वैदू : महाराष्ट्र राज्यातील एक भटकी जमात. ते गावोगावी फिरत औषधे विकतात, म्हणून त्यांना वैदू म्हणतात. त्यांची वस्ती प्रामुख्याने नासिक, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांत तसेच खानदेशात आढळते. काही वैदू जमातीचे लोक कर्नाटकातही आढळतात. त्यांना गोल, गंडगीर, पंडित इ. नावे आहेत. पुष्कळसे वैदू हे तेलुगू भाषा बोलतात आणि त्यांचा मूळ देव तिरुपतीचा व्यंकटेश वा वेंकटेवा असल्यामुळे बहुधा ते आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात पूर्वी केव्हातरी आले असावेत, असा मानवशास्त्रज्ञांचा कयास आहे. शिवाय त्यांपैकी काहीजण हैदराबादजवळील कुडेरमट्टी गावाच्या एका धनगरास आपला धर्मगुरू मानतात. वैदूंचे झोळीवाले, दाढीवाले व चटईवाले असे तीन प्रमुख पोटभेद असून त्यांच्यातही आणखी काही पोटभेद आहेत. यांच्यातील काही पोटजातींचे परस्परांत लग्नसंबंध होतात तर काहींमध्ये होत नाहीत. हे लोक वर्षभर बायका-मुलांसह गावोगावी फिरून औषधे विकतात आणि गावाच्या माळावर कापडाच्या पालात वस्ती करतात. सामान वाहण्यासाठी गाढवांचा उपयोग करतात. त्यांची कुटुंबपद्धती देवकाधिष्ठित आहे. त्यांना रानातील औषधी झाडपाल्यांची व मुळ्यांची माहिती असते. सामान्यत: सर्दी -खोकल्यापासून क्षयापर्यंतच्या रोगांवर औषधे त्यांच्याजवळ असतात. रस्त्यातून फिरताना हे लोक ‘नाडीपरीक्षा-वैद, मंडूर-वैद, गर्मी -वैद, वाताला ओखद, सर्दीला ओखद’ अशा प्रकारे आवाज देतात. यांच्या बायकाही औषधे विकतात परंतु प्रामुख्याने त्या शिरगोळे कुटून त्याची रांगोळी करून तसेच चटया बनवून विकतात.

यांच्यात भोई, धनगर, खुटेकर, कोळी, माळी, मिरजु-माळी, फुल-माळी, रावळ वागमुंदी, झिंगा अशी गोत्रनामे असून मराठी वैदूंची अंबिले, चिटफळ, मानपाटी, शिगडे, मोरे, शितोळे, पवार, जाधव, शिंदे अशी आडनावे आढळतात. एकाच कुळीत वा आडनावांच्या कुटुंबात लग्नसंबंध करीत नाहीत. समान देवक असलेल्या कुटुंबांतही लग्नसंबंध निषिद्ध मानतात. मुले वयात आल्यानंतर त्यांचा विवाह ठरविला जातो. वराचा पिता मुलीला मागणी घातलो. लग्नात मुलीचे देज वा वधूमूल्य देतात. लग्नविधीत वधूवर एकमेकांना कंकण बांधतात आणि नंतर वधूच्या गळ्यात गरसोळी (मंगळसूत्र) बांधतात. लग्नविधी वयस्क व्यक्तीकडून संपन्न होतो. यांच्यात घटस्फोट मान्य असून पुनर्विवाह रूढ आहे मात्र लग्नापूर्वीचा स्वैराचार निषिद्ध मानतात व तो उघडकीस आल्यास दंड वा ज्ञातिभोजन द्यावे लागते. कधीकधी शिक्षा म्हणून जिभेला डागही देतात.

गाय सोडून सर्व पशूंचे मांस ते भक्षण करतात. त्यांच्यात मद्यपानही रूढ आहे. दसरा व शिमगा हे त्यांचे महत्त्वाचे सण असनू वेंकोबाशिवाय मरिअम्मा, मारुती या देवांना ते भजतात. दहा-बारा कुटुंबे समूह करून भटकत असतात. त्यांत एक म्होरक्या-भगत-असतो. जंगलातून झाडपाला-मुळ्या गोळा करतात ते शिकारही करतात. ते मृतांना पुरतात वा दहन करतात. विवाहित मृतास बसलेल्या स्थितीत पुरतात. प्रेतदहनानंतर तिसर्याक दिवशी राख सावडतात व ती नदीनाल्यात टाकतात. अकराव्या दिवशी नदीवर मृताचे श्राद्ध जंगमाकडून करतात. तिथे मृताचा मुलगा नदीत उभे राहून एका सुपात तीन पिंड घेतो व ते मागच्या बाजूस टाकतो आणि मग पाण्यात शिरतो. जंगम शंख वाजवून मृताचा आत्मा अंतर्धान पावल्याची घोषणा करतो.

भागवत, दुर्गा