वेत : (१) मुळासह खोड, (२) फळांसह फांदी व पान, (३) फुलोरा, (४) काटेरी प्रतोदाचा भाग (५) फळ, (६) प्रतोद.वेत : (हिं. बेत, वेतसा सं. वेत्र इं. केन, रॅटॅन लॅ. कॅलॅमस कुलपामी). हे नाव सामान्यपणे वनस्पतींच्या काही प्रजातींतील (वंशांतील) थोडया जातींना व त्यांच्यापासून मिळणाऱ्या उपयुक्त खोड व फांद्या आणि त्यांवरील चिवट साल इत्यादींना वापरलेले आढळते. कॅलॅमस, डीमोनोरॉप्स, सेरॅटोलोबस, प्लेक्टोकोमिया  व कोर्थाल्सिया  या शास्त्रीय नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पाच प्रजातींतील कित्येक जातींपासून ‘वेत’ काढतात व त्याला व्यापारी महत्त्व आहे. कॅलॅमस ही प्रजाती ह्याबाबत पहिल्या क्रमांकावर असून इतर चार प्रजातींतील वेत किरकोळ स्वरुपाचा व कमी महत्त्वाचा असतो. फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एकदलिकित वनस्पतींच्या ताल कुलात [→ पामी] ह्या सर्व प्रजातींचा अंतर्भाव होतो. येथे फक्त कॅलॅमस प्रजातीतील जातींची माहिती दिली आहे.    

कॅलॅमस प्रजातीत एकूण सु. ३९० जाती असून त्या बहुतांश उष्ण व उपोष्ण कटिबंधांत दाट जंगलांत आढळतात. त्या बहुतेक आरोही (वर चढत जाणाऱ्या), दुसऱ्या वृक्षांवर भार टाकून राहणाऱ्या किंवा मोठया वृक्षांच्या भोवती वेढे देत चढणाऱ्या वेली आहेत [→ महालता] त्याकरिता त्यांच्यावर आकडयासारखे काटे आणि संयुक्त पानांच्या मध्य शिरांपासून पुढे निघालेले लांब व वाकडे काटे असणारे ‘प्रतोद’ नावाचे चाबकासारखे अवयव असतात. प्रतोद हा अवयव शिरेचे व त्यावरील काटे हे दलांचे रुपांतर असते. काही जातींत फुलोऱ्याच्या टोकापासून प्रतोद निघतात व काहींत ते पानांच्या आवरकापासून खोडाला वेढणाऱ्या भागांपासून निघतात. कॅलॅमसच्या सु. ३० भारतीय जाती हिमालय, आसाम, महाराष्ट्र, मलबार, त्रावणकोर व कूर्ग येथे आणि श्रीलंकेत आढळतात. त्यांपैकी सु. दहा विशेष महत्त्वाच्या आहेत. त्यांपैकी कॅलॅमस रोटंग, कॅ स्यूडोटेन्युई, कॅ थ्वाइटेसी  व कॅ. फ्लॅजेलम  ह्या जाती महाराष्ट्रातील आहेत. खोडांच्या वर असलेल्या पेऱ्यांसमधील अंतर व त्याची कमीजास्त जाडी (व्यास) ह्यांबाबत अनेक जातींत फरक असून त्या जातींचे उपयोग त्या लक्षणांवर अवलंबून असतात.    

 

कॅलॅमस रोटंग ही वनस्पती मोठी बहुवर्षायू असून ती विशेषकरुन मध्य व द. भारतात आढळते. क्वचित मोठया बागेत लावलेली आढळते. कॅसलरॉक, आंबोली व कारवार येथील दाट जंगलांत ही आढळते. हिचे खोड बारीक पण बळकट व वर चढत जाणारे असून त्यावर एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी ३०-६० सेंमी लांब पाने असतात. पर्णतल (पानाच्या तळाचे उपांग) आवरक असून त्यावर खोडावर व पानांच्या शिरांखाली जाड काळसर काटे असतात. पानांची मध्यशीर शेंडयापासून पुढे वाढून तिची लांबी प्रतोद हा अवयव बनतो व त्यावर आकडयांसारखे व बळकट काटे असतात, काटयांचा उपयोग वर चढण्यास होतो. पानांवर बिनदेठाची, असंख्य, अरुंद, हिरवीगार व काहीशी चकचकीत व टोकदार दले असतात. त्यांच्या मध्यशिरेवरही बारीक राठ केस अथवा काटे असतात. या वेलीला ऑगस्ट ते नोव्हेंबरात एकलिंगी फुले भिन्न वनस्पतींवर येतात. फुलोऱ्यांचे महाछद नळीसारखे असतात. नर फुलोरा [ स्थूलकणिश → पुष्पबंध] फांद्यायुक्त, लांब व काटेरी असून स्त्री-फुलोऱ्याच्या (स्थूलकणिशाच्या) बारीक फांद्यांवर स्त्री-पुष्पे विखुरलेली असतात [→ फूल]. फळ गोलाकार, लहान, पातळ सालीचे, अनेक खवल्यांनी वेढलेले असते. बी एकच व सपुष्क (गर्भबाहेरील अन्नांश असलेले) असते. फुलांची संरचना व वनस्पतीची इतर सामान्य लक्षणे ⇨पामी  कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.

इतर जाती : कॅलॅमस स्यूडोटेन्युई ही सु. ३०-३५ मी. उंच जाऊन खूप पसरुन वाढणारी जाती आहे. ही सह्याद्रीच्या परिसरात भरपूर आढळते. हिचे कॅ. रोटंग जातीशी बरेच साम्य आहे. तथापि हिच्या पानांच्या शेंडयांना प्रतोद नसतात परंतु आवरक पर्णतलापासून ते वाढतात. स्त्री- पुष्पे लांब काटेरी कणिशावर येतात. कॅ. टेन्युई ही उपहिमालयी जाती कॅ. रोटंगप्रमाणे लांब व बारीक खोडाची असून डेहराडून ते आसाम या प्रदेशांत आढळते. कॅ. थ्वाइटेसी (मराठी नाव हंडिबेट) ही जाती सह्याद्रीच्या जंगलात आढळ्ते. हिचे खोड सरळ, जाडजूड (सु. ३.८ सेंमी व्यासाचे) असून पानांना प्रतोद नसतात. कॅ फ्लेजेलम (मराठी नाव नागबेत) ही जाती ईशान्य भारतातील असून महाराष्ट्रातही नोंदली आहे. हिचे खोडही जाडजूड असते. कॅ. ॲकॅन्थास्पेथस, कॅ. अंदमानिकस, कॅ. गुरुबा  कॅ. लॅटिफोलियस ह्या भारतीय जातीही उपयुक्त असल्याचे आढळले आहे.    

वेताच्या अनेक वेलींची खोडे सु. ९० मी.पेक्षाही लांब, शेवटपर्यंत सारख्या जाडीची, घन व दंडगोलाकृती, फिकट पिवळट, बळकट, चिवट व लवचिक असून त्यांवर काटेरी आवरक असतात. त्यांच्या पृष्ठभाग जाड, सूक्ष्म सिकतायुक्त, कठीण, गुळगुळीत व चकचकीत असतो. मध्यभाग मात्र सुविरल असतो. भिन्न प्रकारान्वये कांडी कमीजास्त जाडीची व लांबीची असते. सामान्यतः खोडाच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने त्यांची पूर्ण वाढ होण्यास पाच ते सात वर्षे लागतात. ती काढते वेळी तळाशी कापून नंतर वरुन खाली ओढून घेतात, त्यानंतर आवरक तासणीने घासून स्वच्छ करतात व त्वरित उन्हात सुकवितात.    

उपयोग : वेतांची लांबी, बळकटी व लवचिकपणा यांमुळे त्यांचा विविध प्रकारे उपयोग करतात. दोर व लोंबत्या पुलांना उपयुक्त असे तारयुक्त रज्जू, बारीक डाहळ्या विणून केलेल्या परडया, करंड्या, खुर्च्या इत्यादींसारख्या वस्तू यांकरिता वर उल्लेख केलेल्या भारतीय जाती वापरतात. प. बंगाल, बिहार, रत्नागिरी, कारवार, म्हैसूर व कूर्ग येथे चांगल्या प्रतीचा वेत-उद्योग चालू आहे. मलेशियातून यूरोपमध्ये आयात केलेल्या वेताच्या फिती यंत्राच्या साहाय्याने बनवितात, तर भारतात हे काम हातांनीच करतात. वेतांची जाडजूड खोडे सजावटी सामानांत चौकटी व सांगाडे बनविण्यास, छडया, हातातीला काठया, पोलो खेळाच्या काठया व छत्र्यांचे दांडे ह्यांकरिता वापरतात. म्यानमार, सिंगापूर, पिनँग व मलेशिया येथून वेताच्या काही अन्य जातींपासून मिळालेला कच्चा माल भारतात आयात होतो. कॅ रोटंग जातीच्या फळातील रसाळ व बुळबुळीत कडू गोड मगज खाण्यायोग्य असून त्याची मुळे औषधी व पौष्टिक असतात.

पहा : बुरुडकाम.

संदर्भ : 1. Corner, E. J. H. The Natural History of Palms, London, 1966.           2. C. S. I. R The Wealth Of India, Raw Materials, Vol. II, Delhi, 1950.

पाटील, शा. दा. परांडेकर, शं. आ.