वैद्य, परशुराम लक्ष्मण : (२९ जून १८९१–२५ फेब्रुवारी १९७८). संस्कृत, पाली, प्राकृत भाषा – साहित्याचे थोर पंडित. जन्म सिद्धेश्वर ह्या कोकणातील एका खेड्यात. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे माधुकरी मागून प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर सांगली येथे गुरुगृही राहून संस्कृतचे विशेष अध्ययन केले. त्यानंतर नासिकला एका नामांकित वैद्यांच्या घरी राहून आयुर्वेदाचा अभ्यास केला. पुढे खाजगी रीत्या इंग्रजीचा अभ्यास करून नासिकच्याच एका माध्यमिक शाळेत इंग्रजी चौथीत प्रवेश मिळविला. त्यानंतर पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून ते मॅट्रिक झाले (१९१२). संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील शिक्षण अर्धवट सोडून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी नोकरी धरली. पुढे रॅंग्लर परांजपे यांच्या मदतीने १९१८ साली ते बी. ए. झाले. ह्या परीक्षेत त्यांना पहिला वर्ग आणि भाऊ दाजी पारितोषिक मिळाले. १९१९ साली पाली हा विषय घेऊन कलकत्ता विद्यापीठाची एम्. ए. ची परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. तत्पूर्वीच प्रथम कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आणि नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात त्यांच्या प्राध्यापकीय जीवनाची सुरुवात झाली होती. १९२१ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यपद त्यांना देण्यात आले होते. पुढे भारत सरकारकडून प्राच्यविद्याभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळवून ते फ्रान्स आणि बेल्जियम येथे दोन वर्षे होते. पॅरिस विद्यापीठाची डी. लीट्. ही पदवी त्यांनी ह्या वास्तव्यात मिळविली (१९२३). भारतात परतल्यानंतर ते पुन्हा सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकवू लागले. १९२८ मध्ये त्यांना स्प्रिंगर संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. १९३० साली त्यांची पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बदली झाली. १९३२ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्यत्वाचा राजीनामा देऊन ते वाडिया महाविद्यालयात प्राध्यापक झाले. तेथेच १९४७ साली ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पाच वर्षे बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक व संस्कृत-पाली विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर चार वर्षे दरभंगा येथील मिथिला इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत रिसर्च ह्या संस्थेचे ते संचालक होते. १९६१ पासून पुढील बारा वर्षे पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी काम केले. येथेच हरिवंशाचे संपादनही त्यांनी केले.
“