वेनजो : युंगजिया. चीनच्या आग्नेय भागातील एक व्यापारी शहर व नदीबंदर, लोकसंख्या ३,६५,६०० (१९८५ अंदाज). हे जजिआंग प्रांतात वू नदीच्या दक्षिण काठावर, शांघायच्या दक्षिणेस ३८६ किमी. वर वसलेले असून पूर्व चिनी समुद्रापासून १९ किमी. आत आहे. लाकूड व बांबू यांचे निर्यातकेंद्र तसेच आसमंतातील शेतमालाचे व्यापारकेंद्र म्हणून ते प्रसिद्ध आहे.
येथील मूळ वसाहत इ. स. चौथ्या शतकात झाली असावी. वसाहतीला `वेनजो’ हे नाव ६७५ साली देण्यात आले. हे बंदर १८७६ पासून परदेशी व्यापारासाठी खुले करण्यात आले, मात्र १९३७ पर्यंत व्यापारी बंदर म्हणून त्याचा फारसा विकास झाला नाही. दुसऱ्या महायुद्धकाळात १९४४-४५ मध्ये जपानने त्यावर ताबा मिळविला होता. परंतु १९४५ साली चीनने ते पुन्हा घेतले. १९४९ मध्ये शहरात नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. १९७० च्या दशकात प्रांताच्या दक्षिण भागातील निर्यातमाल एकत्र करण्याचे प्रमुख ठिकाण म्हणून वेनजोचे महत्त्व वाढले. एक हजार टनी सागरगामी बोटी वू नदीमुखखाडीतून या बंदरापर्यंत येऊ शकतात. येथून चहा, ताग, लाकूड, फरश्या, विटा, कागद इ. माल निर्यात होतो. शहरात भात, चहा, मांस, अन्नपदार्थ यांवरील प्रक्रिया, हस्तव्यवसाय, चट्या, कागदाच्या छत्र्या, दुग्धोत्पादने इ. व्यवसायांचा विकास झाला असून परकीय गुंतवणुकीच्या वाढीसाठी १९८४ मध्ये हे शहर `ओपन सिटी’ (व्यापारासाठी खुले शहर) म्हणून जाहीर करण्यात आले.
चौंडे, मा. ल.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..