वेदान्त : वेदान्त या शब्दाचा अर्थ दोन रीतींनी व्युत्पादिता येतो. ज्यात सर्व वेदांचा सारभूत निष्कर्ष सांगितलेला आहे, ते तत्त्वज्ञान हा एक अर्थ. दुसरा अधिक आणि ग्राह्य अर्थ असा, की वेदांच्या अंत्य भागी येणारी जी उपनिषदे त्यांत प्रतिपादलेले तत्त्वज्ञान. किंबहुना संस्कृतात वेदान्त हा शब्द बहुवचनात‘उपनिषदे’ या अर्थाने वापरला जातो. [→ आरण्यके व उपनिषदे].

उपनिषदांतील विविध वाक्यांची मीमांसा करून त्यांच्यात समन्वय घडवून आणणे आणि त्यांचे तात्पर्य सांगणे, या उद्दिष्टासाठी ⇨ब्रह्मसूत्रे  रचण्यात आली. त्यांच्या कर्त्याचे नाव व्यास अथवा बादरायण अथवा कृष्णद्वैपायन व्यास असे आहे. ब्रह्मसूत्रांना बादरायण सूत्रे, वेदान्तसूत्रे, उत्तर–मीमांसासूत्रे, शारीरक सूत्रे अशी अन्य नावेही आहेत. भगवद्‌गीता हा महाभारताचा भाग असला, तरी तिला वेदान्त संप्रदायात उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे यांच्या इतकीच मान्यता आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्‌गीता  या तीन ग्रंथांना मिळून वेदान्ताची प्रस्थानत्रयी म्हणतात. सारा वेदान्तविचार या प्रस्थानत्रयीवर आधारलेला आहे.

वेदान्तविचार ही एकरूप गोष्ट नाही. अनेक वेदान्तमते आहेत. त्यांतील काही परस्परविरोधीही आहेत. निरनिराळ्या आचार्यांनी आपापल्या मताच्या सिद्धीसाठी प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली. काही प्रमुख आचार्य व त्यांच्या वेदान्तमताची नावे पुढीलप्रमाणे आहेत : (१) शंकराचार्य (७८८-८२०), ⇨ केवलाद्वैतवाद (२) रामानुजाचार्य (१०१७- ११३७), ⇨विशिष्टाद्वैतवाद (३) मध्वाचार्य (सु. ११९९–सु. १२७८), ⇨ द्वैतवाद (४) निंबार्क व निंबार्काचार्य (तेरावे शतक), ⇨ द्वैताद्वैतवाद वा भेदाभेदवाद (५) वल्लभाचार्य (१४८१-१५३३), शुद्धाद्वैतवाद अथवा ⇨पुष्टिमार्ग.

यांशिवाय नीलकंठ शिवाचार्य, बलदेवाचार्य, श्रीकर पंडित यांची भाष्येही प्रसिद्ध आहेत.

प्रत्येक भाष्यकाराने मूळ ग्रंथाचा अर्थ निराळ्या निराळ्या तऱ्हेने लावलेला आहे. केवलाद्वैत वेदान्ताप्रमाणे एक जीव आणि दुसरा जीव ह्यांच्यात दिसणारा भेद खरा नाही. प्रत्येक जीव वास्तविक ब्रह्मच आहे. द्वैत वेदान्ताप्रमाणे एक जीव आणि दुसरा जीव यांच्यातील भेद तसेच प्रत्येक जीव आणि ब्रह्म यांच्यातील भेद वास्तव आणि नित्य आहे. विशिष्टाद्वैत मताप्रमाणे जीव आणि ईश्वर यांच्यातील संबंध विशेषण आणि विशेष्य यांच्यातील संबंधासारखा आहे. असे पराकाष्ठेचे फरक निरनिराळ्या वेदान्तमतांत असले, तरी पुढील बाबींवर त्यांचे एकमत आहे : (१) जगाचा आधार चेतन ब्रह्मतत्त्व आहे, जडतत्त्व विश्वाचा आधार नाही. (२) मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे, तो मिळाल्यावर आत्मस्वरूपात असलेल्या आनंदाची प्राप्ती होते. (३) मोक्ष नित्य आहे. (४) हे सिद्धान्त वेदांकडून (उपनिषदांकडून) समजतात. (५) वेद अपौरुषेय असून स्वतः प्रमाण आहेत. सर्वच ज्ञान स्वत: होऊन प्रमाण असते. ज्ञानाचे अप्रामाण्य मात्र बाहेरून येते म्हणजे मुख्यतः पुरुष – दोषांपासून येते. पण वेद अपौरुषेय असल्याने वेदांपासून मिळणाऱ्या ज्ञानाच्या बाबतीत अप्रामाण्य संभवत नाही.

दीक्षित, श्री. ह.