वैज्ञानिक पद्धति : प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात विज्ञान आणि विज्ञानेतर ज्ञानशाखा असा मूलभूत भेद करण्यात आला नव्हता. तसेच निश्चितता किंवा तार्किक अनिवार्यता आणि सार्वत्रिकता ही ज्ञानाची दोन व्यवच्छेदक लक्षणे मानली जात होती. परिमाणत: एकूण ज्ञानप्रक्रियेत निगामी तर्कशास्त्र केंद्रस्थानी होते. एक स्वतंत्र ज्ञानशाखा म्हणून विज्ञानाची खऱ्या अर्थाने सोळाव्या शतकात युरोपमध्ये सुरूवात झाली. अनुभवाश्रित विज्ञानाचा उदय आणि प्रगती हे आधुनिक कालखंडाचे खास वैशिष्ट्य ठरले. विज्ञानाचे वेगळेपण आणि श्रेष्ठत्व वैज्ञानिक पद्धतीत आहे, असे मानून वैज्ञानिक पद्धतीच्या स्वरूपाचा विचार सुरू झाला. ज्या नियमांच्या पालनामुळे विज्ञान वास्तवाचे यथार्थज्ञान करून देते, असे तार्किकतेचे नियम मांडणाऱ्या पद्धतिशास्त्राचा विचार विज्ञानाचे तत्त्वज्ञान करते.

वैज्ञानिक पद्धतीचा विचार करणाऱ्या मध्ये मुख्यत: दोन गट पडतात : (१) कोपर्निकस, गॅलिलीओ, केप्लर, न्यूटन, आइन्स्टाइन इ. वैज्ञानिक आणि (२) देकार्त, फ्रान्सिस बेकन, जॉन स्ट्यूअर्ट मिल, कार्ल पॉपर, टॉमस कुन्ह इ. तत्त्ववेत्ते, अँरिस्टॉटलची संविधानिक निगामी अनुमानपद्धती नवीन शोध लावण्यासाठी उपयुक्त नाही, यावर सर्वांचे एकमत आहे. परंतु सृष्टिनियमांचा शोध लावण्यासाठी समर्थ अशा वैज्ञानिक पद्धतीच्या स्वरूपाविषयी त्यांनी वेगवेगळी मते मांडली. ⇨रने देकार्तने (१५९६–१६५०) संशयपद्धतीचा वापर करून अशा मूलतत्त्वांचा शोध घेतला, की जी संशयातील, स्पष्ट आणि नि:संदिग्ध असतील आणि ज्यांच्यापासून सर्व मानवी ज्ञान निगमित करता येईल. देकार्ताच्या ज्ञानवृक्षाचे मूळ म्हणजे ‘तत्त्वमीमांसा’, त्याचा बुंधा पदार्थविज्ञान आणि वैद्यकशास्त्र, यांत्रिकी आणि नीतिशास्त्र या त्याच्या शाखा. यावरून देकार्तने अनुभवश्रित विज्ञान – संकल्पनेला न्याय दिला नाही, असे म्हणावे लागते. देकार्तचा समकालीन ⇨फ्रान्सिस बेकन (१५६१–१६२६) याने मात्र निसर्गाचे रहस्य शोधून काढण्यासाठी विगामी पद्धतीचा वापर अनिवार्य आहे हे ओळखले आणि नोव्हम ऑरगॅनम (नवीनीकरण, म. शी.) हा ग्रंथ १६२० साली लिहिला. म्हणूनच हान्स रायशेनबाख त्याला ‘विगमनाचा प्रेषित’ म्हणतो. ⇨गॅलिली गॅलिलीओ (१५६१–१६४२), ⇨सर आयझॅक न्यूटन (१६४२–१७२७) यांसारख्या वैज्ञानिकांनी निरीक्षण-प्रयोग हे वैज्ञानिक पद्धतीचे व्यवच्छेदक स्वरूप मानले पण गणिती कलनाचा वापर महत्त्वाचा व अटळ आहे, असे ठामपणे प्रतिपादले. ‘निसर्गाचा ग्रंथ गणिती भाषेत लिहिला आहे,’ हे गॅलिलीओचे वचन प्रसिद्ध आहे.

पुढील तीन शतकांत (सतरावे-एकोणिसावे शतक) विज्ञान व तंत्रज्ञानाची झपाट्याने वाढ झाली. निसर्गाकडे बघण्याचा अँरिस्टॉटलचा प्रयोजनवादी दृष्टिकोन मागे पडून त्याची जागा यांत्रिक जडवादाने घेतली. ⇨ऑग्यूस्त काँतचा प्रत्यक्षार्थवाद किंवा विज्ञानवाद आणि देकार्त-न्यूटन यांच्यापासून चालत आलेला भौतिक विश्वाविषयीचा यांत्रिक जडवाद यांचा या मतात समन्वय आहे. [ → जडवाद]. या मताला वैज्ञानिक वास्तववाद म्हणता येईल. मानवाची ज्ञानेंद्रिये आणि आकलनशक्ती यांची रचना, क्षमता आणि आकारिक ढाचा याने वास्तवाचे ज्ञान निर्धारित होते. या अनुभवपूर्व घटकांकडे वास्तववाद दुर्लक्ष करतो. या घटकांची नोंद घेतली पाहिजे असे प्रतिपादन करणारा नव-कांटवाद हे दुसरे मत [→ नव-कांट मत]. आणि बेकनपासून चालत आलेला लॉक, बर्कली, ह्यूम यांच्या ⇨अनुभववादाशी सुसंगत असा, ⇨जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–७३) आणि ⇨एस्ट् माख (१८३८–१९१६) यांनी प्रतिपादन केलेला विगमनवाद हे तिसरे मत. [→तर्कशास्त्र, विगामी]. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी वैज्ञानिक पद्धतीसंबंधी हे तीन प्रमुख विचारप्रवाह होते.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला आइन्स्टाइनप्रणीत ⇨सापेक्षता सिद्धांत आणि ⇨माक्स कार्ल एंस्ट लूटव्हिख प्लांकप्रणीत ⇨पुंज सिद्धांत हे दोन क्रांतिकारी सिद्धांत प्रस्थापित झाल्यावर पुन्हा एकदा वैज्ञानिक पद्धती, उपपत्ती आणि स्पष्टीकरण यांच्याविषयी नव्याने विचार सुरू झाला. बेकन, ह्यूम, मिल, माख यांनी पुरस्कृत केलेल्या विगमनवादाची पुनर्मांडणी तार्किक अनुभववाद्यांनी केली. मॉरिझ श्लिकच्या नेतृत्त्वाखालील व्हिएन्ना मंडळ आणि रायशेनबाखच्या प्रभावाखालील बर्लिन मंडळ यांनी प्रचितिवाद विसाव्या शतकाच्या पहिल्या सहा दशकांत विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धरी यांसंबंधीची अधिकृत उपपत्ती म्हणून मान्यता पावला. ⇨कार्ल राइमुंट पॉपर (१९०२–९४) यांनी या उपपत्तीची समीक्षा करून विगमनवाद नाकारला आणि खंडनवादाचे (फॉल्सिफिकेशन) प्रतिपादन केले. तार्किक अनुभववाद्यांचा प्रचितिवाद आणि कार्ल पॉपर यांचा खंडनवाद या दोहोंमध्ये एक समान गृहीत आहे. ते म्हणजे विज्ञानाचे तत्त्वज्ञान वैज्ञानिक पद्धतीचा विचार समर्थन आणि तार्किक वैधतेच्या संदर्भात करते. १९६० नंतर हे दोन संदर्भ वेगळे न करता वैज्ञानिक पद्धतीचा विचार केला पाहिजे, असे तिसरे मत मांडले जाऊ लागले. या लेखात या तिन्ही मतांची चर्चा करून शेवटी वैज्ञानिक वास्तववाद उपस्थित करीत असलेल्या प्रश्नांचा विचार केला आहे.

विगमनवाद-प्रचितिवाद : बेकनप्रणीत विगमनाची सुरूवात कोऱ्या मनाने केलेल्या गृहीतशून्य निरीक्षणापासून होते. ⇨जॉन लॉकनेही मानवी मन कोऱ्या पाटीसारखे असून त्यावर इंद्रियानुभवाद्वारा ज्ञान कोरले जाते, असे मानले. लॉक, बर्कली, ह्यूम, जॉन स्ट्यूअर्ट मिल, एंस्ट माख आणि काही तार्किक अनुभववादी यांनी अनुभवात थेट उपलब्धी बाह्य वस्तूंची होत नसून व्यक्तिगत संवेदनांची होते, असे मानले. विगमनवादाची मुख्य प्रमेये पुढीलप्रमाणे : (१) वैज्ञानिक निरीक्षण गृहीतशून्य, उपपत्तिनिरपेक्ष असते. (२) निरीक्षणाच्या पुनरावृत्तीने अभ्युपगमाचे समर्थन अथवा खंडन केले जाते. अशा या ‘निरीक्षण-अभ्युपगम-निष्कर्ष-प्रचिती’ पद्धतीत अभ्युपगम सुचविणे आणि प्रचितीच्या साहाय्याने अभ्युपगमांची संभाव्यता, सत्यता वा असत्यता ठरविणे या दोन्ही गोष्टी विगमनप्रक्रियेद्वारा होतात. (४) निगामी अनुमानात आधारविधानावरून निष्कर्ष तार्किक अनिवार्यता नसते.

विगामी अनुमानाच्या या स्वरूपामुळे ⇨डेव्हिड ह्यूमने विगामी अनुमानाच्या तार्किक वैधतेविषयी प्रश्न उपस्थित केला. अनुमानाची आधारविधाने सत्य असल्यास त्यावरून काढलेला निष्कर्ष असत्य असू शकत नाही, अशी तार्किक ग्वाही देणारे अनुमान म्हणजे तार्किक वैध अनुमान. परंतु ‘सर्व निरीक्षित क्ष य आहेत’ या सत्य आधारविधानावरून ‘सर्व क्ष य आहेत’ किंवा ‘अन्य अनिरीक्षित क्ष य आहे’ हा निष्कर्ष असत्य असणार नाही, अशी तार्किक ग्वाही विगामी अनुमान देत नाही. ‘काही क्ष य आहेत’ किंवा ‘अन्य अनिरीक्षित क्ष य आहे’ हा निष्कर्ष असत्य असणार नाही, अशी तार्किक ग्वाही विगामी अनुमान देत नाही. ‘काही क्ष य आहेत’ म्हणून ‘सर्व क्ष य आहेत’ अशा प्रकारचे अनुमान निगामी तर्कशास्त्राच्या नियमानुसार अवैधच आहे. अशा प्रकारे ह्यूमने ‘विगमनाची समस्या’ मांडली. जॉन स्ट्यूअर्ट मिल याने ‘निसर्ग नियमबद्ध आहे’ या गृहीताच्या आधारे विगामी अनुमानाचे तार्किक समर्थन करण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘निसर्ग नियमबद्ध आहे’ हे ज्ञान ज्या विगामी अनुमानाने होते, ते अनुमानही या गृहीतावर अवलंबून असले पाहिजे. म्हणून मिलच्या युक्तिवादात अन्योन्याश्रय दोष होतो. विसाव्या शतकातही या समस्येवर खूप चर्चा झाली आहे. सामान्यपणे या समस्येची सोडवणूक अनुमानाचे प्रकार स्वीकारून करण्यात आली. ज्या अनुमानाचा निष्कर्ष आधारविधानांवरून निष्कर्ष संभाव्य ठरतो, ते विगामी अनुमान.

तार्किक अनुभववाद्यांनी विगमनवादाची पुनर्मांडणी केली. त्या मांडणीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : (१) वैज्ञानिक पद्धतीविषयक तात्त्विक प्रश्नांचे स्वरूप भाषिक व तार्किक आहे. म्हणून त्यांनी त्या प्रश्नांची मानसशास्त्रीय व ऐतिहासिक प्रश्नांपासून फारकत केली. (२) प्रचितिक्षमता हा भाषेच्या बोधार्थपूर्णतेचा निकष स्वीकारून विज्ञानेतर शास्त्रे अर्थशून्य मानली. (३) विज्ञानामध्ये तीन प्रकारची पदे आणि विधाने असतात : (अ) निरीक्षण पदे आणि विधाने. ही निरीक्षण भाषा एकतर संवेदनदत्तांची भाषा किंवा भौतिकी (फिजिकॉलिस्ट) भाषा असते. (आ) गणिती आणि तार्किक पदे आणि विधाने ही अनुभवपूर्व विश्लेषक असतात. (इ) उपपत्तीत येणारी वरील दोन प्रकारांव्यतिरिक्त पारिभाषिक पदे आणि विधाने. या औपपत्तिक भाषेची बोधार्थता प्रचितिक्षमतेच्या निकषाने ठरते. या निकषानुसार औपपत्तिक विधानावरून अन्य आधारविधानाच्या साहाय्याने संयुक्तपणे जर काही निरीक्षण-विधाने निगमित होत असतील, परंतु ती केवळ त्या अन्य आधारविधानावरून निगमित होत नसतील, तर ते औपपत्तिक विधान अर्थपूर्ण आहे. वाक्याचा अर्थ म्हणजे त्याची प्रचिती घेण्याची पद्धती होय. उपपत्ती किंवा अभ्युपगमावरून निगमित केलेली निरीक्षण-विधाने जर सत्य असतील, तर ती उपपत्ती केवळ अर्थपूर्ण ठरत नसून संभाव्यही ठरते. आणि निरीक्षण-विधाने असत्य असतील, तर उपपत्ती असत्य ठरते किंवा निदान तिची संभाव्यता घटते. अनुकूल किंवा प्रतिकूल निरीक्षणामुळे उपपत्ती निर्णायकपणे सिद्ध किंवा बाध्य ठरत नाही, असे तार्किक अनुभववादी मानतात. जितकी अनुकूल निरीक्षणे अधिक तितकी उपपत्तीची संभाव्यता अधिक.

संभाव्यता म्हणजे उपपत्तीच्या किंवा अभ्युपगमाच्या विश्वासार्हतेची पातळी असे ⇨अँल्फ्रेड जूल्झ एअर म्हणतो. रायशेनबाख संभाव्यतेचा अर्थ वारंवारतेच्या तत्त्वानुसार करतो. असा अर्थ घेतल्यामुळे संभाव्यतेची तत्त्वे शुद्ध गणिती प्रमेये असून ती विश्लेषणात्मक विधाने आहेत असे तो मानतो. असे मानल्यामुळे ह्यूमने उपस्थित केलेली विगमनाची समस्यादेखील सुटते असा रायशेनबाखचा दावा आहे. निरीक्षणांच्या पुनरावृत्तीवरून अभ्युपगम सुचविणे आणि निरीक्षित घटनांच्या आधारे त्याचे समर्थन करणे ही दोन्ही कार्ये विगामी पद्धतीने होतात. किल्ली दिलेल्या घड्याळाप्रमाणे विश्वाचे मार्गक्रमण काटेकोर नियमानुसार होते आधीच निश्चित केलेला भविष्यकाळ आपोआप उलगडत जातो ही विश्वविषयक आदर्श कल्पना आता संपली आहे. निसर्गातील घटना फेऱ्या मारणाऱ्या ग्रहगोलासारख्या नाहीत, तर द्यूतातील घरंगळणाऱ्या. फाशाप्रमाणे आहेत. त्यांच्यावर कार्यकारणभावाचे नव्हे, तर संभाव्यतेच्या नियमांचे नियंत्रण असते. वैज्ञानिकाचे प्रेषितापेक्षा द्यूत खेळणाऱ्याशी अधिक साम्य आहे, असे रायशेनबाख विगामी पद्धतीने अभ्यासल्या जाणाऱ्या विश्वाचे चित्र रेखाटतो. [→ संभाव्यता].

कार्ल पॉपरप्रणीत खंडनवाद : कार्ल पॉपर हे अनुभववादी असले, तरी आपले सर्व ज्ञान संवेदनाशयांद्वारा अथवा इंद्रियानुभवाद्वारा होते असे मानणारा भाबडा अनुभववाद ते स्वीकारीत नाहीत. त्यांचे वैज्ञानिक पद्धतीविषयक मत तार्किक अनुभववाद्यांच्या विगमनवादाहून वेगळे आणि विगमनवाद-विरोधीही आहे. या दोन मतांतील प्रमुख भेदस्थळांची नोंद घेणे आवश्यक आहे. बेकनपासून तार्किक अनुभववाद्यांपर्यंत सर्व विगमनवादी विज्ञानाची सुरूवात निरीक्षणापासून होते आणि निरीक्षण पूर्वग्रहरहित, तटस्थ आणि उपपत्तिनिरपेक्ष असते, असे मानतात. पॉपर ही दोन्ही प्रमेये नाकारतात. पॉपर यांच्या मते वैज्ञानिकाच्या समोर समस्या असते. ती सोडविण्यासाठी तो विविध अभ्युपगमांची कल्पना करतो. समस्या आणि अभ्युपगम यांच्या संदर्भात प्रस्तुत घटनांचे निरीक्षण केले जाते. म्हणून निरीक्षण हे नेहमी उपपत्ति-गर्भ अभ्युपगमसापेक्ष असते. शुद्ध, पूर्वग्रहरहित निरीक्षणाची कल्पनाच चूक आहे.

विगमनवादानुसार निरीक्षणांच्या पुनरावृत्तीतून अभ्युपगम सुचविले जातात. निरीक्षित घटनांवरून अनिरीक्षित घटनांचे, प्राक्कथन किंवा निसर्गनियमविषयक सार्वत्रिक विधान ही प्रक्रिया विगामी अनुमानप्रक्रिया आहे. हे मान्य केल्यास ह्यूमने उपस्थित केलेली विगमनाची समस्या म्हणजेच विगामी अनुमानाच्या तार्किक वैधतेचा प्रश्न भेडसावतो. पॉपर यांच्या मते अभ्युपगमसूचन वैज्ञानिक निरीक्षणापूर्वी असते. वैज्ञानिकाला पडलेल्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी वैज्ञानिक जे अभ्युपगम मांडतो, तो कल्पनाशक्तीचा, प्रतिभेचा आविष्कार आहे. ती तार्किक प्रक्रिया नाही. हे वैज्ञानिक पद्धतीचे मनोवैज्ञानिक अंग आहे. अभ्युपगमसूचन ही तार्किक अनुमानप्रक्रिया नसल्यामुळे ह्यूमची विगमनाची समस्या अप्रस्तुत ठरते.

सूचित केल्या गेलेल्या अभ्युपगमांपैकी कोणता अभ्युपगम सत्य किंवा संभाव्य आहे, हे पाहण्यासाठी प्रत्येक अभ्युपगमावरून काही घटना किंवा निरीक्षणे निगमित केली जातात. विगमनवादानुसार निगमित केलेली अनुकूल निरीक्षणे सत्य असतील, तर तो अभ्युपगम संभाव्य ठरतो. अभ्युपगमाच्या समर्थनाची तार्किक प्रक्रिया विगामी आहे. निरीक्षणाच्या पुनरावृत्तीतून अभ्युपगमाची प्रचिती घ्यायची असते. जितकी निरीक्षणांची संख्या अधिक तितकी अभ्युपगमाची संभाव्यता अधिक. या विगामी अनुमानाचा घाट असा : जर अ१, तर घ१, घ२, घ३. निरीक्षणांची पुनरावृत्ती करून घ१, घ२, घ३ आढळल्या म्हणून अ1 हा अभ्युपगम संभाव्य आहे. अशा तऱ्हेने अनुकूल निरीक्षणांच्या पुनरावृत्तीने अभ्युपगम संभाव्य आहे. अशा तऱ्हेने अनुकूल निरीक्षणांच्या पुनरावृत्तीने उपपत्तीची संभाव्यता वाढवीत जाणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट असल्याचे विगमनवादी मानतो. याउलट पॉपर यांच्या मते वैज्ञानिक पद्धतीत वापरले जाणारे तार्किक अनुमान निगमीच असते. या तर्कशास्त्राला पॉपर खंडनाचे तर्कशास्त्र असे म्हणतात. विगमनवादाविरूद्ध त्यांचा पहिला युक्तिवाद असा, की जेंव्हा एखाद्या वर्गातील सदस्यांची संख्या सात असते, तेंव्हा अनुकूल निरीक्षणाच्या संख्यावाढीबरोबर सार्वत्रिक विधानाची संभाव्यता वाढत जाते, हे म्हणणे मान्य होण्यासारखे आहे. परंतु अनंत सदस्यीय वर्गाच्या बाबतीत मात्र निरीक्षणांची संख्या कितीही मोठी असली, तरी अस्सल सार्वत्रिक नियमांची संभाव्यता वाढत नाही ती शून्यच राहते. अशा बाबतीत निरीक्षणाच्या आधारे वैज्ञानिक उपपत्ती सत्य किंवा संभाव्य असल्याचे सिद्ध करता येत नसले. तरी एका प्रतिकूल निरीक्षणाद्वारा ती असत्य असल्याचे दाखवता येते. पॉपर यांच्या मते निरीक्षणाचे काम अनुकूल निरीक्षणाने अभ्युपगमाची प्रचिती घेणे हे नसून अभ्युपगमापासून वैज्ञानिकास अशी निरीक्षण-विधाने निगमित केली पाहिजेत, की जी सत्य असल्यास उपपत्ती असत्य ठरेल. यावरून पॉपर वैज्ञानिक उपपत्तीचा निकष प्रचितिक्षमता हा नसून खंडनक्षमता किंवा बाधक्षमता (फॉल्सिफिएबिलिटी) असल्याचे प्रतिपादन करतात. म्हणून पॉपर यांच्या मताला खंडनवाद बाध होऊ शकत नाही, ती न-वैज्ञानिक उपपत्ती आहे. खंडनीयता, बाधक्षमता किंवा परीक्षणीयता हा उपपत्तीच्या वैज्ञानिकतेचा निकष आहे. याच निकषच्या आधारे मार्क्स, फ्रॉइड, अँड्लर, डार्विन यांच्या उपपत्ती अस्सल वैज्ञानिक उपपत्ती नसल्याचा निष्कर्ष त्याने काढला.


विधानांच्या विवेचनाने पॉपर खंडनवादाचे समर्थन करतात : सर्व कावळे काळे आहेत हे अस्सल सार्वत्रिक विधान काळ्या कावळ्यांचे किंवा कावळाही नाही आणि काळाही नाही अशा पक्ष्याचे किंवा कावळा नाही पण काळा आहे अशा पक्ष्याचे अस्तित्व प्रतिपादित नसून कावळा आहे पण काळा नाही हा रिक्त वर्ग आहे असे सांगते. काळा नसलेल्या कावळ्याचे अस्तित्व नाकारते. म्हणून एका काळा नसलेल्या कावळ्याचे अस्तित्व किंवा निरीक्षण ‘सर्व कावळे काळे आहेत’ हे विधान असत्य ठरवते. याउलट ‘आयाळरहित सिंह पाहिले, तरी असत्य ठरू शकत नाही. पण एक आयाळरहित सिंह पाहिल्यास ते सत्य ठरते. ही दोन्ही प्रकारची विधाने ज्या निरीक्षण-विधानाद्वारा असत्य व सत्य ठरतात, ते अस्सल एकवचनी विधान असते, ‘विशिष्ट स्थळी, विशिष्ट काळी, विशिष्ट प्रकारची वस्तू आहे’, या घाटाचे ते विधान असते. यावरून असा निष्कर्ष निघतो, की अस्सल सार्वत्रिक विधान निरीक्षणाद्वारा खंडनक्षम असते, तर अस्सल अस्तित्ववाची विधान निरीक्षणाद्वारा प्रचितिक्षम असते. प्रचितिक्षमता आणि खंडनक्षमता यांतील असममितीच्या आधारे विज्ञानाचे उद्दिष्ट उपपत्तीचे किंवा सामान्य नियमांचे निरीक्षणाद्वारा समर्थन करणे हे नसून खंडन करणे हे आहे, असा पॉपर यांचा युक्तीवाद आहे. वैज्ञानिक पद्धतीत वापरले जाणारे अनुमान विगामी नसून निगामी आहे. जर अ१, तर घ१, घ२ घ२ नाही म्हणून अ१असत्य आहे. विगामी अनुमानाचाच इन्कार केल्यामुळे ह्यूमच्या विगमनाच्या समस्येची सोडवणूक होते.

निरीक्षणांची पुनरावृत्ती-अभ्युपगम सूचन-निरीक्षणांद्वारा अभ्युपगमांची प्रचिती, समर्थन व संभाव्यता या विगमनवादी पद्धतीहून पॉपरप्रणीत समस्या-अभ्युपगम-निरीक्षणाद्वारा चाचणी आणि प्रमादवर्जन हे वैज्ञानिक पद्धतीचे विवेचन खूप वेगळे आहे, हे ध्यानी घेणे महत्त्वाचे आहे.

ऐतिहासिक वास्तववाद : तार्किक अनुभववादी आणि कार्ल पॉपर यांनी वैज्ञानिक पद्धतीच्या तार्किक अंगांची तिच्या ऐतिहासिक, मानसशास्त्रीय, सांस्कृतिक, समाजशास्त्रीय अंगांपासून फारकत करून केवळ तार्किक अंगाचा विचार केला आणि वैज्ञानिक पद्धतीचे आदर्श स्वरूप कसे असते हे मांडले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात स्टीव्हन टॉउलमीन, टॉमस कुन्ह, इम्रे लॅकॅटॉस, पॉल फेयराबेंड इ. अनेक तत्त्ववेत्त्यांनी ही फारकत नाकारली आणि आदर्श वैज्ञानिक पद्धतीचा विचार न करता वास्तवात तिचे स्वरूप काय आहे आणि विज्ञानाची वाढ कशी होते, याचा विचार इतिहासाच्या मदतीने केला. उदाहरणादाखल तीन प्रमुख मतांची नोंद करता येईल, ती पुढीलप्रमाणे :

टॉमस कुन्हच्या मते विज्ञान ही स्वतंत्र वैयक्तिक कामगिरी नसून वैज्ञानिक समाजाची सामूहिक कामगिरी आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील वैज्ञानिक समाज जेव्हा एक समान विचारचौकट स्वीकारून त्या चौकटीतच सामूहिकपणे संशोधन-प्रकल्प राबवितात, तेंव्हाच खऱ्या अर्थाने विज्ञानाला प्रारंभ होतो. अशा स्वीकृत विचारचौकटीतील विज्ञानाला कुन्ह ‘प्रस्थापित किंवा रूढ विज्ञान’ म्हणतो. या कालखंडातील वैज्ञानिक समस्यांचे स्वरूप चित्रकोडे किंवा शब्दकोडे या स्वरूपाचे असते. यातील निरीक्षणे स्वीकृत चौकटसापेक्ष असतात. प्रतिकूल निरीक्षणसुद्धा त्याच चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून पॉपरची वैज्ञानिक पद्धतीची खंडनवादी कल्पना येथे गैरलागू आहे. क्रांतिकारी काळात विचारचौकटीत बदल होतो. परंतु हा बदल पहिली चौकट असत्य किंवा बाध ठरल्यामुळे किंवा नवी चौकट सत्य किंवा अधिक संभाव्य ठरल्यामुळे होत नसून वैज्ञानिकांच्या मानसिकतेत बदल झाल्यामुळे होतो. या बदलाला ऐतिहासिक-सामाजिक कारणे असतात. या बदलाचे अनुभवगम्य पुरावा आणि शुद्ध तार्किक युक्तिवाद यांनी समर्थन करता येत नाही कारण दोन विचारचौकटींची तुलनाच शक्य नसते. अशा तऱ्हेने तार्किक अनुभववादी आणि कार्ल पॉपर यांनी विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती यांविषयीची उभी केलेली आदर्श प्रतिमा फसवी आहे, असा निष्कर्ष कुन्ह काढतो.

कुन्हप्रमाणेच इम्रे लॅकॅटॉससुद्धा विज्ञानाची प्रगती सुट्या सुट्या अभ्युपगमांची किंवा उपपत्तींची प्रचितिक्षमता किंवा खंडनक्षमता या निकषांनी ठरत नसून ‘वैज्ञानिक संशोधनप्रकल्पांच्या यशस्वितेवर अवलंबून असते’, असे मानतो. न्यूटनचा गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत, आइनस्टाइनचा सापेक्षतासिद्धांत, प्लांकचा पुंजवाद एवढेच नव्हे, तर पॉपरच्या मतानुसार प्रतिकूल निरीक्षणाने तत्त्वत:ही बाधित होऊ न शकणाऱ्या अशा मार्क्स, फ्राइड, डार्विन यांच्या न-वैज्ञानिक उपपत्तीसुद्धा, लॅकॅटॉसच्या मते व्यापक वैज्ञानिक संशोधनप्रकल्प आहेत. अशा प्रकल्पांना तीन प्रमुख अंगे असतात : (१) भक्कम गाभा, (२) संरक्षक पट्टा आणि (३) संशोधनप्रकल्पात निर्माण होणाऱ्या समस्यांची समाधनकारक सोडवणूक करण्यासाठी गणिती-तर्कशास्त्रीय इ. समर्थ तंत्रांचा वापर करण्याची क्षमता. एक उपपत्ती असत्य ठरून तिची जागा अन्य उपपत्तीने घ्यायची, अशा प्रकारे विज्ञानाची प्रगती एका सरळ रेषेत होत नाही तर एकाच वेळी अनेक पर्यायी संशोधनप्रकल्प कार्यरत असून त्यांच्यात स्पर्धा असते. प्रत्येक संशोधनप्रकल्पाची काही सबल व काही दुर्बल स्थाने असतात. जोपर्यंत एखादा संशोधनप्रकल्प प्रगतीपथावर असतो, तोपर्यंत तदंतर्गत निर्माण होणारे विसंवाद, प्रतिकूल निरीक्षणे इ. समस्यांची डगमगून न जाता त्यांचा विधायक पद्धतीने विचार केला जातो. यावरून प्रचितिवादी आणि खंडनवादी यांनी वैज्ञानिक पद्धती आणि प्रगती यांचे केलेले विश्लेषण फार उथळ आहे तर्क ब निरीक्षण यांच्या व्यतिरिक्त अनेक घटक विचारात घेणे आवश्यक आहे, असे लॅकॅटॉस मानतो.

विज्ञान हे मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ बौद्धिक अंग असून वैज्ञानिक पद्धती ही ज्ञानसंपादनाची आदर्श प्रमाणित पद्धती आहे, ही तार्किक अनुभववादी आणि कार्ल पॉपर यांनी निर्माण केलेली प्रतिमा फसवी आहे विज्ञान हे अनेक अंगांपैकी एक अंग आहे, असे मानणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये पॉल फेडराबेंड यांचे मत टोकाचे आहे. त्यांच्या १९७५ साली प्रसिद्ध झालेल्या पद्धतिविरोधी दृष्टिकोन : अराजकवादी ज्ञानमीमांसेची रूपरेषा (अगेन्स्ट मेथड : आउटलाइन ऑफ अँन अनार्किस्ट थिअरी ऑफ नॉलेज) या ग्रंथात तार्किक अनुभववादी, कार्ल पॉपर, टॉमस कुन्ह, लॅकॅटॉस इत्यादींच्या मतांची कडक समीक्षा केलेली आहे. फेयराबेंड म्हणतात, ‘अराजकतावाद हा जरी राजकीय तत्त्वज्ञानात विशेष आकर्षण नसला, तरी ज्ञानमीमांसेत आणि विशेषत: विज्ञानाच्या तत्त्वज्ञानात तो एक उत्कृष्ट रोगनिवारक औषधी आहे, या धारणेतून मी हा ग्रंथ लिहिला आहे’. ‘विज्ञान हे खास बंडखोरी करणारे ज्ञानक्षेत्र आहे. औपपत्तिक बंडखोरी ठरणारा अराजकतावाद हा मानवतावादी दृष्टिकोन असून कडक शिस्त व नियमांचे पालन करणाऱ्या पद्धतीपेक्षा तो प्रगतीला अधिक पोषक ठरेल.’ ज्ञानशास्त्रीय अराजकतावादाचे उदाहरण म्हणून फेयराबेंड दोन प्रतिनियम सुचवितात : (१) ज्या उपपत्ती निर्विवाद सिद्ध झालेल्या वास्तवाशी विसंगत अभ्युपगम मांडा आणि (२) निर्विवाद सिद्ध झालेल्या वास्तवाशी विसंगत अभ्युपगम मांडा. या दोन्ही प्रतिनियमांचे सार म्हणजे विगमनविरोधी मार्गाने चाला. इतिहासातील दाखले देऊन फेयराबेंड प्रत्येक वैज्ञानिक पद्धतीच्या नियमाला अपवाद कसा केला गेला, हे दाखवितात आणि म्हणतात, ‘प्रत्येक पद्धतिशास्त्राला त्याच्या स्वत:च्या मर्यादा असतात’. एकच नियम टिकून राहतो व तो म्हणजे ‘काहीही चालते’ (एनिथिंग गोज) हा.

वैज्ञानिक वास्तववाद : प्रचितिवाद आणि खंडनवाद आदर्श अशा प्रमाणित वैज्ञानिक पद्धतीचे विवरण करतात, तर ऐतिहासिक वास्तववाद प्रत्यक्षात वैज्ञानिक पद्धतीचा वापर आणि वैज्ञानिक प्रगतीचे स्वरूप यांचे वर्णन करतो. या दोन दृष्टिकोनांत मोठी दरी आहे. तरीपण विज्ञान-तंत्रज्ञानाने मानवी जीवनात आमूलाग्र क्रांती घडवून आणली, याविषयी कोणाचेही दुमत नाही. ऐतिहासिक वास्तववादाला विज्ञान-विरोधी मानणे म्हणूनच गैर आहे. वैज्ञानिक वास्तववादापुढील प्रश्न वेगळाच आहे. दृश्य घटनांचे स्पष्टीकरण, भावी घटनांचे प्राक्कथन यशस्वीपणे करणाऱ्या वैज्ञानिक उपपत्तीमध्ये अपरिहार्यपणे अशी औपपत्तिक पदे आणि विधाने येतात, की जी निरीक्षित पदार्थ व प्रक्रियांचे अस्तित्व प्रतिपादन करतात का? वैज्ञानिक वास्तववादानुसार निरीक्षित वास्तवाचे यथार्थ आकलन होण्यासाठी अनिरीक्षित वास्तवाचा-वस्तू आणि शक्ती यांचा-शोध घेणे विज्ञानाचे काम आहे. वैज्ञानिक पद्धतीद्वारा अशा अनिरीक्षित पण बुद्धिग्राम वास्तवाचे यथार्थ ज्ञान करून देण्याचा विज्ञान प्रयत्न करते म्हणून औपपत्तिक पदे आणि विधाने ही निरीक्षणीय वास्तवाचे स्पष्टीकरण करण्यासाठी उपयुक्त अशी केवळ साधनमात्र सांकेतिक पदे नाहीत. तशीच त्या केवळ सत्ताशास्त्रीय परिकल्पनाही नाहीत. शिवाय मानवी निरीक्षणशक्तीची व्याप्ती शास्त्रीय उपकरणांमुळे इतकी वाढली आहे, की अणू आणि अण्वंतर्गत परमाणूही आता निरीक्षित पदार्थांच्या वर्गात मोडतात. म्हणून वैज्ञानिक वास्तववादानुसार विज्ञान हे वैज्ञानिक पद्धतीद्वारा वास्तवाच्या सूक्ष्म अंतरंगाचे ज्ञान करून देते. जडद्रव्य, प्रकाशकिरण आणि विद्युत यांच्या स्वरूपासंबंधीचा वाद अणुसिद्धांत आणि तरंगसिद्धांत यांच्यामध्ये दीर्घकाळ सुरू होतो. या वादाची परिणती ऊर्जा पुंजकाच्या सिद्धांताद्वारा कण व तरंग यांच्या सहअस्तित्त्वाच्या सिद्धांतात झाली. तरीसुद्धा अणुविश्वातील दोन कणांमधील धडक आणि एक कण व प्रकाशकिरण यांच्यामधील धडक एवढेच वैज्ञानिक पाहू शकतो. हे निरिक्षित वास्तव झाले. दोन धडकांमधील कालखंडात काय घडते किंवा प्रकाशकिरण उगमापासून निघून त्याची धडक होईपर्यंतच्या त्याच्या मार्गात काय घडते, या गोष्टी आजही अनिरीक्षित आहेत आणि कदाचित कण पाहण्यासाठी त्यावर प्रकाशकिरण पाडल्यावर त्या धडकीमुळे तो कण ढकलला जात असल्यामुळे केवळ धाकच निरीक्षणीय असेल. तात्पर्य, वैज्ञानिक उपपत्तीतील अनिरीक्षित किंवा अनिरीक्षिणीय पदांच्या अर्थविषयी वास्तववाद, संकेतवाद आणि रूपांतरवाद (रीडक्शनिझम) अशा तीन भूमिका घेतल्या जातात. वैज्ञानिक वास्तववादानुसार विज्ञान, वैज्ञानिक पद्धतीद्वारा, वास्तवाच्या सूक्ष्म अंतरंगाचे ज्ञान करून देते. संकेतवादानुसार औपपत्तिक पदे दृश्य वास्तवाच्या आकलनासाठी उपयुक्त सांकेतिक पदे आहेत, तर औपपत्तिक पदांचे रूपांतर किंवा भाषांतर निरीक्षणभाषेत करणे. तत्त्वत: शक्य आहे आणि निरीक्षणभाषेत व्यक्त होणारा किंवा होऊ शकणारा आशय हाच आणि तेवढाच त्या पदांचा अर्थ आहे, अशी रूपांतरवादी भूमिका आहे.

पहा : वास्तववाद, तत्त्वज्ञानातील विज्ञान विज्ञानाचे तत्त्वज्ञान वैज्ञानिक संशोधन.

संदर्भ : 1. Ayer, A. J. Ed, Logical Postivism, New York, 1959.

           2. Feyerabend, Paul, Against Method, London, 1975.

           3. Kuhn, Thomas, The Strucutre of Scientific Revolution, Chicago 1964.

           4. Lakatos, Imre, The Methodology of Scientific  Research Programme,Philosophical Papers, Vol.1, Cambridge, 1971.

           5. Laudan, Larry, Beyond Positivism and Relativism : Theory, Method and Evidence, Oxfard, 1996.

           6. Losee, John, A Historical Introduction ti the Philosoplhy of to the Philosophy of Science, Londan, 1972.

           7. O’ Hear Anthony, An Introduction to the Philosophy of Science, Oxford, 1989.

           8. Popper, Karl, Conjectures and Refutations (The Growth of Scientific Knowledge), London, 1989.

           9. Richards, Stewart, Philosophy and Sociology of Science : An Introduction, Oxford, 1983.

           10. Suppe, Fredrick, Ed., The Sructure of Scientific Theories, Chicago, 1977.

           ११. एअर, अँल्फ्रेड जूल्झ, अनु., अंतरकर, शि. स. भाषा, तर्क आणि सत्य, पुणे, १९७४.

           १२. रायशेनबाख, हान्स, अनु., कुंभोजकर, ग. वि. वैज्ञानिक तत्त्वज्ञानाचा उदय, मुंबई,१९७३.

अंतरकर, शि. स.