व्यक्तिमानसशास्त्र : (इंडिव्हिड्युअल सायकॉलॉजी). ऑस्ट्रियन मानसोपचारतज्ञ ⇨ ॲल्फ्रेड ॲड्लर (१८७०–१९३७) यांनी प्रतिपादिलेली मानवी मनोव्यापारांविषयीची तत्त्वप्रणाली आणि तदानुषंगाने त्यांनी सुचविलेली मानसोपचारपद्धती ही आधुनिक पाश्चात्त्य मानसशास्त्रात ‘व्यक्तिविषयक मानसशास्त्र’ म्हणून सुप्रसिद्ध आहे. तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे :
⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) यांनी इ. स. १९०० साली आपला स्वप्नांचा अन्वयार्थ (इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स) हा ग्रंथ प्रसिद्ध केला आणि पाश्चात्त्य मानसशास्त्राच्या क्षेत्रात ⇨ मनोविश्लेषण हे संशोधनाचे नवे दालन उघडले. तत्पूर्वी पाश्चात्त्य मानसशास्त्र हे ‘मन = जाणीव’ या समीकरणात अडकून पडले होते. फ्रॉइड यांनी आपल्या अभिनव मनोविश्लेषणाद्वारे ⇨ अबोध मनाची संकल्पना विशद करून एकूणच पाश्चात्त्य मानसशास्त्राचे अध्ययनक्षेत्र विस्तृत केले.
फ्रॉइडच्या प्रतिपादनानुसार मनोरुग्णांचे अपसामान्य वर्तन हे अंतऱ्यामीच्या प्रेरणा-द्वंद्वांमुळे घडून येते आणि या अंतर्द्वंद्वाच्या मुळाशी व्यक्तीची बेबंद कामप्रेरणा असते. कामप्रेरणेच्या तृप्तीआड येणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक अडथळ्यांमुळे व्यक्तीच्या वाट्याला असह्य वैफल्य येते. [→ वैफल्यभावना]. हे वैफल्य मनोव्याधींना कारणीभूत होते. या फ्रॉइडप्रणीत प्रतिपादनामुळे पाश्चात्त्य मानसशास्त्रात अभूतपूर्व क्रांती घडून आली.
ॲड्लर हे फ्रॉइडच्या निमंत्रणानुसार त्यांच्या ‘मनोविश्लेषण’-वर्तुळात सहभागी झाले परंतु काही वर्षांनंतर ते त्या वर्तुळातून बाहेर पडले. कारण ‘मानवी वर्तनात आणि मनोव्यापारांत कामप्रेरणा हीच एक बलवत्तर, सार्वभौम प्रेरणा असते आणि ती व्यक्तीच्या बाल्यावस्थेतही जारी असते’ हा फ्राइड यांचा दावा ॲड्लर यांना अतिशयोक्त, अवास्तव, असमर्थनीय असल्याचे जाणवले. अतएव फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाचा अव्हेर करून, ॲड्लर यांनी आपले नवे, स्वतंत्र ‘व्यक्तिविषयक मानसशास्त्र’ विकसित केले.
ॲड्लर यांची प्रणाली : ॲड्लर यांना संशोधनात असे आढळून आले की, बाल्यावस्थेत प्रत्येक मनुष्य असहाय, दुर्बल, परावलंबी असतो. या दुर्बलतेवर, न्यूनत्वाच्या भावनेवर मात करण्यासाठी प्रत्येक मनुष्य शक्ती संपादन करण्याची धडपड करीत असतो. या धडपडीला मानसशास्त्राच्या परिभाषेत ‘त्रुटिपूर्ती’ (कॉम्पेन्सेशन) असे म्हणतात. स्वत:च्या ‘ऋण’ स्थितीकडून ‘धन’ स्थितीकडे जाण्याचा हा प्रयास असतो. जणू ‘पूर्ण’ मानव होण्याचा हा प्रयत्न असतो.
बाल्यावस्थेतील या धडपडीला जर व्यक्तीचे शारीरिक व्यंग, मातापित्यांकडून कळतनकळत होणारी हेळसांड, सामाजिक परिसराकडून होणारी अवहेलना यांसारख्या अप्रिय अनुभवांची वारंवार थप्पड बसत राहिली, तर बालकाच्या मनात संभ्रम, भीती, न्यूनत्वाचा गंड बळावत जातो. तो मनोगंड जर उचित उपायांनी वेळीच दूर झाला नाही अथवा काबूत राहिला नाही, तर वाढत्या वयासोबत माणसाच्या वर्तनात वेडाचार वाढत जातो.
वेडाचाराच्या मुळाशी अंतर्विग्रह असतो, हे फ्रॉइडचे म्हणणे ऍड्लर यांना मान्य होते परंतु हा अंतर्विग्रह व्यक्तीची कामप्रेरणा व परिसरीय दडपणे या दोहोंमधला नसून तो मुख्यत: व्यक्तिगत सामर्थ्यप्राप्तीची प्रेरणा आणि व्यंग-वैफल्य-जनित भयभावना या दोहोंमध्ये असतो, असे ऍड्लर यांचे म्हणणे होते.
ॲड्लर यांच्या प्रणालीनुसार कुटुंबातील प्रेमाला वंचित झालेली मुले साहजिकच न्यूनत्वाच्या भावनेने पछाडली जातात. तथापि अतिशय लाडावलेली मुलेदेखील अनुभववशात मनोगंडास बळी पडतात. कारण अशी लाडावलेली मुले जेव्हा बाहेरील जगात वावरू लागतात, तेव्हा या बाह्य जगात आपली कोणी दखल घेत नाही, असा कडवट अनुभव त्यांना येतो. त्या अनुभवांना तोंड देण्याची त्यांची मानसिक तयारीच झालेली नसते. अतएव ती मुले पुढील आयुष्यात बिकट प्रसंगांत मनोव्याधींच्या आहारी जातात.
एकाच कुटुंबातील भावंडांमध्ये अपरिहार्य ताणतणाव निर्माण होतात. धाकटी भावंडे वडील भावंडांशी स्वत:ची सारखी तुलना करतात आणि आपल्या छोटेपणाबद्दल व तदानुषंगिक कमकुवतपणाबद्दल खंत करीत असतात. वडील भावंड जर विशेष कर्तृत्ववान असेल, तर धाकटी भावंडे आपल्या अत्यल्प कर्तृत्वाच्या जाणिवेने वैफल्यग्रस्त होतात ⇨ न्यूनगंडाच्या आहारी जातात. थोरामोठ्या व्यक्तींच्या सामान्य मुलांतही वडिलांच्या थोरपणाचे फार दडपण आल्याकारणाने वर्तनव्याधी बळावते.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीत्व हे दुबळेपणाशी जोडले जाते. त्यामुळे स्त्रियांमध्ये प्रभुत्वप्राप्तीची प्रवृत्ती विशेष प्रमाणात प्रकट होते व वाढते. तिला ऍड्लर यांनी ‘पुरुषी वर्चस्वाला विरोध’ असे नाव दिले. या अपप्रवृत्तीमुळे विरुद्ध लिंगी व्यक्तीवर अनावश्यक वर्चस्व गाजविण्याची वृत्ती बळावत जाते. हा उघडपणेच त्रुटिपूर्तीचा विपर्यस्त परिपाक होय. साधारणपणे वयाच्या पाचव्या वर्षापासून बालकाच्या वर्तनाला काहीएक विशिष्ट वळण लागते काहीएक जीवनशैली प्राप्त होते काहीएक जीवनोद्दिष्ट निश्चित होत जाते. व्यक्तीच्या जीवनशैली प्राप्त होते काहीएक जीवनोद्दिष्ट निश्चित होत जाते. व्यक्तीच्या जीवनशैलीनुसार (१) सामाजिक संबंध (२) कौटुंबिक नाती आणि (३) उपजीविकेप्रीत्यर्थ धरलेला व्यवसाय या तीन क्षेत्रांतील तिचे कार्यकर्तृत्व साकारते. अर्थात या तीनही क्षेत्रांत समुचित समायोजन साधणे, ही अतिशय महत्त्वाची बाब असते. त्यासाठी व्यक्तीचे यथोचित सामाजीकरण होणे जरूरीचे असते. तसे जर घडले नाही, तर व्यक्तीच्या वर्तनात विकृती उद्भवतात.
मज्जाविकृत (न्युरॉटिक) व्यक्ती ही अनेकदा आपली न्यूनत्वाची भावना जिंकण्यासाठी अवास्तव, असाध्य, कल्पनारम्य ध्येयांमागे पळत राहते. ती वास्तवतेचे उचित भान राखत नाही. निसर्गदत्त मानसिक संरक्षण-यंत्रणेचा विपरीतरीत्या वापर करते. आपल्या कार्यक्षेत्रातील अपयशाचे कारण म्हणून आपल्या न्यूनत्वाची ‘सबब’ पुढे करते. कोणतीही जबाबदारी स्वीकारावयास आढेवेढे घेते. कधीकधी इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ती आजाराचे सोंग आणते. तसेच इतरांकडून सेवा करून घ्यावी, म्हणून ती व्यक्ती आपल्या विकृतींचे अतिशयोक्त प्रदर्शन करते.
याउलट काही मनस्वी माणसे आपल्या पिंडगत वैगुण्यांवर आणि परिसरीय अडथळ्यांवर मात करून लक्षणीय आत्मोन्नती साधतात. उदा. अमेरिकेचे बत्तीसावे राष्ट्राध्यक्ष ⇨फ्रँक्लिन रूझवेल्ट हे पोलिओग्रस्त होते. तसेच सुप्रसिद्ध जर्मन संगीतकार ⇨ लुटव्हिख व्हान बेथोव्हन हे कर्णबधिर होते. या दोघांनीही पर्वतप्राय अडथळ्यांस न जुमानता दीर्घ प्रयत्न करून अत्युच्च कर्तृत्व करून दाखविले. अलीकडचे उदाहरण स्टीफन हॉकिंग्टन या शास्त्रज्ञाचे. अशा प्रकारे एकीकडे आत्यंतिक वेडाचार, तर दुसरीकडे अलौकिक कर्तृत्व या दोन टोकांदरम्यानच्या मधल्या विस्तृत अवकाशात जनसामान्य आपले कमीअधिक यशस्वी जिणे जगत असतात.
ॲड्लर यांचे उपचार-तंत्र : मनोव्याधिग्रस्त रोग्याला बरे करण्यासाठी ॲड्लर यांनी सुचविलेली उपचारपद्धती साधी, सरळ व व्यवहारसुलभ आहे. तिच्यात फ्रॉइडप्रणीत अनावश्यक मनोविश्लेषणास स्थान नाही. ॲड्लरच्या शिकवणुकीनुसार सर्वप्रथम उपचारकाने मनोरुग्णाच्या एकूण स्थितीचे यथार्थ ज्ञान मिळवावे. त्यासाठी रोग्याच्या विचित्र सवयींचे, त्याच्या विपर्यस्त अचार-विचारांचे नीट निरीक्षण करावे. रोग्याशी मित्रत्वाच्या भावनेने व मोकळ्या मनाने संभाषण करावे. त्याचा विश्वास संपादन करावा. त्याचा आत्मविश्वास हळुहळू वाढवावा. आपले नेमके चुकते कुठे याची त्याला यथार्थ जाणीव करून द्यावी. शारीरिक व्यंग, कौटुंबिक संघर्ष, व्यावसायिक अपयश यांसारख्या गोष्टी सगळ्यांच्या वाट्याला येतात. आपण त्यांचा मोठा बाऊ करू नये आणि इतरांस त्रास होईल अशा रीतीने वागू नये. जी ध्येय-धोरणे अप्राप्य, अव्यवहार्य असतात, त्यांच्या नादी लागू नये. त्याऐवजी सोप्या, सुलभ, वास्तववादी कामकाजात मन गुंतवावे. अशा आशयाची सल्लामसलत रोग्याला द्यावी. त्याला आपला वर्तनक्रम बदलण्यास आणि नवा जीवनक्रम अंगीकारण्यास उत्तेजन द्यावे व मार्गदर्शन करावे.
ॲड्लर यांच्या मते पुढील काही त्रासदायक गोष्टींची शक्यता लक्षात ठेवून तदनुसार आपल्या उपचार-काऱ्यात योग्य ती काळजी घ्यावी : (१) रोग्याला आपल्या व्याधीचे खरे कारण माहीत नसते, त्यामुळे आपल्या आजाराविषयी बोलताना तो खोटे वा चुकीचे बोलण्याची शक्यता असते. (२) कधीकधी तो ‘बतावणी’ करण्याची शक्यता असते. उपचारकाच्या प्रेमात पडल्याचा अथवा त्याच्या आज्ञेत राहण्याचा तो बहाणा करतो. (३) नको त्या कौंटुबिक जबाबदाऱ्या टाळण्यासाठी रोगी आपल्या विकृतीस अधिकच बिलगून राहण्याची शक्यता असते. (४) रुग्णाला आपली विकृत लक्षणे आपल्या फायद्याची असल्याची प्रच्छन्न जाणीव असते. या कारणास्तव तो उपचारकाच्या उपचारांना ‘प्रतिरोध’ करण्याची शक्यता असते. (५) कधीकधी मनोरुग्ण उपचारकावर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असते. (६) उपचारक स्वत: रुग्णाच्या भावनिक जीवनात गुंतत जाण्याची शक्यता असते.
या विविध शक्यता डोळ्यांसमोर ठेवून आपल्या उपचारपद्धती दक्षतेने हाताळण्याची ऍड्लर यांची सूचना आहे.
एकंदरीत ॲड्लर यांची तत्त्वप्रणाली आणि उपचारपद्धती या विवेकाधिष्ठित आणि व्यवहारसुलभ आहेत. बालसंगोपनकाऱ्यात आणि शिक्षणक्षेत्रात या दोन्ही गोष्टी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. तथापि ही प्रणाली आणि हे तंत्र सर्वच मनोरुग्णांच्या बाबतीत उपयोगी पडते, असे नव्हे. अनेक मानवी मनोव्याधी या क्लिष्टतर, चमत्कारिक, दुराराध्य असतात हे सर्वज्ञात सत्य आहे.
संदर्भ : 1. Ansbacher, H. L. Ansbacher, R. R. Eds., Superiority and social Interest : A Collection of Later Writings, New York, 1973. 2. Ansbacher, H. L. Ansbacher, R. R. The Individual Psychology of Alfred Adler : A Systematic Presentation in
Selections from His Writings, Great Britain, 1958.
कुलकर्णी, अ. र.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..