वैद्यकीय संस्था व संघटना : वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी आणि वैद्यक व्यवसायाच्या नियंत्रणासाठी अनेक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्था कार्य करीत असतात. वैद्यकात समाजातील अनेक घटकांचा रुग्ण म्हणून संबंध येत असल्यामुळे आणि संशोधनात अनेक विज्ञानशाखांशी आधारभूत असा संपर्क ठेवणे आवश्यक असल्याने अशा संस्थांची आवश्यकता आधुनिक काळात पूर्वीपेक्षा जास्त जाणवते. एखाद्या व्यक्तीने स्वतंत्रपणे हे कार्य करणे किंवा शासनाच्या एखाद्या खात्यातील कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक नियंत्रण वा मार्गदर्शन करणे तितकेसे परिणामकारक ठरत नाही. अनेक प्रकारच्या व्यावसायिकांचा उपयोग करून घेणाऱ्या संस्था जास्त उपयुक्त ठरतात.
अर्वाचीन यूरोपीय वैद्यकीय व्यवसायात राजसत्तेच्या नियंत्रणाखाली ‘रॉयल कॉलेज’ या नावाच्या संस्था सोळाव्या शतकापासून स्थापन होऊ लागल्या आणि त्या व्यावसायिक नियम ठरवू लागल्या. त्यापूर्वी विशिष्ट तंत्रे वापरणाऱ्या व्यावसायिकांच्या संघटना ‘गिल्ड’ या नावाने ओळखल्या जात. इंग्लंडमध्ये १५१८ मध्ये रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स ही संस्था लंडन येथे स्थापन झाली आणि त्यानंतर शल्यचिकित्सक व स्त्रीरोगशास्त्रज्ञांच्या अशाच रॉयल कॉलेजांची स्थापना काही वर्षांनी झाली. या सर्व संस्था अनुभवप्राप्त उमेदवारांच्या चाचण्या घेऊन त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याचे परवाने देत. वैद्यकीय शिक्षण जास्त सुसंघटित स्वरूपात विद्यापीठांमधून सुरू झाल्यावर या संस्थांनी हळूहळू आपले लक्ष पदव्युत्तर शिक्षणावर केंद्रित करून मास्टर ही पदवी किंवा फेलोशिप (अधिछात्रवृत्ती) हा सन्मान परीक्षा घेऊन देण्याची पद्धत सुरू केली. परवाने देण्याची जबाबदारी वैद्यकीय परिषदांकडे म्हणजे मेडिकल कौन्सिलकडे देण्यात आली. अमेरिकेत हेच काम राष्ट्रीय किंवा राज्यांची मंडळे करतात.
भारतात व्यावसायिक परवाने देण्याचे कार्य मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय भारतीय वैद्यक परिषद) ही १९३३ च्या कायद्यानुसार स्थापलेली संस्था आपल्या राज्यपातळीवरील परिषदांमधून करते. तसेच ही संस्था व्यावसायिक आचारसंहितांमधून मार्गदर्शन, शैक्षणिक धोरण व नियंत्रण, पदव्यांना अखिल भारतीय मान्यता देणे यांसारख्या जबाबदाऱ्यांतही भारत शासनाच्या वतीने उचलते.
वैद्यकीय संशोधनाच्या कार्यास भारतात एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सुरुवात झाली. साथीच्या रोगांना आळा घालण्याचा गंभीर प्रश्न त्या वेळी प्रामुख्याने समोर होता. लूई पाश्चर व रॉबर्ट कॉख यांच्याकडून शिक्षण घेतलेल्या हॅंकिन या जीवाणुशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली १८९२ मध्ये आग्रा येथे पहिली प्रयोगशाळा या प्रश्नासाठी स्थापन झाली. नंतर १९०० मध्ये मुंबईत ⇨हाफकिन इन्स्टिट्यूट सुरू झाली. अशाच प्रकारच्या संस्था चेन्नईजवळ गिंडी (१९०३), हिमाचल प्रदेशात कसौली (१९०६) आणि तमिळनाडूमधील कुन्नुर (१९०७) येथे कार्य करू लागल्या. कुपोषणाची समस्या लक्षात घेऊन १९१८ मध्ये कुन्नुर येथे पोषण संशोधन प्रयोगशाळाही स्थापन झाली. तिचे स्थलांतर नंतर हैदराबाद येथे होऊन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनमध्ये (राष्ट्रीय पोषण संस्थेत) रूपांतर झाले. वैद्यकाच्या सर्व क्षेत्रांतील संशोधनास चालना देण्यासाठी भारत सरकारने १९११ मध्ये इंडियन रिसर्च फंड ॲसोसिएशन नावाची संस्था कार्यान्वित केली. तिचे रूपांतर १९४९ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद) यामध्ये झाले.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) आणि विज्ञान व तंत्रविद्या विभाग यांच्या मदतीने वैद्यकीय संशोधनास वेग आला व अनेक संस्था स्थापन झाल्या. कोलकाता, नवी दिल्ली, मुंबई, गाझियाबाद, हैदराबाद, बंगलोर, पॉंडिचेरी, चेन्नई, चंडीगढ, नागपूर, अहमदाबाद आदी विविध शहरांत वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी व संशोधनासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत.
प्रत्यक्ष संशोधन, तांत्रिक प्रशिक्षण, आधुनिक संशोधनाची माहिती विशेषज्ञांना देण्यासाठी नियतकालिकांचे व पुस्तिकांचे प्रकाशन आणि औषधांचे व संशोधनसामग्रीचे उत्पादन असे बहुविध कार्य या संस्था करीत असतात. यांशिवाय संशोधनाचे बरेचसे कार्य विद्यापीठे, महाविद्यालये, औषधनिर्मितीचे कारखाने, खाजगी रुग्णालये आणि खाजगी संशोधन संस्था यांच्याकडून होत असते. अनुसंधान परिषदांच्या मदतीने चालणाऱ्या संशोधनात रोगांच्या प्रादुर्भावाची क्षेत्रीय सर्वेक्षणे, विशिष्ट समस्यांवरील संशोधनासाठी काही वर्षे काम करणारी पथके आणि अल्पकालिक अभ्यासासाठी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना दिलेली अनुदाने यांचा समावेश होतो.
आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये ⇨जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकन सरकारची आंतरराष्ट्रीय विकास संस्था (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डिव्हलपमेंट, यूएसएआयडी), राष्ट्रकुल परिषदेची कोलंबो योजना, आंतरराष्ट्रीय ⇨रेडक्रॉस संघटना यांसारख्या संस्थांचा समावेश होतो. तसेच ⇨रॉकफेलर प्रतिष्ठान, ⇨फोर्ड प्रतिष्ठान, केअर (सीएआरई, को-ऑपरेशन फॉर अमेरिकन रिलीफ एल्सव्हेअर), ऑक्सफॅम, सेव्ह दि चिल्ड्रन फंड, अंधत्व प्रतिबंधक संघटना, कुष्ठ निवारण संघटना, जागतिक बधिर संघ यांसारख्या खाजगी संस्था विशिष्ट प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जगातील अनेक देशांना मदत करतात. धार्मिक संघटनांमध्ये ख्रिश्चन मेडिकल कमिशन आणि रोमन कॅथलिक पंथाचे मेडिकस मुंडाय इंटरनॅशनल यांचा समावेश होतो. बिनसरकारी संघटांने आरोग्य सेवेतील महत्त्व लक्षात घेऊन अशा खाजगी संस्थांना जगभर सर्वत्र आवाहन केले जात आहे.
आरोग्यविषयक प्रश्नांची समानता आणि जगभर एखादी समस्या जलद पसरण्याची शक्यता यांच्यातून काही समान उद्देशीय संघटनांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय जाळी विणली आहेत व आपल्या उद्दिष्टांच्या दिशेने जोरदार हालचाली केल्या आहेत. उदा., इंटरनॅशनल हॉस्पिटल फेडरेशन, कॉमन वेल्थ मेडिकल ॲसोसिएशन, कौन्सिल ऑफ नर्सेस इत्यादी. यूरोपमधील कौन्सिल ऑफ यूरोप ही संस्था आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा औषधिकोश निर्माण करते, तसेच दुर्मिळ रक्तगटांची माहिती संकलित करते. यूरोपीय राष्ट्रगटांच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत नागरिकांच्या मुक्त हालचालींमुळे निर्माण होणारे वैद्यकीय नीतिविषयक प्रश्न हाताळण्यासाठी काही संघटनाही नव्यानेच तयार झाल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय संस्थांची संख्या फार मोठी आहे. त्यांची एकत्रित माहिती जागतिक आरोग्य संघटनेची ‘कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मेडिकल सायन्सेस’ (सीआयओएमएस) ही परिषद प्रकाशित करते. या परिषदेच्या सभासद संस्थांची संख्या १९९८ मध्ये १०४ होती, तसेच सहयोगी सभासद ११ होते. याव्यतिरिक्त सु. ९० संघटना आहेत.
पहा : कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च जागतिक आरोग्य संघटना राष्ट्रीय प्रयोगशाळा रॉयल सोसायटी रेडक्रॉस वैद्यक वैज्ञानिक संस्था व संघटना स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन हाफकिन इन्स्टिट्यूट.
संदर्भ : 1. Bhore, y3wuoeph Government of India : Report of the Health Survey and Development Committee, Vol. I and II, New Delhi, 1946.
2. Europa Publications Limited, The World of Learning 1995, London, 1998.
3. Walter, J. Barondess, J. A. Look, S., Eds., Oxford Medical Companion, Oxford, 1994.
श्रोत्री. दि.शं.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..