वेदनायकम्‌ पिळ्ळै : (११ ऑक्टोबर १८२६–२१ जुलै १८८९).प्रख्यात तमिळ साहित्यिक. कुलथूर येथे एका ख्रिस्ती कुटुंबात जन्म. पूर्ण नाव–सॅम्युएल वेदनायकम्‌ पिळ्ळै. लहानपणापासूनच त्यांना काव्यरचनेचा छंद होता. महाविद्वान मीनाक्षीसुंदरम्‌ पिळ्ळे (१८१५-७६) यांचे ते शिष्य होते. तमिळ व इंग्रजी भाषा- साहित्यांचे त्यांनी सखोल अध्ययन केले. जिल्हा न्यायालयात मुन्सफ म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. तमिळनाडूच्या काही भागांत दुष्काळाने थैमान घातले, तेव्हा गोरगरिबांना सामुदायिक रीत्या अन्नपुरवठा करण्याची योजना त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या या मानवतावादी कार्याचा गौरव करणारे काव्य सुब्रह्मण्यम्‌ देसिगार यांनी रचले. तमिळ गद्याच्या विकासासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. प्रताप मुदलियार चरित्रम्‌  ही तमिळमधील पहिली कादंबरी लिहून (१८७९) त्यांनी तमिळ कथनात्मक गद्यसाहित्याचा पाया घातला. या कादंबरीची रचना सैलसर व विस्कळित असून तीमध्ये प्रामुख्याने प्रताप मुदलियारच्या साहसयुक्त चरित्रकथनाच्या अनुषंगाने अनेक उपकथा, दंतकथा, बोधपर भाषणे यांची रेलचेल असून नैतिक मूल्यांचा प्रचार आहे. वास्तव आणि अद्‌भुत यांची तसेच गंभीर व विनोदी शैलीची सरमिसळ आहे. ही कादंबरी त्या काळात खूप गाजली. सुगुण सुंदरी  ही त्यांची दुसरी कादंबरी १८८८ मध्ये प्रकाशित झाली. सामाजिक सुधारणा, मुख्यत: स्त्री-शिक्षण व स्त्रियांची सामाजिक प्रतिष्ठा यांविषयीची त्यांची तीव्र आच त्यांच्या गद्यलेखनातून प्रभावी रीत्या व्यक्त झाली आहे. त्यांनी अनेक धार्मिक व नीतिपर गीते रचली. सर्व समय-समरस-किर्तनै (१८५८ सर्व धर्मांसाठी गीतसंग्रह) मध्ये संगृहीत झालेली त्यांची गीते मुख्यत: नीतिपर असली, तरी त्यांना अस्सल वाङ्‌मयीन दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांच्या अन्य ग्रंथांत देवमदार अंतदी (१८७३ ख्रिस्ती धर्मशास्त्र) सिद्धान्तसंग्रहम्‌ (१८८२ विधिविषयक नियमांचे भाषांतर) सत्यवेद किर्तनैगळ (१८८९ बायबलवर आधारित गीते) नीतिनुल (पद्यमय नीतिवचनांचा संग्रह) पेण्‌मतिमालै (१८९६ स्त्रियांसाठी नैतिक वचने) इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहेत.

वरदराजन्‌ एम्‌. (इं.) पोळ, मनीषा (म.)