वेक्समन, सेल्मन आब्राहम : (२२ जुलै १८८८-१६ ऑगस्ट १९७३). युक्रेनमध्ये (रशिया) जन्मलेले अमेरिकन जीवरसायनशास्त्राज्ञ. पेनिसिलीन या प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थाचा शोध लागल्यानंतर सूक्ष्मजीवांमधील प्रतिजैव पदार्थ हिशोबी व पध्दतशीर रीतीने शोधून काढण्यास त्यांनी सुरुवात केली. क्षयरोगावरील उपचारात गुणकारी ठरणारा स्ट्रेप्टोमायसीन हा पहिला प्रतिजैव पदार्थ शोधून काढल्याबद्दल त्यांना १९५२ सालचे वैद्यक अथवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

वेक्समन यांचा जन्म प्रिलूकी (युक्रेन) येथे झाला. १९१० मध्ये त्यांनी ओडेसा येथून मॅट्रिक्युलेशन डिप्लोमा संपादन केला. १९११ मध्ये ते अमेरिकेला गेले व न्यू ब्रन्सविक (न्यू जर्सी) येथील रुट्‌गर्स विद्यापीठातून त्यांनी कृषीतील बी. एस्‌सी. (१९१५) व एम्‌. एस्‌सी (१९१६) या पदव्या मिळविल्या. मग त्यांनी न्यू जर्सी ॲग्रिकल्चरल एक्सपरिमेंटल स्टेशन येथे जे. जी. लीपमान यांच्या मार्गदर्शनाखाली मृदा सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधन केले. १९१६ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. १९१८ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची पीएच्‌.डी. पदवी मिळवली. त्यांचे बहुतेक उर्वरित आयुष्य रुट्‌गर्स विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी मृदा सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक (१९३०-४०), सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक व विभागाचे अध्यक्ष (१९४०-५८) आणि रुट्‌गर्स इन्स्टिटयूट ऑफ मायक्रोबायॉलॉजी या संस्थचे संचालक (१९४९-५८) म्हणून काम केले. सेवानिवृत्तीनंतरही (१९५८) त्यांनी संशोधन व लेखन चालू ठेवले होते. १९३०-४२ दरम्यान वुड्‌स होल इन्स्टिटयूट येथे सागरी सूक्ष्मजीवशास्त्राचा विभाग सुरु करण्यास त्यांची मदत झाली होती.

    वेक्समन यांनी मृदेत आढळणाऱ्या तंतुरुप व सूक्ष्मजंतूंसारख्या ॲक्टिनोमायसीटीज या सूक्ष्मजीवांचा तपशीलवार अभ्यास केला. या सूक्ष्मजंतूंमधून त्यांनी प्रतिजैव पदार्थ निष्कर्षणाद्वारे मिळविले. या पदार्थांनी पेनिसिलिनामुळे न मरणारे सूक्ष्मजंतूही मरतात, असे दिसून आले. क्षयरोगाचा सूक्ष्मजंतू (मायकोबॅक्टिरियम टयुबरक्युलॉसिस) अशा सूक्ष्मजंतूंचे एक उदाहरण आहे.

मृदेतील सूक्ष्मजंतूंमधून वेक्समन व त्यांच्या सहकाऱ्यांनी ॲक्टिनोमायसीन मिळविले पण प्रयोगशाळेतील प्राण्यांच्या बाबतीत ते अतिशय विषारी असल्याचे दिसून आले. १९४३ मध्ये स्ट्रेप्टोमायसीज ग्रिशीअस  या सूक्ष्मजंतूंपासून त्यांनी सापेक्षतः विषारी नसलेले स्ट्रेप्टोमायसीन मिळविले. याचा क्षयरोग बरा करण्यासाठी उपयोग होऊ शकत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. नंतर क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी रासायनी चिकित्सेतील इतर पदार्थांबरोबर स्ट्रेप्टोमायसीन हा एक मुख्य घटक बनला आहे. वेक्समन यांनी इतर अनेक प्रतिजैव पदार्थ वेगळे केले व तयार केले उदा., क्लॅव्हासीन, स्ट्रेप्टोथ्रिसीन (१९४२), ग्रीसीन (१९४६), निओमायसीन (१९४८), फ्राडिसीन, कँडिसिडीन, कँडिडीन वगैरे. हे पदार्थ माणूस, पाळीव प्राणी व वनस्पती यांच्या अनेक संसर्गजन्य रोगांवरील उपचारांत वापरले जातात.

वेक्समन यांनी चारशेहून अधिक शोधनिबंध आणि अनेक पुस्तके लिहिली आहेत. यांपैकी प्रिन्सिपल्स ऑफ सॉइल मायक्रोबायॉलॉजी (१९२७) हे सर्वांत विस्तृत व महत्त्वाचे पुस्तक आहे. माय लाइफ वुइथ द मायक्रोब्ज (१९५४) हे त्यांचे आत्मचरित्र आहे.

वेक्समन यांना संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिकाशिवाय अनेक मानसन्मान मिळाले आहेत. स्ट्रेप्टोमायसीन व निओमायसीन या औषधांच्या विक्रीतून मिळणाऱ्या स्वामित्वधनामधून वेक्समन पतिपत्नींनी ‘सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रतिष्ठान’ स्थापन केले आहे.

मेंदूतील रक्तस्रावामुळे वेक्समन यांचे हाइॲनस (मॅसॅचूसेट्स) येथे निधन झाले.

भालेराव, य. त्र्यं. ठाकूर, अ. ना.