वेस्टफेलिया : जर्मनीच्या वायव्य भागातील एक प्रदेश व पूर्वीच्या प्रशियामधील एक प्रांत. क्षेत्रफळ २०,२१५ चौ. किमी. याच्या पश्चिमेस व दक्षिणेस नॉर्थ र्हा ईनलॅंड, उत्तरेस व पूर्वेस लोअर सॅक्सनी प्रांत व दक्षिणेस हेस-नॅसाऊ प्रदेश आहे. पश्चिमेस जर्मनी-नेदर्लंड्स यांदरम्यानची सरहद्द आहे. राजकीय दृष्ट्या वेस्टफेलिया प्रदेश म्यून्स्टर, मिंडन व ऑइनब्रुक अशा तीन प्रशासकीय प्रदेशांत विभागला आहे. र्हांईन व वेझर नद्यांच्या मध्ये असलेल्या या प्रदेशाचा आकार अनियमित स्वरूपाचा असून त्याचा दक्षिण व पूर्व भाग पर्वतीय, तर उत्तर व पश्चिम भाग सपाट मैदानी स्वरूपाचा आहे. याचा बहुतांश भाग उत्तर जर्मन मैदानाचा विस्तारित प्रदेश आहे. याच्या उत्तर भागाचे एम्स नदीने, तर दक्षिण भागाचे लिप नदीने जलवाहन केले आहे. त्याशिवाय ऱ्हाईन, रुर, लीन, एडर व वेझर या नद्याही या प्रदेशाचे जलवाहन करतात. रुर, लीन व मरन या नद्यांनी जलवाहन केलेल्या पाटीच्या (स्लेटच्या) दगडाच्या टेकड्या व खोल दऱ्यांजच्या झाउअरलॅंड प्रदेशास वेस्टफेलिया प्रदेश मिळालेला आहे. येथील रॉदर, ब्रिलॉनर व एब पर्वतरांगा हे र्हादईन व वेझर नद्यांचे प्रमुख जलविभाजक आहेत. वेस्टफेलिया प्रदेशाचे हवामान सौम्य असून उन्हाळ्यात कधीकधी जोराची पर्जन्यवृष्टी होते.
वेस्टफेलिया हा कृषिप्रधान प्रदेश असून बकव्हीट, बटाटे, साखरबीट, भुईमूग, द्विदल धान्ये, अंबाडी, राय, गहू, बार्ली, ओट इ. प्रमुख पिके येथे होतात. विस्तृत कुरणांमुळे गुरे, घोडे, मेंढ्या व डुकरे मोठ्या प्रमाणावर पाळली जातात. कोळसा, लोहखनिज, शिसे, सुरमा, तांबे, चांदी, पारा, संगमरवर, जस्त, बेसॉल्ट व पाटीचा दगड या खनिज पदार्थांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यांपैकी कोळसा-उत्पादन सर्वांत महत्त्वाचे असून वेस्टफेलियाच्या औद्योगिकीकरणाचा हा प्रमुख आधार आहे. येथून प्रतिवर्षी १०० द. ल. टन कोळसा, ४० द. ल. टन कोकिंग कोल, १४ द. ल. टन कच्चे लोखंड व सु. २० द. ल. टन पोलाद उत्पादन होते. बॅड ओएनहौझेन व बॅड लिपस्प्रिंगसारखे खनिजयुक्त व क्षारयुक्त पाण्याचे झरे व काही फवारे या प्रदेशात आढळतात. जर्मनीतील रूर हा समृद्ध औद्योगिक प्रदेश वेस्टफेलियामध्येच असून डॉर्टमुंड हे त्यातील औद्योगिक केंद्र आहे. लोहपोलाद उद्योग हॉर्टमुंड येथे केंद्रित झालेला आहे. लोखंड व पोलाद, काच, रसायने, पितळ व ब्रॉंझच्या वस्तू, कापड, कागद, ताग व तागाच्या वस्तुनिर्मितीचे कारखाने येथे आढळतात. ग्रामीण भागात ताग उद्योग मोठा असून बीलफेल्ट, हेर्फोर्ट, मिंडन ही त्याची प्रमुख केंद्रे आहेत. जर्मनीतील इतर ठिकाणांशी वेस्टफेलिया दोन मुख्य लोहमार्गांनी जोडल्यामुळे प्रांतातील विविध उत्पादने बाजारपेठांकडे पाठविणे सुलभ झाले आहे. याशिवाय डॉर्टमुंड-एम्स कालवा, एल्ब नदीला जोडलेला मिडलॅंड कालवा, रुर कालवा यांमधूनही मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. येथील कोळसा, खनिजे व धान्य ड्यूइसबुर्क येथून यूरोपच्या मोठ्या नदीबंदरांकडे पाठविले जाते.