वेल्स : युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दर्न आयर्लंड या देशाचा एक विभाग. क्षेत्रफळ २०,७६८ चौ. किमी. दक्षिणोत्तर कमाल अंतर २२० किमी. आणि पूर्व – पश्चिम १८७ किमी. लोकसंख्या २९,३३,३०० (१९९७). ग्रेट ब्रिटन बेटाच्या पश्चिम किनाऱ्या वरील विस्तृत द्वीपकल्पीय प्रदेश वेल्सने व्यापलेला आहे. बेटाच्या एकूण क्षेत्रफळापैकी १०% क्षेत्र या विभागाने व्यापले आहे. वेल्सच्या उत्तर, पश्चिम व दक्षिण अशा तिन्ही बाजूंना समुद्राची नैसर्गिक सीमा लाभलेली असून किनाऱ्याची एकूण लांबी ९८८ किमी. आहे. वेल्सच्या उत्तरेस आयरिश समुद्र व लिव्हरपूल उपसागर, पश्चिमेस सेंट जॉर्जची खाडी, कार्डिगन उपसागर व दक्षिणेस ब्रिस्टलची खाडी तसेच पूर्वेस इंग्लंडची भूमी आहे. अँगलसी हे या विभागाचे सर्वांत मोठे बेट याच्या वायव्येस असून मेनाई सामुद्रधुनीमुळे ते मुख्य भूमीपासून अलग झालेले आहे. कार्डिफ (लोकसंख्या ३,२४,००० – १९९९) हे वेल्सच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या वेल्सची विभागणी पर्वतीय प्रदेश, मूरलॅंड्‌स (मध्यवेल्स) व सखल प्रदेश अशा तीन भागांत केली जाते. वेल्सचा सु. दोन तृतीयांश प्रदेश पर्वतराजीने व्यापलेला आहे. वायव्येस स्नोडीनीया तर दक्षिणेस ब्रेकन बीकन्स हे पर्वतीय प्रदेश आहेत. वायव्य व उत्तर वेल्स यांमधील सरासरी ६०० मी. पेक्षा अधिक उंचीचे पर्वतीय प्रदेश तीव्र उताराचे व ओबडधोबड आहेत. त्यांतून खोल दऱ्यांसची निर्मिती झालेली आढळते. स्नोडन (उंची १,०८५ मी.) हे इंग्लंड व वेल्समधील सर्वोच्च शिखर वायव्य वेल्समधील स्नोडोनीया श्रेणीत आहे. पठारी व टेकड्यांनी युक्त मूरलॅंड्‌स प्रदेश १८० ते ६०० मी. उंचीचा आहे. मध्य व दक्षिण वेल्समध्ये कॅंब्रियन श्रेणी बरीच सपाट बनली असून तेथे तिचे रूपांतर पठारामध्ये झालेले दिसते. या पठारावर नद्यांच्या खननकाऱ्यामुळे खोल दऱ्यांची निर्मिती झाली आहे. तसेच त्यावर गवताळ कुरणे व दलदलयुक्त प्रदेश आढळतात. येथील पर्वतप्रदेशात अनेक लहानलहान सरोवरे व धबधबे आढळतात.

वेल्स

किनारी मैदाने व नदीखोऱ्यांनी या विभागाची सु. एक तृतीयांश भूमी व्यापलेली आहे. दक्षिण व पश्चिम किनाऱ्यावर सखल व अरुंद मैदाने आढळतात. विस्तृत मैदाने डी. सेव्हर्न व वाय या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांच्या खोऱ्यांत आहेत.

वेल्सचे उत्तर वेल्स, मध्य वेल्स व दक्षिण वेल्स असे तीन भौगोलिक विभाग पडतात. उत्तर वेल्समध्ये ग्विएद, क्लूड व उत्तर पोअस परगण्यांचा समावेश होतो. मध्य वेल्समध्ये डिव्हड परगण्याच्या दक्षिणेस ताइव्ही नदीपर्यंतच्या भागाचा व दक्षिण पोअस परगण्याचा समावेश होतो, तर दक्षिण वेल्समध्ये दक्षिण डिव्हड, पश्चिम, मध्य व दक्षिण ग्लॅमर्गन व ग्वेंट या परगण्यांचा समावेश होतो.

सेव्हर्न (लांबी ३५४ किमी.) व वाय (२०९ किमी.) या वेल्समधील दोन मोठ्या नद्या आहेत. दोन्हींचा उगम कॅंब्रियन पर्वतरांगांच्या पूर्वेकडील प्रदेशात होत असून त्या पूर्वेकडे, इंग्लंडमध्ये वाहत जातात. त्यानंतर त्या दक्षिणवाहिनी होऊन ब्रिस्टल चॅनेलला जाऊन मिळतात. डी ही नदी बाल सरोवरापासून ईशान्येस वाहत जाऊन आयरिश समुद्राला मिळते. ही नदी वेल्स व इंग्लंड यांच्या सरहद्दीवरून काही अंतर वाहत जाते. अस्क ही नदी मन्मथशरमधून वाहत जाऊन ब्रिस्टलच्या खाडीला मिळते. टाउई, ताईव्ही, टॅफ, डव्ही व कॉन्वे या आयरिश समुद्राला मिळणाऱ्या नद्या पूर्णपणे वेल्समधून वाहतात. मेरिऑनद परगण्यातील बाल हे सर्वांत मोठे नैसर्गिक सरोवर आहे. व्हर्नूई हा कृत्रिम जलाशय असून त्यामधून लिव्हरपूल शहराला पारीपुरवठा होतो. मूरलॅंड्‌स प्रदेशात असणाऱ्या एलान व क्लेअरवेन या खोऱ्यांतील जलाशयांमधून बर्मिंगहॅमला पाणीपुरवठा होतो. वेल्सचा किनारा बराचसा अनियमित स्वरूपाचा असून अनेक ठिकाणी समुद्रकड्यांची निर्मिती झालेली आढळते. किनाऱ्यावर अनेक उपसागर व नैसर्गिक बंदरे आहेत.

हवामान : वेल्सचे हवामान सौम्य, सागरी व दमट स्वरूपाचे आहे. अटलांटिक महासागरावरून वाहत येणाऱ्या पश्चिमी वार्‍यांपासून वेल्सला, मुख्यत: ग्विनएद पर्वतीय प्रदेशाला, मोठ्या प्रमाणावर पाऊस मिळतो. तो काही वेळा ५०० सेंमी. पेक्षाही अधिक पडतो. देशातील उच्चभूमीच्या प्रदेशात २५० सेंमी. पावसाची सरासरी आढळते. पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते. नद्यांची खोली व सखल किनारी मैदानात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८० ते १३० सेंमी. च्या दरम्यान असते. वेल्समधील जानेवारीचे तापमान ५० से. तर जुलैचे तापमान १६० से. आढळते. उच्चभूमीच्या प्रदेशातील जमीन अल्मधर्मीय असून तेथे विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. किनाऱ्यावर समुद्रपक्षी मोठ्या संख्येने पहावयास मिळतात.

इतिहास : सुमारे २,५०,००० वर्षांपूर्वी येथे आदिमानव रहात असावा. त्यानंतर मात्र येथील हवामान बरेच थंड बनल्यामुळे पुढील हजारो वर्षे येथे मानवी वस्ती नसावी. डिव्हड परगण्यातील लार्न व कॉयगन येथील गुहांमध्ये सापडलेल्या अवशेषांवरून ख्रिस्तपूर्व १,२५,००० ते ७०,००० यांदरम्यान येथे पुन्हा मानवी वस्ती झाली असावी, असे तज्ञांचे मत आहे. ख्रिस्तपूर्व ७०,००० मध्ये ब्रिटनमध्ये हिमयुग सुरू झाले. त्यामुळे वेल्सचा बहुतांश भाग हिमाच्छादनाखाली गेला. त्यानंतर काही काळ निअँडरथल मानवाची येथे वस्ती असावी असे येथील काही गुहा व त्यांमधील अवशेषांवरून दिसून येते.

पूर्वपुराणाश्मयुगात येथे दगडांची उपकरणे वापरणाऱ्या व गुहेत राहणाऱ्या लोकांची वस्ती असावी. उत्तर पुराणाश्मयुगात चांगल्या प्रतीची उपकरणे वापरात आली असावीत. या काळात मानव शिकारीवर जगत होता. हत्ती (मॅमथ), रेनडिअर व केसाळ र्हातयनोसेरॉस या प्राण्यांची संख्या त्याकाळी येथे खूप होती. पश्चिम ग्लॅमरगनमधील गाउअर किनाऱ्यावरील पॅव्हीलॅंड गुहा हे त्या काळातील मानववस्तीचे प्रमुख स्थान होते. इ. स. १८२३ मध्ये या गुहेत सापडलेला एक हाडांचा सांगाडा तज्ञांच्या मते इ. स. पू. २४,००० मधील २५ वर्षे वयाच्या मानवाचा असावा.

इ. स. पू. सु. १०,००० वर्षांपूर्वी येथील बर्फ वितळू लागले. त्यामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढली. ब्रिटन हे बेट म्हणून अस्तित्वात आले. जसजसे तापमान वाढत गेले, तसतसे दाट वनस्पती व गवताळ प्रदेशांचे आच्छादन वाढले. मानवाने हळूहळू गुहेत राहणे बंद करून, जंगलांचे भाग साफ करून तेथे राहण्यास सुरुवात केली. कुत्री पाळून त्यांचा उपयोग लोकांच्या संरक्षणासाठी व छोट्या प्राण्यांच्या शिकारीसाठी करण्यात येऊ लागला. मासे पकडण्यासाठी होड्यांचाही वापर होऊ लागला. हा मध्य अश्मयुग काळ (इ.स.पू. ८,५०० ते ४,५००) म्हणून ओळखला जातो.

इ. इ. पू. सु. ४,००० च्या दरम्यान ब्रिटन व यूरोप खंडाच्या अन्य भागांतून अधिक प्रगत लोक या भागात येऊ लागले. हे लोक शेती करणारे तसेच दगडांची अवजारे वापरणारे होते. त्यांच्या आगमनामुळे नवाश्मयुग काळात वेल्सच्या इतिहासाला एक नवीन दिशा मिळाली. हे शेतकरी वेल्सच्या पश्चिम किनाऱ्यावर आले असावेत. हे लोक मातीची घरे (क्रॉमलेक) बंधीत. वेल्समधील अशी क्रॉमलेक अँगलसी, दक्षिण डिव्हड, गाउअर व व्हॅली ऑफ ग्लॅमरगन येथे आढळतात. निओलिथिक वेल्श शेतकरी गारगोटीच्या कुर्हाकडींनी झाडे तोडून जमीन शेतीखाली आणीत. गहू पिकवीत व त्याची कापणी गारगोटीच्या हत्यारानेच करीत. तसेच ते गुरे, शेळ्या, मेंढ्या व डुकरे पाळीत.

ख्रिस्तपूर्व २,५०० मध्ये येथे धातूच्या वस्तू अस्तित्वात असाव्यात असे मानले जाते. त्यांच्या निर्मितीत तांब्याचा वापर केला जात असे. परंतु नंतर तांबे व कथिल मिश्रित ब्रॉंझ धातूच्या वस्तूंचा वापर होऊ लागला. या काळात येथे खूप वस्ती असल्याचे आढळते. नवाश्मयुग काळाच्या उत्तराधर्शत व ब्रॉंझयुगाच्या पूर्वार्धात उत्तर यूरोपमधून एक आणि आयबेरीय द्वीपकल्पामधून दुसरा असे किमान दोन गटांचे लोक ब्रिटनमध्ये आले असावेत. या दोन्ही गटांत मृतदेह पुरले जात असत. प्रेते पुरण्याच्या जागी पुरातत्त्ववेत्त्यांना पेले किंवा बीकर (मोठे पेले) आढळले. त्यामुळे या लोकांना बीकर म्हणूनच ओळखले जाते. त्यांनी तांब्याचे तंत्र वेल्स व उर्वरित ब्रिटनमध्ये आणले, असे मानले जाते. हे लोक शूर होते.

ब्रॉंझयुगाच्या उत्तरार्धात (इ. स. पू. सु. १,४०० ते ६००) झालेल्या हवामानातील बदलामुळे लोकांनी आपल्या वस्त्या उंचवट्याच्या भागाकडून सखल भागाकडे हलविल्या. याच काळात धातुकामाचे प्रमाण वाढले. वेल्समधील पहिल्या डोंगरी किल्ल्याची निर्मिती याच काळात झाली. पहिली मानवनिर्मित लोखंडी तलवार दक्षिण वेल्समधील लिन फावर येथे आढळली आहे. तिची निर्मिती इ. स. पू. सु. ६०० च्या दरम्यान केलेली असावी. तत्कालीन इतरही अनेक लोखंडी वस्तू वेल्समध्ये आढळून आल्या आहेत. पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते या वैशिष्ट्यपूर्ण लोखंडी वस्तूंची निर्मिती केल्ट लोकांनी केलेली असावी. लिन सेरिंग बाक व इतर ठिकाणी सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष तसेच स्ट्रेबो, डायडोरस सिक्यलस, टॅसिटस यांच्या लेखनकाऱ्यातून इंग्लंड व वेल्सविषयीची आलेली वर्णने यांवरून येथे राहणारे किंवा किमान येथील सत्ताधारी केल्टिक भाषा बोलत होते. येथील केल्टिक संस्कृती प्रभावशाली होती, असे दिसते. इ. स. पू. सु. ६०० ते ख्रिस्तकाळपर्यंत केल्ट लोकांनी ब्रिटनमध्ये स्थलांतर केले असल्याचे अनेक तज्ञ मानतात परंतु काहींच्या मते बीकर लोक साधारण केल्ट प्रकारची भाषा बोलत होते. केल्टिक समाज वैभवशाली होता व त्यांचे लढवय्ये व ड्रुइड (धर्मोपदेशक) केल्ट असे दोन गट होते. इ. स. पू. ५० मध्ये वेल्सच्या आग्नेय भागात सिल्यरीझ, नैर्ऋत्य भागात डेमेटी, वायव्य भागात ऑर्डव्हिसी व ईशान्य भागात डेकनग्ली लोकांची, तर मध्य भागात कॉर्नोव्ही लोकांची वस्ती होती.

इ. स. ८४ मध्ये वेल्सवर रोमन साम्राज्य प्रस्थापित झाले. इ. स. १२० पर्यंत बहुतांश वेल्स लोकांनी रोमन सत्तेला मान्यता दिली. मात्र सिल्यरीझांनी स्वयंशासनाचा अधिकार मिळविला व कार्वेट ही त्यांची प्रांतिक राजधानी बनली. डेमेटींच्या कर्मार्दन प्रदेशालाही हाच दर्जा मिळाला. रोमनांनी वेल्समध्ये काही औद्योगिक केंद्रांची निर्मिती केली. रोमन धर्तीवर अनेक व्हिलांची (बंगल्याची) येथे निर्मिती केली. लॅटिन ही साम्राज्याची अधिकृत भाषा केली. परंतु येथील लोक ब्रायथॉनिक ही केल्टिक प्रकारची भाषा बोलत. साधारण इ. स. २१२ नंतर वेल्समधील उच्चवर्गीय लोक स्वत:ला रोमन समजत असत. इ. स. ३१३ नंतर वेल्समधील बहुतांश लोक ख्रिश्चन बनले. इ. स. ४२० मध्ये येथील रोमन सत्ता संतुष्टात आली.

रोमन सत्ता संपुष्टात आल्यानंतर वेल्सची विभागणी अनेक लहान लहान राज्यांत झाली परंतु त्यांची आपापसांत सतत भांडणे चालू होती. नंतरच्या काही शतकांत अनेक राज्यकर्त्यांनी ही राज्ये एका सत्तेखाली आणण्याचा प्रयत्न केला. काळाच्या ओघात फक्त चारच प्रमुख राज्ये विकसित झाली. वायव्य भागातील ग्विनएद, मध्य भागातील पोअस, नैर्ऋत्य भागातील डेहुबर्थ व आग्नेय भागातील मॉर्गनवग ही ती प्रमुख व स्वायत्त राज्ये होत. हवेलने पहिल्यांदा संपूर्ण वेल्ससाठी समान कायदा अंमलात आणला. अलीकडील वेल्श कायदा तेराव्या शतकापासून अंमलात आला असला, तरी त्या कायद्यातील बरीचशी कलमे हवेलच्या कायद्यामधूनच घेतलेली आढळतात.

अकराव्या शतकात नॉर्मनांनी इंग्लंडवर आपले स्वामित्व प्रस्थापित केल्यानंतर वेल्समध्येही आपले पाय रोवले. तेराव्या शतकात लवेलिन दी ग्रेट व लवेलिन दी लास्ट यांनी नॉर्मनांना तीव्र प्रतिकार करून वेल्समध्ये लष्करी अंमल प्रस्थापित केला. इंग्लंडच्या पहिल्या एडवर्ड राजाने १२६७ मध्ये लवेलिन दी लास्टला वेल्सचा पहिला राजा बनविले परंतु १२८२ मध्ये लवेलिनचे राजेपद संपुष्टात आल्यानंतर एडवर्डने बहुतांश वेल्स प्रदेश इंग्लंडचा मांडलिक प्रांत बनविला आणि आपल्या मुलाला वेल्सच्या राजेपदी बसविले. काही वेल्श लोकांनी याला मान्यता दिली परंतु बरेचसे याबाबतीत नाखूष होते. त्यातच आर्थिक व सामाजिक प्रश्न उग्र बनले. त्यामुळे इंग्लिश सत्तेला तीव्र विरोध होत राहिला. पंधराव्या शतकाच्या पहिल्या दशकात तर अतिशय तीव्र विरोध करण्यात आला, पर तो अयशस्वी ठरला. गुलाबांच्या युद्धात वेल्सने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. राजकीयदृष्ट्या १५३६ व १५४३ च्या कायद्यानुसार वेल्स इंग्लंडच्या सत्तेखाली आला. त्यानंतरच्या काही शतकांत वेल्श लोकांनी आपल्या स्थानिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आठव्या हेन्सीच्या कारकीर्दीत वेल्स हे सार्वभौम राज्य करण्यात येऊन तेथे बरेचसे इंग्लिश कायदे स्वीकारण्यात आले. वेल्सची तेरा परगण्यांमध्ये विभागणी करण्यात येऊन त्यांना संसदीय प्रतिनिधित्व देण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्रीय व स्थानिक शासनात तसेच व्यापार व सामाजिक जीवनातही योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात आले. वेल्श लोकांना इंग्लिश लोकांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त झाले.

इ. स. १५८८ मध्ये बायबलचे वेल्शमध्ये भाषांतर झाले. तेव्हापासून प्रॉटेस्टंट पंथीयांचे वर्चस्व वेल्समध्ये अधिक वाढले. इंग्लिश यादवी युद्धात प्युरिटनांना वेल्समध्ये विशेष जोर धरता आला नाही. १७३० नंतर वेल्श मेथडिस्ट चळवळ सुरू झाली. परंतु तिचे इंग्लिश मेथडिस्ट चळवळीशी घनिष्ठ संबंध होते. या चळवळीचा तसेच एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम आधुनिक वेल्सच्या उभारणीवर झालेला दिसून येतो. १८११ मध्ये कॅल्व्हिनिस्टीक मेथडिस्ट लोकांनी इंग्लंडच्या चर्चशी असलेले संबंध तोडले. १८५१ साली चर्चमध्ये जाणाऱ्यांपैकी ७६ टक्के लोक प्रॉटेस्टंट पंथीय होते.

वेल्समध्ये औद्योगिक क्रांतीचा विकास प्रामुख्याने १८४० नंतर झाला. औद्योगिक क्रांतीमुळे उत्तर वेल्समध्ये तांबे, लोह व पाटीचा दगड (स्लेट) उत्पादनउद्योग सुरू झाले. परंतु या काळात मुख्य विकास झाला, तो दक्षिण वेल्समध्ये. कोळसा-खाणकाम हा महत्त्वाचा व्यवसाय बनला. कोळशाची निर्यातही होऊ लागली. १८७५ मध्ये जस्ताचा मुलामा केलेला लोखंडी पत्रा तयार करण्याचे ब्रिटनमधील सर्वाधिक उद्योग दक्षिण वेल्समध्ये होते. तसेच त्याचे जगातील सर्वाधिक उत्पादन येथेच होत असे. औद्योगिकीकरणामुळे दक्षिण वेल्समधील लोकसंख्याही वेगाने वाढत गेली.

ग्रामीण भागात सर्वसामान्य नॉनकन्फॉर्मिस्ट व जमीनदार वर्ग यांच्यात तणावपूर्ण वातावरण होते. नॉनकन्फॉर्मिस्टांची लिबरल पार्टीशी जवळीक होती. १९०० मध्ये लिबरल पार्टीचे संस्थापक केअर हार्डी दक्षिणेकडील बरोमधून पार्लमेंटमध्ये निवडून गेले. १९१६ मध्ये वेल्श लिबरल पार्टीचे डेव्हीड लॉइड जॉर्ज हे पंतप्रधान बनले. दक्षिण वेल्समधील कामगार वर्गाने लेबर पार्टीला पाठिंबा देण्यास सुरुवात केली. दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात उद्योगधंद्यांत आलेली प्रचंड मंदी व बेकारीचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, यांमुळे लेबर पार्टीला मोठा पाठिंबा मिळाला. १९२२ ते १९३२ या काळात सु. २.४ लाख लोकांनी दक्षिण वेल्समधून दुसरीकडे स्थलांतर केले. तत्पूर्वी १९२५ मध्ये वेल्श नॅशनॅलिस्ट पार्टीची स्थापना झाली. परंतु १९६० च्या दशकापर्यंत संसदीय (पार्लमेंटरी) निवडणुकीत त्यांचे प्रतिनिधी यशस्वी होऊ शकले नाहीत.

कार्डिफ ही १९५५ मध्ये वेल्सची अधिकृत राजधानी करण्यात आली. १९६४ मध्ये कॅबिनेट दर्जाच्या वेल्श मंत्र्याची नेमणूक करण्यात आली. वेल्सने लेबर पार्टीला असलेला पाठिंबा तसाच कायम ठेवला. १९७२ च्या ब्रिटिश लोकल गव्हर्नमेंट ॲक्टनुसार वेल्सच्या तेरा काउंटी विसर्जित करून त्यांऐवजी नवीन आठ काउंटी निर्माण करण्यात आल्या. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिल १९७४ मध्ये झाली. क्ल्यूड, डिव्हड, ग्वेंट, ग्विनएद, पोअस, मिड ग्लॅमरगन, साउथ ग्लॅमसान व वेस्ट ग्लॅमरगन ह्या त्या आठ काउंटी होत. अलीकडच्या काळात वेल्श संस्कृतीचे जतन करण्यात लोकांनी बराच रस घेतलेला दिसतो. वेल्स ॲक्टखाली कार्डिफ येथे निर्वाचित सदस्यांची संसद स्थापन करण्यासंबंधी जनमत १९७९ साली घेण्यात आले. परंतु त्यामध्ये ४० टक्क्यांपैक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने त्या कायद्याची तरतूद रद्द झाली.

कॅबिनेट स्तराच्या मंत्र्याद्वारे वेल्सचा कारभार चालवला जातो. याला `सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर वेल्स’ असे म्हणतात. याचे मुख्य कार्यालय कार्डिफ येथे आहे. वेल्स डेव्हलप्‌मेंट एजन्सी आणि डेव्हलप्‌मेंट बोर्ड फॉर रूरल वेल्स या सेक्रेटरी ऑफ स्टेटच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या संघटनाही वेल्सच्या कारभारासाठी महत्त्वाचे योगदान करतात.


आर्थिक स्थिती : सतराव्या शतकापूर्वी हा कृषिप्रधान देश होता. औद्योगिक क्रांतीच्या काळात खाणकाम व धातुप्रक्रिया उद्योग महत्त्वाचे बनले. आज कारखानदारी व सेवा व्यवसायांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.

वेल्समध्ये किनारपट्टीची मैदाने व अंतर्गत पर्वतीय प्रदेशातील नद्यांच्या खोऱ्यांत प्रमुख कृषिक्षेत्र आहे. व्हॅली ऑफ ग्लॅमरगन प्रदेश त्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. येथील शेती प्रामख्याने मिश्र स्वरूपाची आहे. पशुपालन हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकरी सखल प्रदेशात मांसोत्पादक व दुग्धोत्पादक गुरे पाळतात तर पर्वतीय प्रदेशात मेंढ्या पाळतात. मूरलॅंड्‌स भागातील गवताळ प्रदेशात मेंढपाळी अधिक चालते. त्यांपासून मांस व लोकर उत्पादन होते. लोकरउद्योग हा एकेकाळचा येथील प्रमुख उद्योग होता. अन्नधान्याच्या बाबतीत प्रदेश स्वयंपूर्ण नसल्यामुळे त्यासाठी आयातीवर अवलंबून रहावे लागते. गहू, बार्ली, ओट, बटाटे ही येथील प्रमुख पिके आहेत. प्राण्यांसाठी ओट, गवत, स्वीड व टर्निप इ. पिकविले जाते.

नैसर्गिक साधनसंपत्ती : दगडी कोळसा ही येथील महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. टिवी व उस्क नद्यांदरम्यानच्या दक्षिण वेल्स भागात विस्तृत कोळसासाठे आहेत. ईशान्य वेल्समध्ये कोळशाची लहान क्षेत्रे आहेत. दक्षिण वेल्समध्ये चुनखडीच्या खाणी आहेत. वायव्य वेल्स स्लेटच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. उत्तर व मध्य वेल्समध्ये शिसे, जस्त व सोन्याचे साठे आहेत. देशात जलसंपदा विपुल आहे परंतु तिचा हवा तेवढा उपयोग केलेला दिसत नाही. नद्यांवर बांधलेल्या धरणांमुळे मोठमोठ्या जलाशयांची निर्मिती झालेली आहे. काही प्रमाणात जलविद्युत्‌निर्मिती केली जाते. जलाशयांमधील बरेचसे पाणी नळमार्गाने इंग्लंडमधील मोठमोठ्या शहरांकडे नेले आहे.

दक्षिण वेल्समध्ये १९१४ पर्यंत कोळसा खाणकाम व्यवसाय विशेष भरभराटीत होता. परंतु हळूहळू आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या खाणी बंद करण्यात आल्या. ब्रिटनचे अँथ्रासाइटचे बहुतांश उत्पादन वेल्समधून घेतले जाते. १९९० च्या सुमारास फक्त पाच कोळसा खाणींतून उत्पादन घेतले जात होते व त्यांत सु. २,६०० खाणकामगार गुंतलेले होते. पूर्वी उत्तर वेल्समध्ये पाटीच्या दगडाचे उत्पादन महत्त्वाचे होते मात्र ते कमी झालेले आहे.

उद्योगधंदे : वेल्समधील उद्योगधंदे मुख्यत: दक्षिणेकडील कोळसा क्षेत्राच्या सभोवताली विकसित झालेले आहेत. दक्षिण वेल्स हा युनायटेड किंग्डममधील प्रमुख पोलादउत्पादक प्रदेश आहे. न्यूपोर्टजवळील लानवेर्न, पोर्ट टॉल्‌बट, मार्गम व उत्तरेकडील शॉटन येथे प्रमुख पोलाद उद्योग आहेत. जस्ताचा मुलामा केलेल्या लोखंडी पत्र्याचा उत्पादन उद्योगही महत्त्वाचा आहे. लॅनेलीजवळील ट्रॉस्ट्रे येथील तसेच स्वान्झीजवळील कथिलाच्छादित पत्र्याचे उत्पादन महत्त्वाचे आहे. १८७५ मध्ये या पत्र्याच्या उत्पादनाचे ग्रेट ब्रिटनमध्ये एकूण ७७ कारखाने होते. त्यांपैकी एकट्या वेल्समध्ये ५७ कारखाने होते. परंतु १८९० मध्ये संयुक्त संस्थानांच्या शासनाने या पत्र्यावर लादलेल्या मॅकिन्‌ले जकातीमुळे या उद्योगाच्या विकासावर विपरीत परिणाम झाला. तसेच या उद्योगातील कुशल वेल्श कामगार मोठ्या संख्येने संयुक्त संस्थानांत गेले. तथापि या उत्पादनाला अर्जेंटिना, रशिया व अतिपूर्वेकडील देशांच्या बाजारपेठा उपलब्ध झाल्यामुळे हा उद्योग पूर्वस्थितीवर आला. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात कोळसा व पोलादाला मागणी वाढली, त्यामुळे वेल्सच्या औद्योगिक विकासाला गती आली. अलीकडे धातुउत्पादन उद्योगाचे महत्त्व कमी झालेले असून त्याची जागा आता हलक्या वस्तू, विशेषत: इलेक्ट्रॉनीय साहित्य, यांसारख्या उत्पादन उद्योगांनी घेतलेली आहे. रसायने, विद्युत्‌सामग्री, रेडिओ, मोटारींचे सुटे भाग, विमाने, प्लॅस्टिके व कृत्रिम तंतुउत्पादन उद्योग वेल्समध्ये चालतात. पोर्ट टॉल्‌बट, मिलफर्ड हेवन, न्यूपोर्ट, कार्डिफ, स्वान्झी व टेनबी ही वेल्समधील प्रमुख औद्योगिक शहरे आहेत. होलीहेड(अँगलसी) येथे एक ॲल्युमिनियम प्रकल्प आहे. सेवा व्यवसायांमध्ये ठोक व किरकोळ व्यापार, वित्तीय व पर्यटन सेवा महत्त्वाच्या आहेत.

  वाहतूक व संदेशवहन : प्रदेशाच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने रस्ते, लोहमार्ग व कालवावाहतूक महत्वाची ठरली आहे. इंग्लंडशी जोडलेल्या मार्गांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सेव्हर्न बोगद्यामुळे दक्षिण वेल्स व इंग्लंडमधील प्रवासाचे अंतर एका तासाने कमी झाले आहे. या बोगद्यातून पहिली रेल्वे ९ जानेवारी १८८६ रोजी गेली. कार्डिफ विमानतळावरून आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत हवाई वाहतूक केली जाते. कार्डिफ, स्वान्झी, होलीहेड, फिशगार्ड, मिलफर्ड हेवन, न्यूपोर्ट, बॅरी, पोर्ट टॉल्‌बट, लॅनेली ही महत्त्वाची बंदरे आहेत. मिलफर्ड हेवन येथे तेलवाहू जहाजांसाठी उत्तम खोल बंदराची बांधणी करण्यात आलेली आहे. मिलफर्ड हे वाद्धीकरणासाठी प्रसिद्ध आहे.

  वेल्समध्ये दूरचित्रवाणीच्या चार वाहिन्या असून त्यांपैकी चौथ्या वाहिनीवर वेल्श व इंग्लिश भाषांतून कार्यक्रम प्रसारित केले जातात.

लोक व समाजजीवन : सोळाव्या शतकापासून राजकीय दृष्ट्या वेल्स इंग्लंडशी संलग्न असला, तरी वेल्श लोकांनी आपले सांस्कृतिक वैशिष्ट्य कायम ठेवून त्याचा विकास केलेला आढळतो. वेल्समधील बहुतांश लोक स्वत:ला केल्ट वंशीय समजतात. परंतु वेल्समधील प्रमुख शहरांमध्ये भिन्नभिन्न वांशिक गटांची संमिश्र लोकसंख्या आढळते. वेल्सच्या दीर्घ इतिहासकाळात केल्टिक भाषिक लोक, रोमन, अँग्लो-सॅक्सन, व्हायकिंग, इंग्लिश लोक व इतर देशांमधील लोक येथे येऊन स्थायिक झालेले आहेत. वेल्सच्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशा आग्नेय व दक्षिण भागांत लोकसंख्येची घनता अधिक आहे. बऱ्याच आयरिश व स्पॅनिश लोकांनीही वेल्समध्ये स्थलांतर केलेले आढळते. वेल्समधील लोकांचे जीवनमान ब्रिटनमधील लोकांप्रमाणेच आहे. दक्षिण वेल्सच्या कोळसा खाणकाम प्रदेशात पायऱ्यापायऱ्यांच्या उतारावर लोक घरे बांधून राहिलेले आहेत. कार्डिफ, स्वान्झी (लोकसंख्या १९९७ – २, ३०,१००), न्यूपोर्ट (१,३७,३००) व र्हों डा (२,४१,३००) ही वेल्समधील प्रमुख शहरे आहेत.

केल्टिक धर्मगुरूंनी वेल्समध्ये चर्चची स्थापना केली. त्यामुळे येथे ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला. सेंट डेव्हिड हे त्यांपैकी एक प्रमुख धर्मगुरू होत. बहुतांश वेल्श लोक प्रॉटेस्टंट पंथीय आहेत. मेथडिस्ट चर्च हे वेल्समधील सर्वांत मोठे प्रॉटेस्टंट चर्च असून इतर ख्रिस्ती पंथांचीही चर्चे आहेत. पाच टक्के लोक रोमन कॅथलिक पंथीय आहेत. १५३६ मध्ये चर्च ऑफ इंग्लंड हे वेल्सचे अधिकृत चर्च बनले. १८११ मध्ये मेथडिस्ट चर्च हे चर्च ऑफ इंग्लंडपासून अलग करण्यात आले. १९१४ मधील वेल्श चर्च ॲक्टनुसार चर्च ऑफ इंग्लंड वेल्सचे अधिकृत चर्च नसल्याचे घोषित करण्यात आले.

भाषा व साहित्य : इंग्लिश व वेल्श या येथील दोन अधिकृत भाषा आहेत. १९८१ मध्ये येथील २० टक्क्यांपेक्षा कमी लोक वेल्श भाषक होते. हे प्रमाण वाढविण्यासाठी शिक्षण द्विभाषिक केलेले आहे. वेल्सला कवी व संगीतकारांचा देश म्हणून ओळखले जाते. वेल्श साहित्य व संगीताला सु. एक हजार वर्षांची परंपरा आहे. [→वेल्श भाषा – साहित्य].

शिक्षण : वेल्स व इंग्लंडमधील शालेय व्यवस्थश सारखीच आहे. ५ ते १६ वटोगटांतील सर्व मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. अकरा वर्षे वयापर्यंत मुले प्राथमिक शिक्षण घेतात. बहुतांश विद्यार्थी सोळाव्या वर्षी माध्यमिक शाळा सोडतात. त्यातील काही विद्यार्थी तांत्रिक महाविद्यालयात जातात, तर बाकीची मुले इतर शिक्षणाकडे वळतात. निवडक हुशार विद्यार्थी विद्यापीठात किंवा इतर उच्च शैक्षणिक संस्थेत दाखल होतात. युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स (स्थापना १८९३) हे येथील प्रमुख विद्यापीठ असून त्याची अनेक घटक महाविद्यालये व संस्था वेल्समधील निरनिराळ्या शहरांत आहेत. लॅपीटर येथील सेंट डेव्हिड्‌स कॉलेज, कार्डिफ येथील वेल्श नॅशनल स्कूल ऑफ मेडिसीन व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या ह्या विद्यापीठाच्या इतर शाखा आहेत. अँबरिस्टविथ येथे वेल्स राष्ट्रीय ग्रंथालय तर कार्डिफ येथे वेल्स राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय आहे.

कला व क्रीडा : वेल्समध्ये आजही कोरल चर्चमधील धार्मिक संगीतपरंपरा आढळते. आंतरराष्ट्रीय पातळीवर वेल्श गीते प्रसिद्ध आहेत. वेल्समध्ये जरी संगीतिका गृह (ऑपेरा हाउस) व राष्ट्रीय रंगमंदिर नसले, तरी तेथील वेल्श नॅशनल ऑपेरा कंपनी जगात प्रसिद्ध आहे. तसेच येथे वेल्श थीएटर कंपनी असून तिच्यात वेल्श व इंग्लिश असे दोन्ही भाषाविभाग आहेत. येथे अनेक आधुनिक चित्रपटगृहे आहेत. एम्लीन विल्यम्स व रिचर्ड बर्टन हे प्रसिद्ध सिनेकलावंत वेल्श आहेत. काही वेल्श नाटककार इंग्लिश रंगमंचावरही चमकलेले आहेत. वेल्स आर्ट्‌स कौन्सिल या शासकीय संस्थेकडून वेगवेगळ्या कलाकारांना उत्तेजन दिले जाते. ग्रेट ब्रिटन प्रमाणेच वेल्समध्येही `पब’ (पब्लिक हाउस) आढळतात.

इस्टेदव्हॉड हा वेल्समधील अतिशय लोकप्रिय असा परंपरागत स्वरूपाचा सार्वजनिक उत्सव आहे. यात संगीत, साहित्य, नाट्य व इतर कला क्षेत्रांतील लहानमोठे कलावंत मोठ्या संख्येने भाग घेतात. दरवर्षी ऑगस्टमध्ये एक आठवडाभर हा उत्सव चालतो.

“रग्बी’ हा वेल्सचा राष्ट्रीय खेळ आहे. असोसिएशन फुटबॉल किंवा सॉकर हा येथील दुसरा लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेट हा सुद्धा येथील महत्त्वाचा खेळ आहे.

पर्यटन : वेल्समधील सृष्टिसौंदर्य हे पर्यटकांचे आकर्षण ठरते. उत्तरेकडील रिल, लॅन्‌डिडनो, दक्षिणेकडील पोर्थकॉल, बॅरी,अँगलसीमधील बोमॅरस व पेंब्रोकशरमधील टेनबी ही काही उल्लेखनीय पर्यटनस्थळे. अँगलसी (प्राचीन मोना) हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे बेट असून स्कॉटिश अभियंता थॉमस टेलफर्ड याने १८२५ साली बांधलेल्या ३०० मी. लांबीच्या झुलत्या पुलाने ते मुख्य भूमीशी जोडले आहे. वेल्समधील ल्यीन द्वीपकल्पाच्या किनाऱ्यांवरील नगरे ही देखील पर्यटन केंद्रे आहेत. या द्वीपकल्पाच्या टोकाजवळ असलेले बार्डझी बेट संतांचे बेट म्हणून ओळखले जाते. येथे अनेक केल्टिक संतांची स्मारके आहेत. नैऋत्येकडील सेंट डेव्हिड्‌स भूशिरावरील सेंट डेव्हिड्‌स कॅथीड्रल हे ब्रिटिश बेटांमधील सर्वांत सुंदर चर्च आहे. स्नोडोनीया पर्वतश्रेण्या तसेच मूरलॅंड्‌स प्रदेशही सृष्टिसौंदऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. व्हॅली ऑफ ग्लॅमरगन प्रदेशाला तर `गार्डन ऑफ वेल्स’ असे संबोधले जाते. अनेक अवशिष्ट किल्ले म्हणजे पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. स्नोडोनीया, ब्रेकन बीकन्स, पेम्ब्रोकेशर कोस्ट ही वेल्समधील प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत.

चौधरी, वसंत