यांचा दर्जा उच्च राहील, किंमत वाजवी राहील आणि उपयोगितेमुळे ग्राहकांची व पर्यायाने समाजाची गरज भागेल यासाठी प्रत्येक व्यवसायामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. व्यवसायाची प्रगती आणि देशाचा आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास या गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात.
व्यवसाय ही संकल्पना व्यापक स्वरूपाची असून तिच्यात नैसर्गिक सामग्रीवर प्रक्रिया करून वस्तू निर्माण करणे, मनुष्यबळाच्या व यंत्रांच्या साहाय्याने वस्तूंचे योग्य स्वरूपात रूपांतर करणे, योग्य ठिकाणी वस्तू वाहून नेणे, वस्तूंच्या साठवणीची व्यवस्था करणे व ग्राहकांना त्या उपलब्ध करून देणे अशा सर्व क्रिया समाविष्ट होतात. व्यवसायात सर्व प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन व सेवांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांचा व वाणिज्यविषयक प्रक्रियांचा अंतर्भाव होतो. विशिष्ट वस्तू किंवा सेवा निर्माण करण्याची प्रक्रिया ज्या ठिकाणी चालते, त्या स्थानाला ‘औद्योगिक संस्था’ असे म्हणतात.
उत्पादक उद्योगधंदे, जननिक (जिनेटिक) उद्योगधंदे, वस्तूंचे उत्पादन करणारे निर्मिती-उद्योगधंदे (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री) व बांधकाम (कन्स्ट्रक्शन) उद्योगधंदे असे उद्योगधंद्यांचे सर्वसाधारण वर्गीकरण केले जाते. [→ उद्योग] या विविध उद्योगांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवा उपभोक्त्यापर्यंत पोहोचविण्यासाठी वाणिज्यविषयक प्रक्रियांची आवश्यकता असते. ⇨ वाणिज्य (कॉमर्स) या संज्ञेत व्यापार (म्हणजेच वस्तूंची खरेदी-विक्री) व व्यापारास पूरक असणाऱ्या सर्व सेवांचा समावेश होतो [→ व्यापार व्यापार, किरकोळ व घाऊक]. व्यवसाय ही संकल्पना व्यापक असून व्यापार हा तिचा एक भाग आहे.
एखादा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी ग्राहकांची गरज अचूकपणे ओळखून त्यानुसार योग्य वस्तू व सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी व्यवसायातील भविष्यकालीन संभाव्य बदल लक्षात घेऊन त्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागते. कोणत्याही व्यवसायाची कार्यक्षमता ही उद्दिष्टांची निश्चिती, अनुरूप संघटनेची निवड, भांडवल व इतर उत्पादक घटकांचा परिपूर्ण वापर, व्यवसायस्थाननिश्चिती, व्यवस्थापन व कामगार यांच्यातील परस्परसंबंध, व्यावसायिकाची संशोधनवृत्ती यांवर अवलंबून असते. व्यवसाय जर लहान असेल, तर व्यवसायाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी व्यवसायप्रमुखालाच सांभाळावी लागते. मोठ्या व्यवसायात ⇨ व्यवसाय व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग असतो. व्यवसायात यश मिळविण्याच्या दृष्टीने व्यावसायिकाजवळ दूरदृष्टी, अचूक निर्णयक्षमता, व्यावसायिक निष्ठा व नीतिमत्ता, संशोधनात्मक व विश्लेषणात्मक वृत्ती, खास व्यवसायकौशल्य इ. गुणांची आवश्यकता असते.
पहा : संयुक्त भांडवल कंपनी.
चौधरी, जयवंत