वेस्टमिन्स्टर : इंग्लंडच्या ग्रेटर लंडनमधील एक बरो व शहर. वेस्टमिन्स्टर, पॅडिंग्टन आणि सेंट मेरिलेबोन हे तीन बरो एकत्रित करून वेस्टमिन्स्टरची स्थापना करण्यात आली ( १९६५). याचे क्षेत्रफळ २२ चौ.किमी. व लोकसंख्या १,८१,२८६ (२००१) होती. टेम्स नदीच्या उत्तर तीरावर वेस्टमिन्स्टर वसले असून याच्या पश्चिमेस केन्झिंग्टन व चेल्सी, तर पूर्वेस लंडन शहर पसरले आहे. वेस्टमिन्स्टर हे मुळात टेम्स नदीच्या दलदलयुक्त भागाने वेढलेले एक बेट होते. इ.स. ७८५ मध्ये प्रथम मिशनरी लोकांनी येथे वस्ती केली. नंतर एडवर्ड द कन्फेसरने (१०४२–६६) येथे एक नॉर्मन चर्च बांधले. तेच पुढे ‘वेस्टमिन्स्टर ॲबी’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्याने येथे एक राजवाडाही बांधला, तो ‘वेस्टमिन्स्टर पॅलेस’ म्हणून ओळखला जाते. इ. स. १५४० मध्ये आठव्या हेनरीने येथे बिशपचे पीठ स्थापन केले, तेव्हाच याला शहराचा दर्जा मिळाला.
भव्य ऐतिहासिक वास्तू, आधुनिक आकर्षक इमारती व सुंदर रस्ते हे वेस्टमिन्स्टरचे वैशिष्ट्य आहे. राजघराण्याची वास्तू असलेला बकिंगहॅम व सेंट जेम्स हे भव्य ऐतिहासिक राजवाडे, वेस्टमिन्स्टर ॲबी, तांबड्या वालुकाश्मातील वेस्टमिन्स्टर कॅथीड्रल (१८९५–१९०३), सेंट मार्टिन्स-इन-द-फील्ड्स व सेंय मार्गारेट ही ऐतिहासिक चर्चे, नॅशनल आर्ट गॅलरी, आधुनिक चित्रकलेतील दुर्मिळ कलाकृती असलेले टेड संग्रहालय, राष्ट्रीय व्यक्तिचित्र संग्रहालय, मादाम टुसो वॅक्स म्यूझीयम, लंडन खगोलालय, ट्रफॅल्गर स्क्वेअर, रॉयल कोर्ट्स ऑफ जस्टिस, रॉयल ॲल्बर्ट हॉल, पंतप्रधानांचे निवासस्थान (टेन डाउनिंग स्ट्रीट), इनिगो जोन्सचे ‘द बॅंक्विटिंग हाउस’ आणि व्हाइट हॉल या इमारती, हॉर्स गार्ड्स, ब्रिटिश संसदेची सभागृहे, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचे (बी. बी. सी.) मुख्य केंद्र या सर्वांमुळे वेस्टमिन्स्टर हे महत्त्वाचे राजकीय-सांस्कृतिक केंद्रही बनले आहे. शहरातील वेस्टमिन्स्टर ब्रिज प्रसिद्ध आहे. चौदाव्या शतकातील वेस्टमिन्स्टर पब्लिक स्कूल आजही विख्यात आहे.
येथील वेस्टमिन्स्टर पॅलेस हा अनेक इमारतींचा समूह असून त्याच्या तीन हेक्टर परिसरात हाउसेस ऑफ पार्लमेंट, सेंट स्टीफन्स हॉल व वेस्टमिन्स्टर हॉल ही व इतर अनेक शासकीय कार्यालये आहेत. या पॅलेसवर व्हिक्टोरिया टॉवर व क्लॉक टॉवर असे दोन उंच मनोरे आहेत. क्लॉक टॉवरवर जगप्रसिद्ध ‘बिग बेन’ हे घड्याळ आहे. १८३४ मध्ये सेंट स्टीफन व वेस्टमिन्स्टर हॉल वगळता मूळ गॉथिक शैलीतील वेस्टमिन्स्टर पॅलेसचा इतर सर्व परिसर अग्निप्रलयात भस्मसात झाला. सर चार्ल्स बॅरी या वास्तुशास्त्रज्ञाने ऑगस्टस पगीन या वास्तुविशारदाच्या साहाय्याने या गॉथिक तसेच ट्यूडर शैलीतील वास्तूंची पुनर्बांधणी केली.
‘वेस्टमिन्स्टर ॲबी’ (अधिकृत नाव `कॉलिजिएट चर्च ऑफ सेंट पीटर’) हे जगप्रसिद्ध चर्च इंग्लंडमधील एक देखणे चर्च आहे. हे अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. विल्यम द कॉंकरर पासून (पाचवा आणि आठवा एडवर्ड वगळता) इंग्लंडच्या सर्व सत्ताधारी राजांचे येथेच राज्याभिषेक साजरे करण्यात आले. या ॲबीतील सातव्या हेनरीच्या चॅपेलमधील दफनभूमी ही शाही दफनभूमी म्हणून ओळखली जाते. राजकीय व्यक्तींसाठी ॲबीच्या दुसर्याय भागात दफनभूमी आहे. इंग्लंडच्या अनेक मान्यवर कवींचे येथील ‘पोएट्स कॉर्नर’ मध्ये दफन करण्यात आले आहे.
चौधरी, वसंत
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..