वेस्ट पॉइंट : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे राखीव लष्करी क्षेत्र. न्यूयॉर्क राज्यातील ऑरेंज परगण्यात, हडसन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर हे वसले असून न्यूयॉर्कपासून ते उत्तरेस सु. ८० किमी. अंतरावर आहे. हडसन नदीतील कॉन्स्टिट्यूशन बेटासहित याचे क्षेत्रफळ सु. ६,००० हे. आहे. देशातील हे सर्वांत जुने लष्करी ठाणे आहे. हडसन उच्च भूमीवरील लष्करी दृष्टीने मोक्याचे स्थान म्हणून याचा २० जानेवारी १७७८ रोजी प्रथम ताबा घेण्यात आला. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धकाळात, १७७८- ७९ मध्ये येथे भक्कम तटबंदी उभारण्यात आली. हडसन नदीतून वर येणाऱ्या ब्रिटिश जहाजांना अटकाव करण्यासाठी वेस्ट पॉइंट येथे हडसन नदीवर अवजड लोखंडी साखळदंड लावण्यात आलेले होते. १७८० मध्ये हा तळ ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्याचा कट, मुख्याधिकारी बेनेडिक्ट आर्नल्ड याने केला होता परंतु मेजर जॉन आंद्रे याच्या अटकेमुळे तो उघडकीस आला. १८०२ मध्ये येथे सैनिकी अकादमी स्थापन झाली.