वैतरणी : (१) ओरिसा राज्यातून वाहणारी एक नदी. हिची लांबी ३३३ किमी. व पाणलोट क्षेत्र १०,५०० चौ. किमी. असून वार्षिक सरासरी पाणलोट प्रमाण सु. ७,२७८ द. ल. घ. मी. आहे. ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील गोनसिका टेकड्यांमध्ये २१°२८’ उत्तर अक्षांश व ८५°३३’ पूर्व रेखांशावर या नदीचा उगम होतो. केओंझारच्या पश्चिमेस असलेल्या मलयगिरीच्या पायथ्यालगत उगम पावणार्या दोन उपनद्या वैतरणीच्या शीर्षप्रवाहाला मिळतात. केओंझार-मयूरभंज जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून तसेच केओंझार जिल्ह्यातून आग्नेयीस वाहत आल्यानंतर बलिपूर येथे ती कटक जिल्ह्यात प्रवेश करते. त्यानंतर ती कटक-बलसोर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून काहीशी पूर्वेकडे वाहते. चांदबाली या छोट्याशा बंदरापासून पुढे वाहत गेल्यानंतर धामरा या नावाने ती बंगालच्या उपसागराला मिळते. सालंदी व मतई या वैतरणीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वैतरणी नदीच्या वरच्या टप्प्यात जलविद्युत् प्रकल्पांसाठी अनुकूल परिस्थिती आहे. तसेच त्यातील पाण्याचा उपयोग खालच्या टप्प्यातील किनारी प्रदेशात जलसिंचनासाठी करून तेथील कृषी व आर्थिक विकास साधता येईल. नदीला येणाऱ्या पुरांमुळे कटक, बलसोर व केओंझार जिल्ह्यांचे खूप नुकसान होते. मुखापासून आत २४ किमी. वर असलेल्या ओलोखपर्यंत ही नदी जलवाहतुकीस उपयुक्त आहे. आनंदपूर, ओलोख, चांदबाली व धामरा ही वैतरणा नदीच्या काठावरील प्रमुख स्थळे आहेत.
“